संकल्पापासून नांदीश्राद्धापर्यंत सर्व कर्म पूर्वीप्रमाणेच करावे. एक आचार्य वरावा. आचार्याने "अमुक देवता प्रतिष्ठाकर्म करिष्ये" इत्यादि संकल्पापासून सर्षपांचे विकिरणापर्यंत कर्म केल्यावर सर्वतोभद्र मंडलावर पूर्वी सांगितल्याप्रमाणे नाममंत्राने ब्रह्मादि मंडलदेवतांचे आवाहन करून त्यांची पूजा करावी व गृह्यसूत्रानुसार अग्नीची स्थापना करून अन्वाधान करावे. आज्यभागापर्यंत कर्म झाल्यावर
'स्थाप्यदेवता सहस्त्रमष्टोत्तर शतं वासमिदाज्यचरुतिलद्रव्यैर्ब्रह्मादि मंडल देवताः प्रत्येकं दश दश तिलाज्याहुतिभिः शेषेण इत्यादि"
याप्रमाणे अन्वाधान करावे. चरूसाठी प्रत्येक देवतेला चार चार मुठी तांदूळ सुपात घेणे व त्याचे प्रोक्षण करणे ही कर्मे मंत्ररहित करावीत. आज्यभागापर्यंत कर्म झाल्यावर तडाग, नदीतीर, गोष्ठ, आंगण, पर्वत, गजशाळा, अश्वशाळा, र्हद, वारुळ व चवाठा या दहा स्थानांच्या मृत्तिकांनी देवास आठ वेळ स्नान घालून क्रमाने पंचगव्याने स्नान घालावे; व दूर्वा, शिरस आणि पंचपल्लव यांनी युक्त असलेल्या आठ कलशातील पाण्याने "आपोहिष्ठा०" इत्यादि मंत्रानी अभिषेक केल्यावर अग्न्युत्तारण करावे सर्वतोभद्रावरील पीठावर देवांस बसवून नाममंत्राने वस्त्र, गंध, धूप इत्यादि देऊन आठ दिशेस पंच पल्लवादिकांनी युक्त असलेले आठ उदकुंभ व आठ दीप स्थापन करावे व पूर्वीप्रमाणे नेत्रोन्मीलन करावे. चित्रान्नाने बलिदान करून पुरुषसूक्ताने स्तुति करावी व पूर्वोक्त चार द्रव्यांचा स्थाप्य देवतेच्या मंत्राने होम करून दर एक द्रव्यांच्या होमाच्या अंती देवास स्पर्श करावा. आज्य होम झाल्यावर कुंभात संपात टाकून मंडल देवतांचा होम करावा; व होमशेष समाप्त करून पूर्णाहुति अर्पण करावी.
यानंतर पूर्वी सांगितलेल्या रीतीने सूक्ताचा न्यास, आवाहन, प्राणप्रतिष्ठा येथपर्यंत कर्म करून "इहैवैधि०" या तीन ऋचांचा जप करावा व मूलमंत्रादिकाने आवाहनादिकांपासून पंचामृत स्नानापर्यंत कर्म केल्यावर संपातोदकाने "इमाआपःशिवतमा०" इत्यादि मंत्रांणी अभिषेक करावा. वस्त्रादिकांपासून नैवेद्यापर्यंतची पूजा पूर्वीप्रमाणे केल्यावर तांबूल, फल, दक्षिणा, नीरांजन, नमस्कार, प्रदक्षिणा करून पुष्पांजली समर्पण करावी व नंतर कर्त्याने आचार्यासह देवास नमस्कार करून प्रार्थना करावी. आचार्यास दक्षिणा दिल्यावर आचार्याने आठ कुंभातील उदकाने यजमानास अभिषेक करावा; आणि विष्णूचे स्मरण करून सर्व कर्म परमेश्वरास अर्पण करावे. याप्रमाणे हे थोडक्यात सांगितले.