प्रयाणकाळी क्रोध, श्मश्रूकर्म, वाति, तैलाभ्यंग, अश्रुपात, मद्य, मांस, गुड, तैल, श्वेततिलकाशिवाय इतर तिलक व श्वेतभिन्न वस्त्र हे वर्जावेत. प्रयाण दिवसापूर्वी श्मश्रू कर्म पांच दिवस, दूध तीन दिवस, मैथुन ७ रात्री व मध, तेल आणि घृत ही प्रयाण दिवशी वर्ज करावीत. संभोगदानापर्यंत स्त्रियेचे रजस्वलात्व व इतर दुष्ट शकुन प्रयाणास वर्ज करावेत. सुमुहूर्तावर स्वतः जाणे अशक्य असेल तर प्रस्थान करावे. इष्ट वस्तु दुसर्या स्थली नेऊन ठेवणे यास प्रस्थान असे म्हणतात. ब्राह्मणाने यज्ञोपवीत, क्षत्रियाने आयुध, वैश्याने मध व शूद्राने फल ही गमनमुहूर्ती दुसर्याच्या घरी नेऊन ठेवावीत. सुवर्ण, धान्य, वस्त्र इत्यादि सर्वांनी ठेवावीत. प्रस्थान केल्यावर राजाने दहा दिवस व इतरांनी पाच दिवस घरी रहावे यापेक्षा अधिक दिवस राहू नये. स्वतः प्रयाण करण्याऐवजी यज्ञोपवीतादि वस्तु बाहेर नेऊन ठेविला असता म्हणजे प्रस्थान केले असता शुभकाली प्रयाण केले असता मिळणार्या फलाचे अर्धे फल मिळते.