संकल्प, अग्निस्थापन इतके कर्म झाल्यावर कलशावर सुवर्णमय इंद्राची व लोकपालांची पूजा करावी. नंतर अग्नीवर चरु शिजवून पळसाच्या समिधा, चरु, आज्य व व्रीहि या प्रत्येक द्रव्याचा एक हजार आठ किंवा १०० "यतइंद्र०" या मंत्राने होम करावा; व लोकपाल देवतांस उद्देशून त्याच द्रव्याचा १०।१० आहुतींनी होम करून कुंभाच्या अग्रभागी लोकपालांचे बलिप्रदान व वायसास बलिप्रदान "ऐंद्रवारुण०" या मंत्राने करावे; व अभिषेकानंतर यजमानाने १०० किंवा दहा ब्राह्मणांस भोजन घालावे. घिरट, उखळ, मुसळ, पाटा, वरवंटा, आसन, पाट, मंचक, इत्यादिक एकाएकी फुटल्यास घृतांत भिजविलेल्या व मधुयुक्त असलेल्या अश्वत्थ समिधांचा प्रजापतीस उद्देशून होम करावा; व १००८ गायत्रीमंत्राने अभिमंत्रण करावे.