आता तुलसी तोडण्याचा काल सांगतो. वैधृति, व्यतीपात, भौमवार, शुक्रवार, रविवार, पौर्णिमा व अमावास्या, संक्रांति, द्वादशी, जननाशौच व मृताशौच या काली तुलसी तोडणारे हरीचा शिरच्छेदच करितात. म्हणून या दिवशी तुलसी तोडू नयेत. शहाण्या मनुष्याने रविवारी दूर्वा, रात्री व दोन्ही संधिकाली तुलसी व कर्तिक महिन्यात आवळीचे पत्र तोडू नये. त्याचप्रमाणे शहाण्या माणसाने द्वादशीचे दिवशी दिवसा झोप घेणे, तुलसी तोडणे व विष्णूस दिवसा स्नान घालणे, या गोष्टी वर्ज्य कराव्यात. या वाक्यात स्नानाचा निषेध दिवसा असल्यामुळे रात्री स्नानादि षोडशोपचाराने पूजा करावी. कमलाकराच्या आह्निकांत असे सांगितले आहे की, दिवसा गंधापासून पुष्पांजलीपर्यंतचे उपचार परमेश्वरास अर्पण करावेत. द्वादशीचे दिवशी विष्णूवरील निर्माल्यही काढू नये, असे दुसर्या ग्रंथात सांगितले आहे. "एकादशीचे दिवशी जनार्दनास पंचामृताचे स्नान घातल्याने व द्वादशीच्या दिवशी दुधाचे स्नान घातल्याने श्रीहरीचे ठायी सायुज्य मुक्ति मिळते." असे पुरुषार्थचिंतामणी ग्रंथात नारदाचे पुराणवचन असल्यामुळे वरील वचनास अपवाद आहे. अमावास्येच्या दिवशी विष्णुपूजेसाठी तुळशी तोडल्यास, होमासाठी समिधा आणल्यास व गाईसाठी गवत कापल्यास दोष लागत नाही.
असा मंत्र म्हणून तुलसी तोडाव्यात. जाई, मोगरा, कण्हेर, अशोक, कमले, चाफा, बकुळीचे फूल, शमी व कुश ही सर्व देवांस अर्पण करण्यास प्रशस्त आहेत.
आता विहित व प्रतिषिद्ध असल्यामुळे वैकल्पिक असलेल्या पुष्पांविषयी सांगतो. पाटला व शमीपत्र ही दुर्गादेवीस निषिद्ध आहेत. कुंद, पलाश, बकुल व दूर्वा ही शिवास निषिद्ध सांगितली आहेत. कुमुदे व तगर ही सूर्यास निषिद्ध आहेत. तुलसी, माका व तमालपत्र ही शिव व दुर्गा, यांस निषिद्ध प्रतिपादिली आहेत. अगस्ती, माधवीलता व लोध्र (धायटी) पुष्प, ही शिव व विष्णु, यांस प्रतिषिद्ध सांगितली आहेत. धोत्रा व मंदार ही पुष्पे विष्णु व सूर्य यांस प्रतिषिद्ध आहेत. याप्रमाणे वैकल्पिक पुष्पे सांगितली.