श्रवण, धनिष्ठा, अश्विनी, पुष्य, रेवती, अनुराधा, मृग, हस्त, पुनर्वसु ही नक्षत्रे असता व गोचरी शुभफलप्रद ग्रहांचे वारी प्रयाण करावे. दक्षिण दिशेशिवाय अभिजित नक्षत्र व अभिजिन्मुहूर्त प्रयाणास शुभ होय. मघा, चित्रा, स्वाति, विशाखा, आश्लेषा, भरणी, आर्द्रा, कृत्तिका, पूर्वाभाद्रपदा व जन्मनक्षत्र ही प्रयाणास अशुभ होत. रिक्तातिथी, पर्वणी, षष्ठी, अष्टमी, द्वादशी ह्या तिथी वर्ज्य कराव्या. तसेच कृत्तिका, भरणी, पूर्वात्रय व मघा ह्या नक्षत्रांच्या क्रमाने पहिल्या २१।७।१६ व ११ घटका सोडाव्यात. ज्येष्ठा, आश्लेषा, विशाखा व स्वाति ह्या नक्षत्रांच्या १४।१४ घटिका टाकाव्यात. भृगूच्या मताने स्वाति व मघा ही नक्षत्रे सर्वच टाकावीत. स्वाति, मघा व कृत्तिका यांचा पूर्वार्ध व चित्रा, आश्लेषा आणि भरणी यांचा उत्तरार्ध टाकावा.