मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|श्रीरंगनाथस्वामीकृत पदसंग्रह|
पदे ५२६ ते ५३०

पदसंग्रह - पदे ५२६ ते ५३०

रंगनाथ स्वामींचा जन्म शके १५३४ परिघाविसंवत्सर मार्गशीर्ष शुद्ध १० रोजीं झाला.


पद ५२६.
हरी मी भक्तिचा भुकेलों रे ॥ केला तैसा झालों रे ॥ध्रु०॥
सुयोधनाच्या उपचाराची न धरुनि आशा पोटीं रे ॥ विदुराच्या त्या पातळ कणिया पूर्णका मी चाटी रे ॥१॥
धांवुनि गोलों द्रौपदिच्या एका भाजीपानासाठीं रे ॥ पांडवजनप्रतिपाळक म्हणतां रक्षिलें संकटीं रे ॥२॥
निर्गुण परात्पर ब्रह्मादिकां दुर्लभ भेटी रे ॥ पार्थाचे हय धूतां तो मी चाबुक खोवीं मुकुटीं रे ॥३॥
अनंतकोटी ब्रह्मांडें एका रोमरंध्रा-निकटीं रे ॥ त्या मज एका तुलशीपत्नें सोडविलें शेवटिं रे ॥४॥
पुंडरिकास्तव उभा राहिलों चंद्रभागातटीं रे ॥ निजानंदें रंगलों मी ठेवुनियां कर कटीं रे ॥५॥

पद ५२७.
यावें रविवंशाभरणा ॥ हो यावें ॥ध्रु०॥
सत्य ज्ञानानंत अपारा ॥ विगतविकारा ॥ जगदुद्धारा ॥ निगमागमसारा ॥१॥
निर्गुण नित्य निरामयधामा अवाप्तकामा ॥ मंगळनामा ॥ मुनिजनमनविश्रामा ॥२॥
विश्वविलासा ॥ श्रीजगदीशा ॥ पूर्ण परेशा ॥ निजरंगा अविनाशा ॥३॥

पद ५२८.
क्षीरनिधिजाकांता ये रे ॥ अच्युतानंता ये रे ॥ध्रु०॥
करुणासागर दीनदयाळा ॥ गोकुळपाळा ॥ तमालनीळा ॥ भक्तवत्सला निजसुखकल्लोळा ॥१॥
टाकुनिया गरुडा मनपवना ॥ पतितपावना ॥ विश्वजीवना ॥ चित्सुखभुवना ह्रदयवृंदावना ॥२॥
विद्वज्जन मुनिपंकजभृंगा ॥ नित्य नि:संगा ॥ नीरदरंगा ॥ अभंग अंगा सहज पूर्ण निजरंगा ॥३॥

पद ५२९.
तो योगी ॥ विषय विरागी ॥ अंतरीं नि:संगी ॥ शम दम करुणा अंगीं ॥
निजसुख आपुलें भोगी ॥ नित्यानित्य विचार विलोकुनि ॥ द्दश्य पदार्थही त्यागी ॥ तो योगी ॥१॥
आघातीं ॥ जो न ढळे कधि चित्तीं ॥ नच सोडी हरिभक्ती ॥ लेखी तनु धन माती ॥
अनृत न ये वचनोक्ती ॥ लाभालाभ स्तुति निंदा सम तो केवळ निजमूर्ति ॥ आघातीं ॥२॥
तो पाहें ॥ सर्वहि ब्रह्मचि आहे ॥ निजबोधें डुलताहे ॥ गर्जन तर्जन साहे ॥ देहाभिमान न वाहे ॥
त्रिभुवनिंचा जो अधिपति होउनि अखंड तन्मय राहे ॥ तो पाहें ॥३॥
तो ज्ञानी ॥ सत्ता सुख जो मानी ॥ चिद्रत्नाची खाणी ॥ लावुनि ऐक्य निशाणी ॥
वेद जयातें वाणी ॥ रंगातित निजरंगपदीं जो खेळे अचळ विमानीं ॥ तो ज्ञानी ॥४॥

पद ५३०. [काशीराजकृत. चाल-सदर.]
श्रीरंगा ॥ मुनिमनपंकजभृंगा ॥ अज अव्यय नि:संगा ॥ शाश्वत पूर्ण अभंगा ॥
परिपूरीत अव्यंगा ॥ चित्सागर नागर गुरुवर तूं कारण विश्वतरंगा ॥ श्रीरंगा ॥१॥
निष्कामा ॥ अपरिमीत गुणग्रामा ॥ सज्जनमंनविश्रामा ॥ सकळ मंगळधामा ॥
अद्वय अरुप अनामा ॥ सच्चिद्धन श्रुतिसार परात्पर श्रीगुरु आत्मारामा ॥ निष्कामा ॥२॥
अविनाशा ॥ तूं निजनिर्विशेषा ॥ देवा पूर्ण परेशा ॥ पुरविं मनींची आशा ॥
देउनि सुख संतोषा ॥ श्रीरंगानुजतनुज शरण तुज तोडीं दुर्भवपाशा ॥ अविनाशा ॥३॥

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP