ध्रुवनक्षत्री व अश्विनी, हस्त, चित्रा, स्वाति विशाखा, अनुराधा, पुनर्वसु, पुष्य, रेवती व धनिष्ठा या नक्षत्री शुभतिथीस भौम, शनि व चंद्र याशिवाय इतर वारी वस्त्रे व भूषणे धारण करावीत. ब्राह्मणाची आज्ञा असल्यास, विवाहादि उत्सव असल्यास; अथवा काही लाभ असल्यास निद्य दिवशीही वस्त्र धारण केले असता ते इष्टदायक होते. ध्रुवसंज्ञक नक्षत्री व पुष्य, पुनर्वसु या नक्षत्री वस्त्रे व अलंकार धारण करणारी व शततारका नक्षत्री स्नान करणारी स्त्री पतीच्या प्रीतीस पात्र होत नाही. पादुका, आसन, शय्यादि पदार्थांचा उपभोग शुभतिथीस, शुभवारी व ध्रुव, क्षिप्र, मृदु, श्रवण, भरणी, पुनर्वसु या नक्षत्री घ्यावा. नवीन वस्त्राचे नऊ भाग कल्पिले असता मधल्या तीन अंशावर ते नवीन वस्त्र फाटेल, जळेल किंवा कर्दमयुक्त होईल तर ते टाकून द्यावे व शांति करावी. शेवटच्या दोन अंशावर जळाल्यास ते वस्त्र फक्त टाकून द्यावे, शांति करू नये. शय्येवरील गादी इत्यादि वस्तु, पादुका व आसन याविषयीही हाच निर्णय समजावा. अनुराधा, अश्विनी, चित्रा, मृग, पुनर्वसु या नक्षत्रांवर शिवणकाम करावे. वस्त्र धारणास सांगितलेल्या काली बुधवाराशिवाय इतर वारी वस्त्र क्षालन करावे. रुपे, सोने व कांसे इत्यादि धातूंच्या पात्रात भोजन करणे असल्यास ते अमृतयोगावरच व चर, क्षिप्र, मृदु आणि ध्रुवसंज्ञक नक्षत्रे असताना करावे. चर, क्षिप्र, मृदु व ध्रुवनक्षत्री आणि शुभवारी अलंकार घडवावेत. मिश्रनक्षत्री व रवि आणि मंगळवारी रत्नजडित अलंकार घडवावेत. याप्रमाणे वस्त्रादि धारणांचे मुहूर्त सांगितले.