पदसंग्रह - पदे २४६ ते २५०
रंगनाथ स्वामींचा जन्म शके १५३४ परिघाविसंवत्सर मार्गशीर्ष शुद्ध १० रोजीं झाला.
पद २४६.
अरे तूं तेंचि आहेसि स्वयें ॥ भ्रमला होतासि मोहें ॥
आत्मानात्मविवेकें कोण मी स्वानुभवें पाहें ॥धृ०॥
ब्रह्म सनातन तूं ॥ केवळ सच्चित्सुखघन तूं ॥
पिंड ब्रह्मांड हा मायिक धंदा ॥ जाणुनि तूं राहें ॥१॥
राजा रंकपणें ॥ स्वप्नीं नेलें तें कवणें ॥
भ्रांतिचा गुण याच रितीचा ॥ म्हणतो मी जिव आहें ॥२॥
जीव-शिवातित तूं ॥ निर्गुण ब्रह्म सदोदित तूं ॥
छेदभेदरहित पूर्ण रंग ॥ तूंचि दिव्य मी देईन हें ॥३॥
पद २४७.
मना ऐसा महाराज कोण आहे रे ॥ नाममात्रेंचि जन्म जरा जाय रे ॥धृ०॥
मत्स्य कच्छ पशूसूकर झाला रे ॥ नारसिंह अवतार धरियेला रे ॥
अंबरीष परम सुखी केला रे ॥ अर्जुनाचा सारथी स्वयें झाला रे ॥१॥
दीनवत्सलता काय किती वानूं रे ॥ पार्थालागीं लपविला दिवसा भानू रे ॥
वृंदावनीं वाजवी रम्य वेणू रे ॥ तेणें नादें मोहिल्या गोपि धेनू रे ॥२॥
धरी भक्तांचे उरीं शिरीं पाय रे ॥ पुरी नेली वैकुंठपदा पाहे रे ॥
भिल्लिणीचीं उच्छिष्ट फळें खाय रे ॥ रिसां वानरां एकांत करिताहे रे ॥३॥
अनंत काटी ब्रह्मांडें ज्याचे पोटीं रे ॥ तो हा धांवे गोवळ्या-धेनू-पाठीं रे ॥
खांदा कांबळा घेउनि हातीं काठी रे ॥ निजानंदें रंगला पाठीं पोटीं रे ॥४॥
पद २४८.
होय ऋणी जगदीश ॥ त्याचा ॥धृ०॥
देवद्विज गुरुदास्य करुनियां ॥ भूतदया गंभीर ॥१॥
सारासार विचार करुनियां ब्रह्मपदीं मन स्थीर ॥२॥
निजरंगें रंगुनियां राहे ॥ सत्संगी जो धीर ॥३॥
पद २४९.
विनायकावांचुनी देव नाहीं ॥ विनायकावांचुनी देव नाहीं ॥धृ०॥
जगन्निवास मोरया ॥ तुम्ही त्यासमोर या ॥ संशय न धरुनि कांहीं ॥१॥
अनंत ब्रह्मांडें उदरीं ॥ तो हा लंबोदर पाहीं ॥२॥
अभय हस्त शिरीं धरी ॥ स्मरतां निर्विघ्न करी ॥ निज रंगीं सर्वदांही ॥३॥
पद २५०.
दैवत श्रीगुरुराज बाई माझें दैवत श्रीगुरुराज ॥धृ०॥
ब्रह्मादिक जे ध्यानीं ध्याती मानुनि हाचि उपाय ॥१॥
चारी मुक्ती दासी होती नमितां गुरुचे पाय ॥२॥
सहज पूर्ण निज रंग विना मज नाहीं तरणोपाय ॥३॥
N/A
References : N/A
Last Updated : November 11, 2016
TOP