कुशोदक सहित पंचगव्यांनी मालेचे प्रक्षालन करावे व ती पिंपळाच्या पानावर ठेवून
"ॐ र्हींअंआंइंईउऊऋऋलृलृंएंऐंओंऔंअंअः कंखंगंघंङं चंछंजंझंञं टंठंडंढंणं तंथंदंधंनं पंफंबंभंमंयंरंलंवंशंषंसंहंक्षं"
या पन्नास मातृकाक्षरांचा मालेवर न्यास करावा. नंतर सद्योजातं०, वामदेवाय०, अघोरेभ्यां०, तत्पुरुषाय०, ईशानः सर्व विद्याना० या पाच मंत्राचा जप करून 'सद्योजातं०' या मंत्राने पंचगव्याने मालेचे प्रोक्षण करावे व शीतोदकाने ती माला प्रक्षालन करावी. यावर 'वामदेवाय०' या मंत्राने तिला चंदनाने घासावे व 'अघोरे०' या मंत्राने धूप दाखवावा. 'तत्पुरुषाय०' या मंत्राने चंदन, कस्तुरी इत्यादिकांचा मालेला लेप करावा व 'ईशानः सर्व०' या मंत्राने प्रत्येक मणि शंभरवेळ किंवा दहा वेळ अभिमंत्रावा. नंतर 'अघोरे०' हा मंत्र म्हणून मालेचा मेरुमणि शंभरदा अभिमंत्रावा. यावर पाच मंत्रांनी मालेची गंधादि पंचोपचारांनी पूजा करावी. याप्रमाणे मालासंस्कारविधि सांगितला.
"कंठाचे ठिकाणी ३२, मस्तकाचे ठायी ४०, प्रत्येक कानात सहा सहा, दोन हस्तांच्या ठायी बारा बारा, दोन बाहुंच्या ठायी सोळा, दोन नेत्रांच्या ठायी एकेक, शिखेच्या ठायी एक, वक्षःस्थळी १०८, असे रुद्राक्ष जो कोणी धारण करितो, तो प्रत्यक्ष शंकर जाणावा," असे बोपदेव म्हणतो. रुद्राक्षदान केल्याने रुद्रपदाची प्राप्ति होते.
लिंगास पंचविंशति पलपरिमित अभ्यंग करवावा. हाताच्या यंत्रापासून काढलेल्या तिळाच्या तेलाने शिवाला स्नान घालावे. शंभर पले
(एक पल = हल्लीचे ४० मासे) उदकाचे स्नान व अभ्यंग पंचवीस पलपरिमित करावा. दोन हजार पल उदकाचे स्नान, ते महास्नान होय. यावर दूध, दही, मध, तूप व साखर यांचे क्रमाने स्नान घालावे. शंकराला शंभर पले घृताचे स्नान घालावे असे सांगितले आहे. मध, दही, दूध ही शंभर शंभर पले घेऊन स्नान घालावे. पंधराशे पले उसाच्या रसाचे स्नान घालावे. शिवाला उष्णोदक व शीतोदक यांनी भक्तीने स्नान घालावे. श्रीविष्णूला दूध, दही, इत्यादि पंचामृतांनी स्नान घालावयाचे ते दशगुणित क्रमाने उत्तरोत्तर घालावे. म्हणजे दुधापेक्षा दही दसपट, व दह्यापेक्षा तूप दसपट असे समजावे. दूध, दही, तूप इत्यादि पंचामृते सारखी घेऊन स्नान घालावे, असेही कित्येक ग्रंथकार म्हणतात.