मद्याचा अथवा चांडाळाचा स्पर्श झालेली, अग्नीने दग्ध झालेली, ब्राह्मणाच्या रक्ताने दूषित झालेली, प्रेत व पापी यांचा स्पर्श झालेली अशी जी मूर्ति असेल तिची अर्चा पुनः करावी. त्याचप्रमाणे खंडित, स्फुटित, स्थानभ्रष्ट, पूजारहित असलेली व कुत्रा, गाढव इत्यादिकांचा स्पर्श झालेली अथवा पतित, रजस्वला व चोर यांचा स्पर्श जिला आहे तिची पुनः प्रतिष्ठा करावी. खंडित झालेली अथवा भंगलेली मुर्ति विधीने काढून तिच्या जागी दुसरी मूर्ति स्थापावी. मूर्ति भंगेल अथवा चोरीस जाईल, त्या दिवशी उपवास करावा. तांबे इत्यादि धातूंच्या मूर्तीस चोराचा अथवा चांडाळाचा स्पर्श झाल्यास पूर्वी सांगितल्याप्रमाणे तांबे इत्यादि धातूंची शुद्धि करून पुनः प्रतिष्ठा करावी. पूर्वी प्रतिष्ठा केलेल्या मूर्तीची नकळत एक रात्र, एक महिना किंवा दोन महिनेपर्यंत पूजा न होईल अथवा शूद्र, रजस्वला, इत्यादिकांचा स्पर्श होईल तर जलाधिवास करून कलशाने स्नान घालावे. नंतर पंचगव्याने स्नान घालून आठ हजार किंवा आठशे, किंवा अठ्ठावीस कलशांनी शुद्धोदकाने पुरुषसूक्तयुक्त स्नान घालावे. नंतर गंध, पुष्प इत्यादिकांनी पूजा करून गुडौदन समर्पण करावे. याप्रमाणे मूर्ति शुद्ध करावी.
बुद्धिपूर्वक पूजानाश अथवा शूद्रादिकांचा स्पर्श झाला असता पुनः प्रतिष्ठा केली असता मूर्ति शुद्ध होते. कित्येकांच्या मते तर एक दिवस पूजा अंतरल्यास द्विगुण पूजा करावी. दोन दिवस अंतरल्यास महापूजा करावी. यापेक्षा अधिक दिवस अंतरल्यास प्रोक्षणविधि करावा. महिन्यापेक्षा अधिक दिवस अंतरल्यास पुनः प्रतिष्ठा किंवा प्रोक्षण विधि करावा, असे आहे. मलमास, शुक्रास्त इत्यादि असताही पुनः प्रतिष्ठा करावी. देवालय, वापी, कूप, तडाग यांचा भेद झाला असता बाग, सेतु व सभा यांचा नाश झाला असता "इदंविष्णु०" 'मानस्तोके०" 'विष्णोःकर्माणि०' 'पादोस्य०' या चार ऋचांनी चार आज्याहुति हवन करून ब्राह्मणांस भोजन घालावे.