गर्भाधान संस्कारात स्थापिलेल्या अग्नीस मरुत असे नाव आहे. पुंसवनाचे काली स्थापिलेला अग्नि पवमान, सीमंतोन्नयनी मंगल, जातकर्मसंस्कारी प्रबल, नामसंस्कारी पार्थिव, अन्नप्राशनी शुचि, चौलसंस्कारी सभ्य, व्रत व मौजी इत्यादि व्रती समुद्भव, गोदानाचे काली सूर्य विवाहसंस्कारी योजक व आवसथ्य म्हणजे गृह्याग्निसंबंधी कर्माच्या वेळी स्थापिलेला अग्नि द्विज, या नावाने प्रसिद्ध आहे. प्रायश्चित्त काली स्थापिलेला विट, पाकयज्ञाचे वेळी पावक, पित्र्य कर्माच्या काली कव्यवाहन, दैवकर्माच्या काली हव्यवाहन, शांतिकर्मामध्ये वरद, पौष्टिक कर्मामध्ये बलवर्धन, मृताचे दहनकाली क्रव्याद, अशी अग्नीची नावे जाणून गृह्याग्निसंबंधी कर्मास आरंभ करावा. पळसाच्या काष्ठाची जुहू व खदिराच्या काष्ठाची स्रुवा व स्रुचि ही पात्रे करावीत. हे वृक्ष न मिळाल्यास यथासंभव यज्ञिय वृक्षांची करावीत. यज्ञिय वृक्षाच्या अभावी पळसाच्या मध्यम पर्णांनी किंवा पिंपळाच्या पर्णांनी होम करावा. याप्रमाणे चमस इत्यादिक पात्रेही खदिरादि यज्ञिय वृक्षांचे करावी. काम्यकर्मात प्रतिनिधि चालत नाही. नित्य व नैमित्तिक कर्मात प्रतिनिधि चालतो. काम्यकर्मातही कर्मास आरंभ झाल्यावर प्रतिनिधि करावा असे कित्येक ग्रंथकाराचे मत आहे. मंत्र, कर्म, देवता व कर्ता यांचे ठायी व देश, अरणि आणि काल यांचे ठायी प्रतिनिधि करू नये. कोणत्याही कर्मात निषिद्ध पदार्थ प्रतिनिधिस्थानी योजू नये. कर्माचा जो स्वकाल त्या पुढील काल गौण होय. तर्पण, श्राद्ध, आसन, भोजन, मूत्र, पुरीष या सहांचे ठायी दर्भ निर्माल्य होतात. अभिचारकर्माचे ठायी दर्व्यादि पात्रे निर्माल्य म्हणजे अन्यकर्मस निरुपयोगी होतात. शूद्राच्या कार्यार्थ योजिलेला मंत्र व प्रेतश्राद्धी भोजन केलेला ब्राह्मण हे निर्माल्य होत.