देशकालाचा उच्चार केल्यावर
"अथसर्वनक्षत्रसाधारणःशान्तिप्रयोगःदेशकालौसंकीर्त्यममोत्पन्नव्याधेर्जीवच्छरीराविरोधेनसमूलनाशार्थममुकनक्षत्रशान्तिकरिष्ये"
असा संकल्प करावा व गणपतीपूजादिक कर्म करावे. नंतर आचार्याला वरून कलशावर पूर्णपात्रात द्वादश दलाचे ठायी नक्षत्र देवतेच्या सुवर्ण प्रतिमेची पूजा करून द्वादश दलाचे ठायी संकर्षणादि द्वादश मूर्ती किंवा द्वादश आदित्य यांची पूजा करावी; व दूर्वा, समिधा, तिल, दुग्ध व आज्य यांनी गायत्रीमंत्राने त्या त्या देवतेस उद्देशून १०८ होम करावा. मरण इत्यादि बहुत पीडा होईल असे असल्यास त्यासाठी सहस्त्र होम करून दहीभाताचा बलि द्यावा; व आचार्यास गोप्रदान व प्रतिमादान करावे, हे थोडक्यात सांगितले. नक्षत्रांच्या भेदाने होम-द्रव्ये, मंत्र, बलिदान धूपादिकांचे निरनिराळे प्रकार, तिथि, वार ह्यांच्या देवता, व मंत्रादिकांचे निरनिराळे प्रकार, यांचा विस्तार पाहाणे असल्यास शांतिमयूख इत्यादि ग्रंथात पहावा. "जातवेदसे०" या ऋचेचा दहा हजार किंवा एक लक्ष जप किंवा नमकानुवाकांनी सहस्त्र कलशांनी शिवास स्नान अथवा पुरुषसूक्ताच्या सहस्त्र आवर्तनांनी सहस्त्र घटांनी विष्णूस स्नान घातले असता ज्वराचा नाश होतो, असे कर्मविपाकात सांगितले आहे किंवा श्रीमद्भागवतातील ज्वरस्तोत्राचा जप करावा.