यानंतर आचार्याने किंवा यजमानाने लिंग अथवा मूर्ती यांचे
"भूःपुरुषमावाहयामि भुवःपुरुषमावाहयामि स्वःपुरुषमा० भूर्भुवस्वःपुरुषमा०"
याप्रमाणे आवाहन करावे व प्रणवमंत्राने आसन देऊन दूर्वा, सावे, विष्णुक्रांता (काळी गोकर्णी) व कमल यांनी मिश्र असे पाद्योदक करून ते
"ॐइमाआपःशिवतमाःपूताःपूततमामेध्यामेध्यतमाअमृताअमृतरसाःपाद्यास्ताजुषतांप्रतिगृह्यतांप्रतिगृह्णातुभगवानमहाविष्णुर्विष्णवेनमः"
या मंत्राने समर्पण करावे. लिंग असेल तर "भगवान महादेवरुद्राय नमः" असा मंत्राच्या शेवटच्या भागात फरक करावा. याचप्रकारे अन्य देवतांविषयीहि कल्पना करावी.
"इमाआपः शिव० आचमनीयास्ता जुषतां प्रतिगृह्य इमाआपः० अर्घ्यास्ताः'
असे म्हणून आचमन व अर्घ्य देऊन देवास पंचामृतस्नान घालून मंत्रांनी शुद्धस्नान घालावे.
"इदंविष्णु" या मंत्राने विष्णूस, व "नमो अस्तु नीलग्रीवाय" या मंत्राने लिंगास स्नान घालावे. नंतर कंकणाचे विसर्जन करून वस्त्र व यज्ञोपवीत देऊन
"इमे गंधाःशुभादिव्याः सर्व गंधैरलंकृताः । पूताब्रह्मपवित्रेण पूताःसूर्यस्य रष्मिभिः ॥"
या मंत्राने "पूता" इत्यादि पूर्वोक्त मंत्राने गंध समर्पण करावे.
"इमेमाल्याःशुभादिव्याः सर्वमाल्यैरलंकृताः । पूताब्रह्मपवित्रेण०" इत्यादि मंत्राने माला अर्पण कराव्या. "इमेपुष्पाःशुभा०" या मंत्राने पुष्पे अर्पण करावीत.
वनस्पतिरसोद्भुतो० धूपोयंप्रतिगृह्यतां । प्रतिगृह्णातुभवान् ॥"
या मंत्राने धूप, अर्पण करावा.
"ज्योतिःशुक्रंच तेजश्च देवानांसततंप्रियम् । प्रभाकरःसर्व भूतानां दीपोयं प्रतिगृह्यताम प्रतिगृह्नातुभवान् "
या मंत्राने दीप दाखवून देवता विष्णु असेल तर संकर्षणादि द्वादश नावांनी पुष्पे अर्पण करावीत. याच द्वादश नावांनी तदर्पण करून पायस, गुडमिश्रित अन्न व चित्रविचित्र अन्न हे "पवित्रंते विततं०" या मंत्राने निवेदन करून संकर्षणादि द्वादश नावांनी घरात सिद्ध केलेल्या कृसराच्या दहा दहा आहुती हवन कराव्यात व त्या अन्नानेच
"शार्ङ्गिणे० श्रियै० सरस्वत्यै० विष्णवे०"
याप्रमाणे होम करावा; व नंतर
विष्णोर्नुकं० तद्स्यप्रियम० प्रतद्विष्णु० परोमात्रया० विचक्रमे० त्रिर्देवःपृथिवीं०
या सहा मंत्रांनि होम करावा. देवता शिव असेल तर दीपांत पूजा करून
"भवायदेवाय० शर्वायदेवाय० ईशानायदेवाय० पशुपतयेदेवा० रुद्रायदेवा० उग्रायदेवाय० भीमायदेवाय० महतेदेवाय नमः"
असे म्हणून पुष्पे अर्पण करावीत. नंतर त्याच नाममंत्रांनी तर्पण करून "पवित्रंते०" या मंत्राने पायस, गुडौदन निवेदन करून "भवाय देवायस्वाहा" इत्यादि आठ नाममंत्रांनी कृसरान्नाचा होम करावा. तिळमिश्रित ओदनास कृसर असे म्हणतात.
"भवस्य देवस्य पत्न्यै स्वाहा" इत्यादि आठ नाममंत्रांनी गुडौदनाचा होम करावा. नंतर "भवस्य देवस्य सुताय स्वाहा" इत्यादि आठ नावांनी हरिद्रौदनाचा होम करावा. यावर
"त्र्यम्बकं० मानोमहान्तं० मानस्तोके० आरात्ते० विकिरिद० सहस्त्राणि०"
या बारा ऋचांनी कृसरान्नाचा होम केल्यावर
"शिवाय० शंकराय० सहमानाय० शितिकण्ठाय० कपर्दिने० ताम्राय० अरुणाय० अपगुरमाणाय० हिरण्यबाहवे० सस्पिञ्जराय० बभ्लुशाय० हिरण्याय०"
या द्वादश नामांनी त्याच अन्नाचा होम करावा. यानंतर "स्विष्टकृत" इत्यादि होम शेष संपूर्ण करून सर्व होमद्रव्यांनी विष्णु अथवा शिव जी देवता असेल तिला बलिदान समर्पण करावे. बलिदान देताना
"त्वामेकामाद्यंपुरुशंपुरातनंनारायणंविश्वसृजंयजामहे । त्वमेवयज्ञोविहितोविधेयस्त्वमानात्मनात्मन्प्रतिगृह्णीष्वहव्यम्"
असा मंत्र म्हणावा. देवता शिव असेल तर नारायणपदाच्या ठायी "रुद्रं शिवं" असे म्हणावे. अश्वत्थाच्या पानावर "भूर्भुवस्वरो" या मंत्राने हुतशेष ठेवून प्रदक्षणा करावी व
"विश्वभुजे सर्वभुजे आत्मने परमात्मने नमः"
या मंत्राने नमस्कार करावा. नंतर आचार्यास बारा, तीन किंवा एक गोप्रदान देऊन ऋत्विजांस दक्षिणा द्यावी; व शंभर अथवा बारा ब्राह्मणांस भोजन घालावे. देवालय नवीन असेल तर जलाशयाचा सांगितलेला प्रतिष्ठाविधी करावा. पण प्रासादविधीमध्ये गाईचा उत्तारणविधी व पात्रीप्रक्षेप (पात्र फेकणे) इत्यादि विधी करू नयेत. वारुण होमस्थानी वास्तु देवतेस उद्देशून होम करावा. याप्रमाणे स्थिरारची व चलाची यांचा साधारण प्रतिष्ठाप्रयोग सांगितला.