ब्राह्मण, क्षत्रिय व वैश्य या तीन वर्णांनी वृक्ष लाविल्यापासून क्रमाने ८व्या, ११व्या व १२ व्या वर्षी उपनयनास उक्त असलेल्या मुहुर्तावर पूर्वाह्णकाली अश्वत्थाचे उपनयन करावे. अश्वत्थाची स्थापना शूद्राने केली असेल तर पुराणोक्त मंत्रांनी आरामप्रतिष्ठाच करावी. उपनयन करू नये. कर्त्याने देशकालाचा उच्चार करून
"सर्वपापक्षय कुलकोटि समुद्धरणपूर्वक विष्णुसायुज्यप्राप्तिकामोऽश्वत्थोपनयनं करिष्ये"
असा संकल्प करावा. व नांदीश्राद्धान्त कर्म केल्यावर आचार्यास वरावे. आचार्यांनी पंचामृते, शुद्धोदके व सर्वौषधियुक्त जले यांनी अश्वत्थास स्नान घालून पिष्टातकाने (बुक्याने) अश्वत्थास सुशोभित करून अश्वत्थाच्या पूर्व दिशेस स्थंडिलावर अग्नीची स्थापना करावी; व
"अग्निवायुं सूर्यभिरग्निं पवमानं प्रजापतिं द्विरोषधिर्वनस्पति पिप्पलं प्रजापतिंच पलाशसमिच्चार्वाज्यैः प्रत्येकमकैक याहुत्याशेषेणेत्यादि"
या प्रमाणे अन्वाधान करावे. ४८ मुठी तांदूळ मंत्ररहित घेऊन मंत्ररहित प्रोक्षण करून चरुश्रपणापासून आज्यभागान्त कर्म केल्यावर "युवं वस्त्राणि०" या मंत्रांनी दोन वस्त्रे अश्वत्थासभोवती वेष्टावीत व "यज्ञोपवीतं०" या मंत्राने यज्ञोपवीत देऊन "प्रावेपा०" या मंत्राने मेखलेचे तीनदा वेष्टन करून अजिन व दंड हे मंत्र न म्हणता द्यावेत. "अश्वत्थे०" या ऋचेने गंधपुष्पादिकांनी पूजा करून "देवस्यत्वा०" हा मंत्र म्हणून 'हस्तंगृह्नाम्यश्वत्थ" असे वाक्य म्हणावे व अश्वत्थाला स्पर्श करून प्रणव व व्याह्रति यांनी युक्त गायत्रीमंत्राचा तीन वेळ जप करावा. "अश्वत्थेवोनिषदनं०" या सूक्ताने व व्याह्रतिमंत्रांनी "अश्वत्थंस्थापयामि" असे वाक्य म्हणून सोन्याच्या काडीने स्पर्श करून आज्य, पळसाच्या समिधा व चरु या द्रव्यांपैकी प्रत्येकाच्या बारा आहुति याप्रमाणे बारा मंत्रांनी होम करावा. होमाचे मंत्र "भूः स्वाहा अग्नयइदं० भुवःस्वाहा वायव० स्वःस्वा० सूर्याये० अग्नआयूंशि० अग्निऋषिः० अग्नेपवस्व० (या तीन ऋचांचा प्रत्येक ऋचेने होम करावा) अग्नयेपवमानायेदं० प्रजापतेनत्व० प्रजापतय० ओषधयःसंवदन्ते० अश्वत्थेवो० ओषधीभ्यइदं० वनस्पतेशत० द्वासुपर्णा० पिप्पलायेदं० समस्त व्याह्रतिभिः प्रजापयइदं०" याप्रमाणे होम करून स्विष्टकृत इत्यादि होमशेष समाप्त केल्यावर "अश्वत्थेवो०" या मंत्राने गंध, पुष्प, धूप, दीप, नैवेद्य, फल, तांबूल इत्यादि उपचारांनी पूजा करून अश्वत्थास स्पर्श करावा; व आचार्याला गोप्रदान व इतर ब्राह्मणांस दक्षणा देऊन अश्वत्थास समर्पण केलेली वस्त्रे इत्यादि पदार्थ आचार्यास देऊन आठ ब्राह्मणांस भोजन घालावे. याप्रमाणे अश्वत्थाचे उपनयनाचा प्रयोग सांगितला.