नानाप्रकारचे दिव्य, भौम व अंतरिक्ष उत्पात झाले असता संकल्पादिक करून कलशावर इंद्र व रुद्र यांची पूजा करावी. नंतर 'यतइंद्र०, स्वस्तिदाविशस्वतिः०, अघोरेभ्योथ०" या मंत्रांनी समिधा, आज्य, चरु, व्रीहि व तिळ या प्रत्येक द्रव्याचा १००८ होम करावा. व्याह्रतिमंत्रांनी तिलांचा कोटिहोम, लक्षहोम, आयुतहोम अथवा त्याचा चतुर्थांश म्हणजे २५०० होम द्रव्यशक्ति असेल त्याप्रमाणे व लहानमोठे निमित्त असेल त्याप्रमाणे सप्तरात्र, त्रिरात्र किंवा एकरात्र करून सूर्य, गणेश, क्षेत्रपाल व दुर्गा यांच्या मंत्राचा जप करून पायसादिकाने ब्राह्मण भोजन घालावे अथवा चंडी सप्तशतीचा जप करावा; किंवा रुद्राचा जप, अथवा अभिषेक करावा; अथवा अश्वत्थाला प्रदक्षिणा, शिवपूजा, गाईब्राह्मणांची पूजा इत्यादिक गोष्टी कराव्या. याप्रमाणे नानाप्रकारच्या उत्पातांच्या शांति सामान्यतः सांगितल्या.