नवीत घरात प्रवेश करण्यापूर्वी मैत्र, ध्रुव, क्षिप्र व चरसंज्ञक नक्षत्री व मूल नक्षत्री वास्तुशांति केली असता धन व पुत्र प्राप्त होतात. वास्तुशांतीचा प्रयोग इतर ग्रंथात पहावा. वास्तुशांति दिवसा करणे प्रशस्त आहे. पण गृहप्रवेश रात्री करावा, असे कित्येक ग्रंथात म्हटले आहे. उक्त मास व नक्षत्रे यांवर गृहप्रवेश केला असता शुभप्रद होय. कित्येक ग्रंथात असे सांगितले आहे की, माघ, कार्तिक व ज्येष्ठ या मासात मृदु व ध्रुव या नावाची नक्षत्रे असता गृहप्रवेश करणे श्रेष्ठ आहे. क्षिप्र व चर या नक्षत्री केलेला गृहप्रवेश मध्यम असून तीक्ष्ण, उग्र व मिश्र या नक्षत्री केलेला गृहप्रवेश निंद्य होय. ज्या लग्नी गृहप्रवेश करावयाचा असेल त्या लग्नापासून तिसर्या, अकराव्या व सहाव्या स्थानी पापग्रह असल्यास शुभकारक होय. सहाव्या, आठव्या व बाराव्या स्थानी शुभग्रह असू नयेत. चौथ्या व आठव्या स्थानी कोणताही ग्रह असु नये. जन्मलग्न व जन्मराशी यांपासून आठवे लग्न नसावे. सूर्य नक्षत्रापासून पाच नक्षत्रे व चौदाव्या नक्षत्रापासून आठ नक्षत्रे म्हणजे १।२।३।४।५।१४।१५।१६।१७।१८।१९।२०।२१ ही नक्षत्रे अशुभ होत. बाकीची नक्षत्रे गृहप्रवेशास शुभ आहेत. यांस 'कलशचक्र' असे म्हणतात. याप्रमाणे वास्तुप्रकरण सांगितले.