मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|श्रीरंगनाथस्वामीकृत पदसंग्रह|
पदे ४०१ ते ४०५

पदसंग्रह - पदे ४०१ ते ४०५

रंगनाथ स्वामींचा जन्म शके १५३४ परिघाविसंवत्सर मार्गशीर्ष शुद्ध १० रोजीं झाला.


पद  ४०१. [चाल-अब तुम कब सुमरो गे राम]
हरिविण कोण करिल कैवाड ॥
गर्भीं परिक्षिती दुर्घट जाणोनि घाली सुदर्शन आड ॥धृ०॥
विचित्न तांडव करुनी पांडव रक्षीले पाळिला लाड ॥
अंबरीष प्रर्‍हाद सोडविले देखुनि संकट जाड ॥१॥
देहसंबंधी पुत्न मित्र गोत्रज लाविति लाघव वाड ॥
लक्षुनि निर्धन सर्व उपेक्षिति या परिची ते द्वांड ॥२॥
होउनि नि:संग निजानंदें रंग सोडुनि सर्वही चाड ॥
हाचि उपाय करी शुक नारद कोण तुझा पडिपाड ॥३॥

पद  ४०२.
श्री रघुवीरा धीरा यावें निजमंदिरा ॥ सुकुमारा ॥धृ०॥
रामा तुजविणें अर्ध क्षण निमिष न कंठे ॥ उदारा ॥१॥
नि:संगा निजरंगा अभंगा ॥ अविकारा ॥२॥

पद ४०३.
वाघानें अखंड घरीं थारा केला निरंतरीं ॥ सावध व्हा रे झडकरी समूळ खाईल ॥१॥
दाहा पिलीं जया मागें झेंपावती लागवेगें ॥ देखत खाताति सर्वांगें या प्राणियासी ॥२॥
थोर थोरां न ये आया न दिसे जयाचें तया ॥ आयुष्य घालुनि चारा या पोसितां कां रे ॥३॥
न हालतां जवळुन ब्रह्मांड येतो फिरोन ॥ खातसे जवळ बैसोन न दिसे कोणा ॥४॥
ऐसियाची धाडी मोठी बांधले कोटयानकोटी ॥ म्हणुनि रिघाले पाठीं या श्री गुरुच्या ॥५॥
बा नारंग करी भेद पाश-धारी निजानंद ॥ न मारितां करीं विनोदं लाविला सेवे ॥६॥

पद  ४०४.
मी वासुदेव येथें आलों ॥ सखा सर्वांचा यालागीं झालों ॥धृ०॥
मी डोळियांचा निज डोळा ॥ डोळे देखति हे माझी कळा ॥
मी जीवाचा निज जिव्हाळा ॥ गुरुकृपें ऐसा सोहळा गा ॥१॥
मी चरणाचे निज चरण ॥ चरण चालती माझेनि जाण ॥
वाचे वाचा मी आपण ॥ गुरुकृपें बाणली खुण गा ॥२॥
गुरुरायासि रिघे शरण ॥ जेणें पावसि हे निर्वाण खुण ॥
तेणें चुकेल जन्ममरण ॥ निजानंदें तूं रंगसी जाण ॥३॥

पद  ४०५. [राग देस]
देवाधिदेवा भजन मीं कैसें करूं ॥धृ०॥
अनंत अपरांपरु श्रुतिसि न कळे पारु ॥ निर्धार कैसा धरूं ॥१॥
जरी मी म्हणवितों भक्त तरी मी औट हात ॥ तुझिया स्वरूपासि नाहीं अंत ॥२॥
जरी मी ऐक्य तुजसीं कैंचा ठाव भेदासी ॥ अखंड खंडणा करितां दोषी ॥३॥
निरुपमा उपमा देणें अनामा नाम घेणें ॥ लिंग भेद हा वेद ह्मणें ॥४॥
हरि म्हणें परिसें मात लहरी चाले सागरांत ॥ दिसताहे द्वैत परी अद्वैत ॥५॥
भजन ऐसें किजे अभेदभावें ॥धृ०॥
शिव होउनि शिवा यजा श्रुति या बोलती गुजा ॥ अभेद भक्ती हे भक्तराजा ॥६॥
मींपण सांडुनियां ठायीं आप-आपपणा निरखुनि पाहीं ॥ श्रीहरी भरलासे दिशा दाही ॥७॥
उदकीं तरंग क्रीडती हेमीं नग जैसा म्हणती ॥ देव भक्त ही येचि स्थिति ॥८॥
देवभक्तां नाहीं भदे भजन हें अभेद ॥ अभेदें रंगे निजानंद ॥९॥

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP