पदसंग्रह - पदे २४१ ते २४५
रंगनाथ स्वामींचा जन्म शके १५३४ परिघाविसंवत्सर मार्गशीर्ष शुद्ध १० रोजीं झाला.
पद २४१.
पुंडरिकें ऐसा कैसा आकळिला वाग रे ॥
ब्रादिक देवाच्या हातीं नातुडे श्रीरंग रे ॥धृ०॥
जप-तप-ध्यानें योगीं श्रमतां लाग नलगे ज्याचा रे ॥
भक्तिवागुरें सांपडला हा अतीत जो चहुं वाचां रे ॥ ॥१॥
जुनाट परि हा येथें म्हणवी अठ्ठावीस युगांचा रे ॥
धरूनियां वागविती मोठा भाव दरवेशाचा रे ॥२॥
द्दष्टि पडतां सोडित नाहीं जीव घेणा सकळांचा रे ॥
असुर बकी बक कंस चाणुर अंतक शिशुपालाचा रे ॥३॥
जीव घेईल न चुके धरा पाड कायसा याचा रे ॥
निजानंद परि विठ्ठल म्हणवी संग धरुनि रंगाचा रे ॥४॥
पद २४२. (अभंग)
दिनानाथा कृष्णराया ॥ भक्तवत्सल करुणालया ॥धृ०॥
गोवर्धनाहुनि आलासी ॥ येथें निवांत राहिलासी ॥१॥
कर कां कटीवरि ठविले ॥ गाई गोवळ काय केले ॥२॥
ठाण देहुडें अधरिं मोहरी ॥ आतां समपदविटेवरी ॥३॥
तूं निष्कर्म अलिप्त कर्में ॥ नेणो गोपी वदल्या वर्में ॥४॥
भक्ता पुंडरिकासाठीं ॥ वास केला भीमातटीं ॥५॥
सहज पूर्ण तूं निजरंग ॥ आतां नाम पांडुरंग ॥६॥
पद २४३. (अभंग)
बोलें शरय़ूतीरनिवासा ॥ मुनिमानस-राजहंसा ॥धृ०॥
चंद्रभागा सरोवरीं ॥ कर ठेविले कटीवरी ॥१॥
कां टाकिले धनुष्यबाण ॥ क्षात्रधर्माचें कारण ॥२॥
नाना अवतारीं पावुनि श्रम ॥ येथें पावलां विश्राम ॥३॥
वधुनि रावण राक्षसराणा ॥ लंका दिधली बिभीषणा ॥४॥
नळ नीळ जांबुवंत ॥ कोठें आहे अंजनिसुत ॥५॥
धरुनियां भक्तलोभा ॥ कां रे गोवळ-वेषें उभा ॥६॥
देवां बंदीमोचन करुनी ॥ रामराज्य त्रिभूवनीं ॥७॥
निजरंगा आत्मारामा ॥ मुनिमानस निजसुखधामा ॥८॥
पद २४४.
मना निजहित काय रे विचारिलें ॥धु०॥
मी माझें हा पदार्थ ॥ मानुनियां निश्वितार्थ ॥ विषय विष इंद्रियांसी चारिलें ॥१॥
कोण सोडवील तेव्हां ॥ अंतकाळीं त्वरें जेव्हां ॥ यमधर्में तुज पाचारिलें ॥२॥
मुनिजनविश्रामधाम ॥ रंग निजमूर्ति राम ॥ अनुतापें नाम नुच्चारिलें ॥३॥
पद २४५.
पांडुरंगे तूं येगे येगे ॥धृ०॥
भीमातटवासिनी ॥ भक्ताचिये जननी ॥
येई वेगें धांवुनि ॥ प्रेम-पान्हा मज देगे ॥१॥
श्रुति स्मृति सारे ॥ अज अविका रे ॥
जगदुद्धारे ॥ निर्गुण नित्य नि संगे ॥२॥
सत्य-ज्ञानानतें ॥ अखिल अवाप्ते ॥
निजानंद मूर्ते ॥ रंगुनि पूर्ण अभंगे ॥३॥
N/A
References : N/A
Last Updated : November 11, 2016
TOP