जन्मराशीपासून पापग्रह व चंद्र ३-६-१० या स्थानी शुभ, ७ व १ या स्थानी असलेला चंद्रही शुभ होय. शुक्लपक्षात २-९ व ५ या स्थानी चंद्र शुभ होय. २-४-६-८ व १० या स्थानी बुध २-५-९-७ या स्थानी गुरु व १-२-३-४-५-९-८ व १२ या स्थानी शुक्र शुभ होय. एकादश स्थानी सर्वच ग्रह शुभ होत. जन्मनक्षत्रापासून दिवसनक्षत्रापर्यंत त्रिदावृत्तीने नक्षत्रे मोजिली असता ९।९ नक्षत्रांस जन्म, संपत, विपत, क्षेम, प्रत्यरि, साधिका, वध, मैत्र व अतिमैत्र या संज्ञा प्राप्त होतात. क्रमाने सूर्यादि ग्रहांचे बल पहावे. राजदर्शनास रविबल, सर्व कृत्यांस चंद्रबल, युद्धास भौमबल, शास्त्राभ्यासास बुधबल, विवाहास गुरुबल, प्रयाणास शुक्रबल व मंत्रदीक्षेस शनिबल, याप्रमाणे विशेषतः त्या त्या ग्रहाचे बल पाहून ते ते कार्य करावे. सूर्यादि अनिष्ट ग्रहांची दाने द्वितीयपरिच्छेदाच्या शेवटी सांगितली आहेत.