क्रूर, मिश्र, अश्विनी, मृग व तीक्ष्ण नक्षत्रांवर खड्गादि शस्त्रे घडवावीत. ध्रुव, क्षिप्र, मृदु, ज्येष्ठा व विशाखा नक्षत्रांवर शस्त्रे धारण करावीत. क्षिप्र, मैत्र व ध्रुव ही नक्षत्रे असता बुध, गुरु, रवि व शुक्र या वारी आणि स्वामीनक्षत्रापासून सेवकाचे नक्षत्र दुसरे नसेल तर शनिवारीही स्वामीची सेवा करण्यास प्रारंभ करावा. हस्त, चित्रा, स्वाति, विशाखा, अनुराधा, ज्येष्ठा, ध्रुवनक्षत्रे, श्रवण, रेवती, पुष्य व पुनर्वसु या नक्षत्रांवर पालखी, हत्ती, अश्व, इत्यादिकांवर आरोहण केले असता शूभप्रद आहे. राजदर्शन घेणे असल्यास क्षिप्र, श्रवण, धनिष्ठा, म्रुदु व ध्रुव ही नक्षत्रे असताना घ्यावे. पुष्य, मृग, ध्रुव, ज्येष्ठा, धनिष्ठा, अनुराधा, शततारका, हस्त ही नक्षत्रे असताना शुभवारी नृत्यारंभ शुभप्रद होय. मृदु, क्षिप्र व धुर व ही नक्षत्रे असता रिक्तातिथि व भौमवार वर्ज्य करून विक्रीचा बाजार शुभ होय. अश्विनी, स्वाति, श्रवण, चित्रा, शततारका व रेवती या नक्षत्रांवर वस्तु विकत घ्याव्यात; व भरणी, पूर्वात्रय, आश्लेषा, व मिश्र नक्षत्रे असताना वस्तूंचा विक्रय करावा. ध्रुव व स्वाति नक्षत्री गुरु, रवि व शनि या वारी सेतुबंध करावा. हस्त, पुष्य, आर्द्रा, मृग, मिश्र नक्षत्रे, पुनर्वसु, धनिष्ठा, अश्विनी, तिन्ही पुर्वा, ज्येष्ठा, शततारका व रेवती ही नक्षत्रे असता रवि, भौम, चंद्र व शनि हे वार, श्रवण, चित्रा व ध्रुव ही नक्षत्रे, अमावास्या, रिक्तातिथि व अष्टमी ही वर्ज्य करून पशु नेणे, आणणे, त्यांचा क्रयविक्रय करणे इत्यादि पशुसंबंधी कर्मे शुभकारक होत. द्रव्याची वृद्धि होण्यासाठी त्यांचा व्यवहार लघु, चर संज्ञा असलेल्या नक्षत्रांवर व चर लग्नावर करावा. मंगळवार, वृद्धियोग व सूर्यसंक्रांत या दिवशी कर्ज काढू नये. धनिष्ठा, शततारका, पूर्वाभाद्रपदा, उत्तराभाद्रपदा, रेवती, हस्त, त्रिपुष्कर, द्विपुष्कर, भौम, बुध, गुरु, शुक्र व शनि या दिवशि कर्ज द्यावे व धनसंग्रह करावा. पण बुधवारी धन देऊ नये. या दिवशी धनसंग्रह शुभकारक होय. शनि, रवि व भौम हे वार त्रिपाद नक्षत्रे म्हणजे कृत्तिका, पुनर्वसु, उत्तरा, विशाखा, उत्तराषाढा, व पूर्वाभाद्रपदा आणि भद्रातिथी म्हणजे द्वितीया, सप्तमी व द्वादशी या तिहींचा योग झाला असता त्रिपुष्कर योग होतो. मृग, चित्रा व धनिष्ठा ही नक्षत्रे, शनि, रवि व भौम हे वार व भद्रातिथी या तिहींचा योग झाला असता द्विपुष्करयोग होतो. त्रिपुष्कर व द्विपुष्कर या रोगावर शुभाशुभ कार्ये झाली असता त्यांची फले क्रमाने दुप्पट व तिप्पट अशी मिळतात. या योगांवर एकाद्या वस्तूचा लाभ झाला असता त्या वस्तूसह दुप्पट किंवा तिप्पट लाभ होतो. मिश्र, क्रूर, तीक्ष्ण व स्वाति ही नक्षत्रे असताना दिलेले, योजिलेले, ठेविलेले व नष्ट झालेले द्रव्य पुनः मिळत नाही, असे नारदाने म्हटले आहे.
