जो पुरुष स्वप्नात राजा, हत्ती, अश्व, सुवर्ण, बैल व गाय यांना पाहतो त्याचे कुटुंब वृद्धिंगत होईल. बैल अथवा वृक्ष यावर आरोहण केले आहे असे पाहून त्या स्थितीतच जागा होईल तर त्यास द्रव्य प्राप्ति होईल, पांढर्या सर्पाने उजव्या बाजूस दंश केलेला पाहिल्यास दहा दिवसांनी सहस्त्र धन मिळेल. उदकांत असता विंचू, साप इत्यादिकांनी गिळलेले पाहील तर जय, पुत्र, धनप्राप्ति होईल. देवालय अथवा राजगृह व पर्वताचे शिकर यांजवर चढलो व समुद्रात पोहलो असे पाहील तर राज्यप्राप्ति होईल. तलावाच्या मध्ये, कमलाच्या पात्रावर, घृत व क्षीर यांचे भोजन केले असे पाहील तर; बलात्कार कोंबडी व क्रौंच पक्षिणी दृष्टीस पडली असता स्त्रियेची प्राप्ति होईल. साखळदंडाने किंवा दोर्याने बांधिलेले आपणास पाहील तर पुत्र, धन इत्यादि प्राप्त होतात. आसन, बिछाना, पालखी व गाडी इत्यादि वाहन, शरीर व गृह इत्यादिकांना आग लागली असे पाहून जागा होईल त्यास सर्वकाल लक्ष्मी सन्मुख असेल. सूर्यमंडल व चंद्रमंडल पाहिल्यास रोगी असल्यास त्याचा रोगपरिहार व इतरांस धनप्राप्ति होईल. मद्य व रुधिर प्राशन केलेले पाहील तर ब्राह्मणास विद्या व शद्रादिकांस धनप्राप्ति होईल. श्वेतवस्त्र व श्वेतगंध धारण करणार्या सुंदर स्त्रियेने आलिंगन दिलेले पाहिल्यास धन प्राप्त होते. छत्र, पादुका, उपानह व तलवार यांचा लाभ झाला असता धनप्राप्ति; बैल जुंपलेल्या रथावर आरोहण केलेले पाहिल्यास धनप्राप्ति, दह्याचा लाभ झाला असता वेदप्राप्ति; दही व दूध प्राशन केले असता व घृत मिळाले असता यशप्राप्ति; घृत भक्षण केले असे पाहिल्यास क्लेश, आतड्यांनी वेष्टिलेले पाहिले असता राज्यप्राप्ति. मनुष्याच्या चरणाचे मांस भक्षण केलेले पाहिल्यास शंभर लाभ होतील; बाहूभक्षण केले असे पाहिले असता सहस्त्र लाभ; मस्तकाचे मांस भक्षिलेले पाहिल्यास राज्य किंवा सहस्त्र धनप्राप्ति; फेस आलेले दूध प्राशन केलेले पाहिल्यास सोमपान; गहू दृष्टीस पडले असता धनलाभ; यवाचे दर्शन झाल्यास यज्ञप्राप्ति; पांढरी मोहरी पाहिल्यास लाभ; नागपत्र, कापूर चंदन व श्वेतपुष्प यांचा लाभ स्वप्नात झाल्यास सर्व काल लक्ष्मी प्रसन्न होईल. स्वप्नात, कापूस, भस्म, भात व ताक यावाचून सर्व पांढरे पदार्थ पाहिलेले चांगले व गाय, हत्ती, देव, यावाचून पाहिलेले सर्व कृष्ण पदार्थ वाईट. पहिल्या प्रहरात स्वप्न पाहिल्यास एक वषाने फल मिळते, दुसर्या प्रहरात स्वप्न पाहिल्यास ८ महिन्यांनी, तिसर्या प्रहरात पाहिल्यास ३ मासांनी, चौथ्या प्रहरी पाहिल्यास एक महिन्याने अरुणोदयकाली दहा दिवसांनी व सूर्योदय काळी स्वप्न पाहिल्यास तत्काळ फलप्राप्ति होईल.