मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|श्रीरंगनाथस्वामीकृत पदसंग्रह|
पदे २६ ते ३०

पदसंग्रह - पदे २६ ते ३०

रंगनाथ स्वामींचा जन्म शके १५३४ परिघाविसंवत्सर मार्गशीर्ष शुद्ध १० रोजीं झाला.


पद २६.
धन्य तें कीर्तन करितां भक्त जन पावन होताती नामें ॥ नाना चरित्नें श्रीहरिची ख्याती वर्णिता डुल्लती प्रेमें ॥धृ०॥
टाळ घोळ वाद्यें नाना गद्यें पद्यें आनंदें नाचती रंगीं ॥ जगदीशाची क्रीडा गाती पवादा देहभावा विसरोनि अंगीं ॥
बाळदशेमाजीं पूतना शोषण कंसचाणुरादि भंगी ॥ हाव भाव कटाक्ष दावुनियां दक्ष अलक्ष लक्षिती योगी ॥१॥
बाळपणीं लोणी चोरितां गौळणी निज ध्यासें लाविल्या ध्यानीं ॥ ज्या त्या घरामाजी असोनि त्यांसी न सांपडे चक्रपाणी ॥
सांपडल्या गळां पदर घालुनियां घेउनि येती गार्‍हाणीं ॥ बांधिती उखळीं वर्णितां जयासी कुंठल्या वेदवाणी ॥२॥
पांवा मोहरी काठी माथां बोनवटी चालतां गाईच्या पाठीं ॥ हमामा हुंबरी यमुना पाबळीं चेंडुफळी वाळवंटीं ॥
वडज्या वांकुडा पेंध्या सुदामा पाथिकर जगजेठी ॥ स्वर्गींचे सुरवर उच्छीष्टा इच्छिती सनकादिक वैकुंठीं ॥३॥
मांडुनियां ठाण त्र्यंबक भजन दैत्यनिर्दाळण केलें ॥ कुब्जा उद्धारण मल्लाचें मर्दन दावावें कीर्तनवेळे ॥
दावाग्नीप्राशन अथवा गोवर्धन उचलिलां करांगुळें ॥ कालिया मर्दुनी गोकुळीं प्रवेशे गाई गोपाळांच्या मेळें ॥४॥
गद्यें पद्यें नाना छंद प्रबंध प्रयातादि विविध स्तुती ॥ अष्टैभाव अंगीं उमटोनियाम चिन्हें आनंदें नाचत गाती ॥
ऐसें कीर्तन ह्मणती विद्वज्जन येणेंचि कैवल्यप्रासी ॥ रंगीं रंगुनियां हेंचि पैं मागणें देईं देईं निजमूर्ति ॥५॥

पद २७ (सासुरवास.)
ऐसा सासुरवास घेऊं नेदी उमस करितो कासावीस नानापरी । भेटों देना सखिवेंसी सांगों कवणापाशीं पिसी झालें घरिचे घरीं ॥धृ०॥
अहंकार सासरा ममता हे सासू या भेणें सौरसु न दिसे द्दष्टी । काम क्रोध दंभ मद मत्सर हे भावे दीर हाणिति मुष्टी ।
आशा तृष्णा नणदा बोलती अपशब्दा प्रतिवचनीं करिताती कष्टी । दशेंद्रिये पोरें अनावरें चोरें विषयीं व्याली सृष्टी ॥१॥
झाडिलें झाडितां फोडिलें फेडितां वरिचे वरी केर होय । जर्जर तनु घर निर्मळ नव्हे कदां तींहीं तोंडें अग्नीचें भय ।
पांचाच्या मेळीं राहणें सर्वकाळीं कैंची आपणा आपली सोय । लक्ष चौर्‍यायशीं गर्भवासीं पडती जन्म मृत्युचे घाय ॥२॥
त्रिविध छेद भेद पिशुणासि समंधसंशयें जाचिति पाहीं । माहेराचें कोणी न देखें मीं स्वप्नीं विश्रांतिचा लेश नाहीं ।
तापलें अनुतापें रुक्तिणी मायबापें विठ्ठले करिजे कृपा कांहीं ॥ तरीच भव भंगे निजानंद रंगे नेती वदती ज्यासि साही ॥३॥

पद २८ (माहेर.)
माहेरीचें सुख काय सांगो मुख माय बापाचें पाहतां ॥
निजानंदें खेळे गदारोळें सखि साजणिच्या मेळें आतां ॥धृ०॥
विदेह पंढरी आत्मा पांडुरंग पिता मुक्ति माता रखुमाई ॥ लडिवाळ मी बाळ सर्वकाळ त्यांच्या वोसंगा रिघालें बाई ॥
ज्येष्ठबंधु भाव पुंडलीकराव करितां तळहात साई ॥ गणगोत महंत संत भाग्यवंत माझें नमन त्यांचे पायीं ॥१॥
नवविध भगिनी लोभें करुनि त्यांनीं झेलुनि वरिचेवरि मजला ॥ मायबापापुढें नेउनि घालितां अविनाश संतोष झाला ॥
दोहीपक्षीं लक्ष लावितां अलक्ष मी ऐसा भाव समजला ॥ हे खुण जाणती अनुभवी इतरां कानडा होउनी ठेला ॥२॥
आषाढी कार्तिकी यात्रेसि येती हरिदास गर्जती गजरीं ॥ दिंडया पताका टाळ मृदंग गरुड टक्के गरुडपारी ॥
ठेवुनि कर कटी उभा जगजेठी समचरण विटेवरी ॥ देव भक्तां भेटी होतां वाळवंटीं तो निजरग भरला ॥३॥

पद २९.
ह्मणउनि उमज पडेना । ह्नणउनि उमज पडेना ॥धृ०॥
भवरोग लागला त्रिविधताप ज्वरें सर्वदां संतप्त देहीं ॥ संकल्प संनिपातें बरळे भलतें भलतें मी कोण ही शुद्धि नाहीं ॥
अह अह शब्दें अहकार हुंबतो आपपर नोळले कांहों ॥ ऐसा व्यथाभूत होउनी पाडला बुडतो जन्ममरणाचे डोहीं ॥१॥
काम्य निषेध हे वावडे वर्जीना स्नेह साडिना प्राणी ॥ श्रवण असतां बधीर शिकविलं नायके निगमाचार्य वचन कानीं ॥
विहिता-चरण हरिस्मरण हें पथ्य राहाटेना दिवसरजनीं ॥ विषयपंकीं लोळे मळ मूत्र खोळे जन्मतां त्रासही न मानी ॥२॥
विद्या वयसा कांता कांचन जन सत्ता कळा कौशल्यता आलो ॥ अभिमानें चढला झाला पांचावला तेणें हे व्याथा शतगुणी झाल् ॥
सद्नुरु सद्वद्य पूणे मात्रा देतां त्याची उपेक्षा केली ॥ सहज निजरगें सर्वांगें आरोग्य व्हावें हे खुंटली बोली ॥३॥

पद ३०.
जानकीजीवना रामा ॥ झडकरी मज पावे मज पावे ॥ध्रु॥
मुनिजनमनविश्रामा ॥ सच्चित्सुखैकधामा ॥ अव्यय अवाप्त कामा ॥१॥
नव सरसिजदलनेत्रा ॥ मकरध्वजारिमित्रा ॥ जलधर साद्दश्य गात्रा ॥ मुनिह्र्दयांबुज मित्रा ॥२॥
त्रिभुवनजन जीवसूत्रा ॥ दशरथ नृपवरपुत्रा ॥ परमामृत रस पात्रा निजरंगा चिन्मात्रा ॥३॥

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP