मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|श्रीरंगनाथस्वामीकृत पदसंग्रह|
पदे ५१६ ते ५२०

पदसंग्रह - पदे ५१६ ते ५२०

रंगनाथ स्वामींचा जन्म शके १५३४ परिघाविसंवत्सर मार्गशीर्ष शुद्ध १० रोजीं झाला.


पद ५१६.
हें मज कोणें सांगितलें ॥ नकळत कळतां घडलें हो पूर्पीं झालें तें झालें ॥ध्रु०॥
क्षणिक सुखाची आशा धरुनी अविनाशा मी उबगों ॥ राज्य त्यजुनि विषयांची भिक्षा दारोदारीं मागों ॥१॥
या नरदेहीं स्वपद पावणें करुनी भजन हरीचें ॥ तें मी सोडूं पतनही जोडूं अंतीं राहुनि कांचे ॥२॥
आतां हाचि पराक्रम करणें वरणें निजरंगातें ॥३॥

पद ५१७.
सखया स्मरण करीं रे अंतरीं भाव धरीं रे ॥ध्रु०॥
विस्मृति जीवपद त्याचे पोटीं अनंत दु:खें कोटी ॥ जन्ममरणसंसरणयातना भोगणें आटाआटीं ॥१॥
स्मरणें तो शिव विस्मति तो जिव कारण भवदु:खाचें ॥ शिवपद चिन्मय नित्य निरामय शाश्वत सहज सुखाचें ॥२॥
नाहं देहो न मे देहो म्हणतां ब्रह्म निजांगें ॥ विसर स्मरणातीत सदोदित सहज पूर्ण निजांगें ॥३॥

पद ५१८.
येईं येईं रे श्रीरामा ॥ मुनिजनमनविश्रामा रे ॥ध्रु०॥
अगम्य महिमा निगमागमा पुराण पुरुषोत्तमा ॥ अनतकोटा ब्रह्मांडनायका सच्चित्सुखैकधामा ॥१॥
शेष रमा विधि वर्णिति परि ते न कळे तव गुणसीमा ॥ अभंग रंगा नि:संगा निजमूर्ती निष्कामा ॥२॥

पद ५१९.
ते व्यभिचारिणि जाणावी ॥ बुद्धि सती गोपाळा सोडुनि देहभावासि खुणावी ॥ध्रु०॥
क्षणक्षणा अवयव अवलोकीं लोकीं मीपण मिरवी ॥ स्वरूपीं पराङमुख विषयांचें सुख वांछित सेवित बरवी ॥१॥
पूर्णकाम निजराम मनोरथ मनिंचे अवघे पुरवी ॥ गंगा सिंधु उल्लंघुनि वेगीं बिंदुमात्र निर नुरवी ॥२॥
हा निज रंग त्यजुनि कुसंग सदोष गुणाचे नाना ॥ करणें त्याहुनि मरणें बरवें न मानी याहि वचना ॥३॥

पद ५२०.
यांचा भरंवसा काय ॥ भासे मृगजळन्याय ॥ध्रु०॥
येते जाते घेते देते सुकृत दुष्कृत करिते ॥ शाश्वत दिसते परि क्षणभंगुर मार्ग क्षणार्धें धरिते ॥१॥
तापत्रय षडिप त्निगुणात्मक दु:ख मूळ भवरोगी ॥ पंचकोश बंदीं पडले कृतकर्में फळ भोगी ॥२॥
अस्थि मांस मळमूत्रें भरलें सरलें उरलें नकळे ॥ टाकुनि गृह सुत दारा वारा जातो झांकुनि डोळे ॥३॥
इंद्रजाळ बहु काळ न राहे भासे लव पळ घटिका ॥ द्दश्यभास हा नामरुपात्मक प्रपंच समुळीं लटिका ॥४॥
अंजुळिंचें जळ क्षीण पळें पळ केवळ जीवित तैसें ॥ जाणुनियां निजरंगें ज्ञानी रंगले अनायासें ॥५॥

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP