रोग जसा लहान किंवा मोठा असेल त्याप्रमाणे लघुरुद्र, महारुद्र किंवा अतिरुद्र यांचा जप अथवा अभिषेक करावा. विष्णुसहस्त्रनामस्तोत्राचा शंभर, एक हजार किंवा दहा हजार जप करावा. अथवा सौराचा ('उद्यन्नद्य०' या ऋचेचाच) जप, सूर्याला नमस्कार व अर्घ्यप्रदान, "मुंचामित्वा०" या सूक्ताचा जप "अच्युतानंदगोविंद" या नामत्रयाचा जप व मृत्युंजयजप रोग जसा लहानमोठा असेल त्याप्रमाणे सर्व रोग दूर करणारे आहेत.
ज्येष्ठा, मूल, श्रवण, स्वाति, मृदु व क्षिप्र नक्षत्रे आणि पुनर्वसु नक्षत्र ही असता गुरु, शुक्र व चंद्र या वारी औषध घेणे प्रशस्त होय. रिक्तातिथि, चरलग्न, मिश्र व क्षिप्र संज्ञक नक्षत्रे ज्येष्ठा, मूल, पूर्वात्रय, चित्रा, भरणी, श्रवण, धनिष्ठा व शततारका ही नक्षत्रे असता रवि, मंगळ, बुध व शनि या वारी स्नान करावे. वैधृति, व्यतीपात, भद्रा व संक्रांत या दिवशी चंद्रबल व ताराबल असले किंवा नसले तरी रोगमुक्त स्नान करावे.