एकेका ब्राह्मणाने अथवा स्वतः कुशासनादिकावर बसून हातात दर्भपवित्र धारण करून आचमन व प्राणायाम केल्यावर
"सूर्यःसोमोयमःकालःसंध्येभूतान्यहःक्षपा । पवमानोदिकपतिर्भूराकाशंखेचरामराः १ ब्रह्मशासनमास्थायकल्पध्वमिहसंनिधिम"
अशी देवतांची प्रार्थना करावी व देशकालाचा उच्चार करून प्रत्यही कर्तव्य जपाचा उच्चार केल्यावर
"गुरवेनमः गणपतये० दुर्गायै० मातृभ्यो०"
याप्रमाणे नमस्कार करावेत; व तीन प्राणायाम करून
"तत्सवितुरितिगायत्र्याविश्वामित्रऋषिःसवितादेवतागायत्रीछन्दःजपेवि० विश्वामित्रऋशयेनमः शिरसि गायत्रीछन्दसेनमोमुखे सवितृदेवतायैनमोह्रदि"
असा न्यास करावा. व
"तत्सवितुरङ्गुष्ठाभ्यां० वरेण्यंतर्जन० भर्गोदेवस्यमध्यमा० धीमह्यनापिका० धियोयोनःकनिष्ठिकाभ्यांप्रचोदयातकरतलकरपृष्ठाभ्यांनम"
असा करन्यास करून ह्रदयादि षडंगाचे ठायी न्यास करावा. नंतर पूर्वी सांगितल्याप्रमाणे संस्कार केलेली जपमाळा पात्रात ठेवून ती प्रोक्षण करावी; व
"ॐमहामायेमहामालेसर्वशक्तिस्वरुपिणि । चतुर्वर्गस्त्वयिन्यस्तस्तस्मान्मांसिद्धिदाभव"
अशी तिची प्रार्थना करून
"अविघ्नं कुरुमालेत्वं०" या मंत्राने ती माला हाती घेऊन मंत्रदेवता सवितेचे ध्यान करीत असता माला ह्रदयाचे ठायी धारण करून मंत्रार्थाचे स्मरण करीत असता मध्यंदिनापर्यंत जप करावा. फारच त्वरा असेल तर ३॥ प्रहर पर्यंत जप करावा. जपाच्या अंगी पुनः प्रणव म्हणून
"त्वं माले सर्व देवानां प्रीतिदाशुभदाभव शिवं कुरुष्व मे भद्रे यशोवीर्यच सर्वदा"
या मंत्राने माळा मस्तकावर ठेवून तीन प्राणायाम करावेत व तीन न्यास करून ईश्वरास जप अर्पण करावा. दररोज जप सारख्या संख्येचाच करावा. कमी अधिक करू नये. याप्रमाणे पुरश्चरण जपाची समाप्ति झाली असता होम करावा.
"पुरश्चरण सांगता सिद्ध्यर्थं होमविधिं करिष्ये"
असा संकल्प करून अग्नीची स्थापना करुन पीठावर सूर्यादिनवग्रहांच्या पूजेपासून कलशस्थापनेपर्यंत कर्म केल्यावर अन्वाधान करावे.
"चक्षुसि आज्येन" इतके म्हटल्यावर ग्रहपीठ देवतांचे अन्वाधान अर्कादि समिधा, चरु, आज्य, यांच्या आहुतींनी करून
"प्रधानदेवतांसवितारंचतुर्विंशतिसअहस्रतिलाहुतिभिस्त्रिसहस्त्रसंख्याकाभिःपायसाहुतिभिर्घृतमिश्रतिलाहुतिभिर्दूर्वाहुतिभिःक्षीरत्मसमिदाहुतिभिश्च शेषेणस्विष्टकृतमित्यादि"
याप्रमाणे प्रधान अन्वाधान करावे. चरु, पायस व तिल यांसहित आज्याचे पर्यग्निकरणादि (द्रव्यसंस्कार) करावे. आज्यभावान्त कर्म झाल्यावर
"इदंहवनीयद्रव्यमन्वाधानोक्तदेवताभ्यः अस्तुनमम"
असा यजमानाने त्याग करावा. होमाचे वेळी स्वप्रणव व्याह्रतिरहित व स्वाहाकारपर्यंत गायत्री म्हणावी. तीन दुर्वांची एक आहुति द्यावी. दूर्वा व समिधा दही, मध व आज्य यांत भिजवाव्यात-स्विष्टकृतापासून बलिदानापर्यंत कर्म केल्यावर "समुद्र ज्येष्ठा०" इत्यादि मंत्रांनी यजमानावर अभिषेक करावा. दर एक लक्ष जपास तीन निष्क सुवर्ण किंवा दीड निष्क सुवर्ण किंवा यथाशक्ति दक्षणा द्यावी. होम केल्यावर उदकात सविता देवतेची पूजा करून होमसंख्येच्या दशांशाने (२४००) गायत्रीमंत्राच्या अंती "आत्मानमभिषिंच्यामिनमः" असे म्हणून आपल्या मस्तकावर अभिषेक करावा. होम, तर्पण व अभिषेक यापैकी जे करणे असंभवनीय असेल त्याच्या स्थानी त्याच्या त्याच्या दुप्पट जप करावा. अभिषेकसंख्येच्या दशांशाइतके अथवा त्याहून अधिक ब्राह्मणभोजन घालावे. "पुरश्चरण पूर्णमस्तु" असे ब्राह्मणांकडून वदविल्यावर कर्म ईश्वरास अर्पण करावे. दररोज "यज्जाग्रतो०" या शिवसंकल्प मंत्राचे तीन पाठ करावे. कर्त्याने ब्राह्मणांसह हविष्य भोजन करावे. सत्य भाषण करावे. खाली निद्रा करावी व परिगृहीत भूमीच्या बाहेर संचार करू नये. याप्रमाणे अनंत देवाच्या ग्रंथात सांगितल्याप्रमाणे २४००००० पुरश्चरणाचा प्रयोग सांगितला. मध्याह्नी मितभोजन करून मौन धारण करून त्रिकालस्नान व देवपूजा करून बुद्धिमान पुरुषाने गायत्रीमंत्राचा तीन लक्ष जप करावा, असे तीन लक्षांचे गायत्री पुरश्चरण ऋग्विधान ग्रंथात सांगितले आहे. जपाच्या शतांशाने तीन सहस्त्र होम करावा. कलियुगात चतुर्गुणित सांगितले आहे हे लक्षात घेतले असता बारा लक्ष जप, व बारा हजार होम करावा. विष्णुशयनमासात म्हणजे आषाढ शुद्ध एकादशीपासून कार्तिक शुद्ध एकादशीपर्यंत पुरश्चरण करू नये. तीर्थादिकांच्या ठायी पुरश्चरणाची सिद्धि त्वरित होते. बिल्व वृक्षाच्या आश्रयाने जप केला असता एका दिवसात सिद्धि होते अशी सर्वत्र मंत्रप्रक्रीया जाणावी. याप्रमाणे गायत्रीमंत्राचे पुरश्चरण सांगितले.