रोहिणी नक्षत्रापासून चार चार नक्षत्रे क्रमाने अंध, मंद, चिविट व सुलोचन य संज्ञेने मोजावीत. उदाहरणार्थ - रोहिणी, अंध, मृग- मंद, आर्द्रा- चिबिट, व पुनर्वसु - सुलोचन याप्रमाणे नक्षत्रे मोजावीत. अंधनक्षत्रावर नष्ट झालेली वस्तु लवकर सापडेल. मंद नक्षत्रावर नष्ट झालेली वस्तु यत्नाने सापडेल. व चिबिट आणि सुलोचन नक्षत्रावर नाहीशी झालेली वस्तु सापडणार नाही. अंध नक्षत्रावर नाहीशी झालेली वस्तु पूर्वेस पहावी. मंदनक्षत्रावर नाहीशी झालेली वस्तु दक्षिणेस शोधावी. चिबिट नक्षत्रावर नाहीशी झालेली वस्तु पश्चिमेस व सुलोचन नक्षत्रावर नाहीशी झालेली वस्तु उत्तरेस पहावी. श्रवण, ध्रुव, ज्येष्ठा, मृदु, क्षिप्र या नक्षत्रांवर रवि उत्तरायणी असताना सोमवारी गुरु व शुक्र यांचा उदय असता; मंगळवार, रिक्ता तिथी, अधिकमास, चैत्रमास व रात्रि ही वर्ज्य करून राज्याभिषेक केला असता शुभकारक होतो. मघा, पुष्य, ध्रुव, मृग, पूर्वाषाढा, अनुराधा, रेवती, धनिष्ठा, शततारका व हस्त ही नक्षत्रे असताना चंद्र जलराशिगत असून बुध व गुरु हे लग्नी असता वापी, कूप, तडाग इत्यादि खणावेत. चौलकर्मास उक्त असलेली नक्षत्रे व वार हे असता क्षौरकर्म करणे शुभकारक होय. राजांनी पाच पाच दिवसांनी क्षौर करावे. इतरांनी इच्छेप्रमाणे उक्तदिवशी क्षौर करावे. नवव्या दिवशी श्मश्रु कर्म कधीही करू नये. जिवंत राहाण्याची इच्छा करणार्याने चतुर्दशीच्या दिवशी श्मश्रु व अमावास्येचा स्त्रीसंभोग करू नये. अभ्यंग, भोजन व स्नान केलेल्याने व अलंकारादिकांनी भूषित असलेल्याने क्षौर करू नये. प्रयाण दिवस, युद्धाचा आरंभ दिवस, रात्री, संधिकाल, श्राद्ध दिवस, प्रतिपदा, रिक्तातिथी, व्रतदिवस, वैधृति या दिवशी श्मश्रुकर्म करू नये. सर्व कर्मे करण्यास जन्मनक्षत्र प्रशस्त आहे, पण श्मश्रु, प्रयाण, औषधसेवन व वादविवाद यास ते प्रशस्त नाही. षष्ठी, अमावास्या, पौर्णिमा, व्यतीपात, चतुर्दशी व अष्टमी या दिवशी तैलसेवन, स्त्रीसंभोग व श्मश्रु ही करू नयेत. राजाचे काम करण्यास नेमलेल्या पुरुषाने किंवा राजाच्या योगाने आपली उपजीविका करणाराने श्मश्रु, लोम व नखे काढून टाकताना बर्या वाईट कालाचा विचार करू नये. क्षौराविषयी निषेध असला तरी नैमित्तिक व यज्ञ, स्मृति, बंध, मोक्ष, राजाज्ञा व विप्राज्ञा असता क्षौर करावे. आईबाप जिवंत असणार्या पूर्ववयस्कांनी मुंडन करू नये. मुंडनाविषयी निषेध असला तरी केशांचे कर्तना (कापण्या) विषयी विधि आहे. शाहाण्या पुरुषाने उत्तराभिमुख किंवा पूर्वाभिमुख होऊन श्मश्रु कर्म करवावे. केश, श्मश्रु, लोम व नखे यांचा छेद, उदकसंस्थ करावा. निंद्य दिवशी श्मश्रुकर्म करण्याचा प्रसंग आल्यास
"आनर्तोहिच्छत्रःपाटलिपुत्रोदितिर्दितिःश्रीशः । क्षौरेस्मरणादेषांदोषानश्यन्तिनिःशेषाः ॥"
हा श्लोक म्हणावा म्हणजे दोष नाहीसे होतात.