प्रत्येक आहुतीस आज्यादि पातळ द्रव्य एक तोळा घ्यावे, लाह्या मूठभर व अन्न म्हणजे चरु ग्रासपरिमित असावा. कंदाचा अष्टमांश व तिल व सातु व इतर धान्ये यांच्या आहुति मृगीमुद्राप्रमाण घ्यावी.
रुप्याच्या किंवा तांब्याच्या पात्रात किंवा मृत्तिकापात्रात अग्नि घेऊन त्या पात्रावर तांब्याच्या पात्राचे आच्छादन घालून अग्नि आणावा. श्रोत्रियाचे घरातून आणलेला अग्नि उत्तम व आपल्या घरातून आणलेला अग्नि मध्यम समजावा. उदकाने प्रोक्षित न केलेले इंधन अग्नीत घालू नये. सदोदीत उपविती व शिखाबद्ध असे असावे. 'सदा' या पदाने शिखाबंधन हे एक कर्मांग असून पुरुषार्थतादर्शक आहे असे सूचित केले असल्यामुळे कर्मकाली शिखाबंधनादिक केले नाही तर दोन प्रायश्चित्ते प्राप्त होतात. इतर काली एकच प्रायश्चित्त घ्यावे लागते, हे सिद्ध होते. दर्भ दहा प्रकारचे सांगितले आहेत. वट, प्लक्ष (पिंपरी) बेल, वेहकळ, चंदन, देवदारु व सरल या वृक्षांच्या समिधाही क्वचित्प्रसंगी सांगितल्या आहेत. प्रथम कल्पाने कर्म करण्याचे सामर्थ्य असताही जो गौण कल्पाने कर्म करितो त्यास कृतकर्माचे पल परलोकी मिळत नाही, अशी श्रुति व स्मृति आहे. आपल्या गृह्यसूत्रात जे काही कमीअधिक कर्म करावयास सांगितले असेल ते यथाशास्त्र केले असता सर्व शास्त्रार्थ केल्यासारखे होते.