मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|श्रीरंगनाथस्वामीकृत पदसंग्रह|
पदे ५५१ ते ५५५

पदसंग्रह - पदे ५५१ ते ५५५

रंगनाथ स्वामींचा जन्म शके १५३४ परिघाविसंवत्सर मार्गशीर्ष शुद्ध १० रोजीं झाला.


पद ५५१.
नारायणपरायण झाल्या ॥ या मनोवृत्ती ॥ गंगासागरीं मिळाल्या ॥ध्रु०॥
मिळोनियां मिळती दिनरजनीं ॥ अनन्य भावें भवद्भजनीं ॥ चित्सागर होउनि ठेल्या ॥१॥
सोहंशब्दें गर्जती घोषें ॥ प्रवाहरूपें अति संतोषें ॥ समसाम्य पूर्ण पावल्या ॥२॥
त्रिविध छेदभेदरहित ॥ काळत्रयीं अबाधित ॥ निजानंदें रंगीं रंगल्या ॥३॥

पद ५५२.
कळों आली माव रे भक्तिपाशीं देव रे ॥ न पाहेचि याति कूळ कर्म मूळ भाव रे ॥ध्रु०॥
कोण पुण्यश्लोक रे गोकुळिंचे लोक रे ॥ गोपवेषें जयां घरीं ब्रह्मांडनायक रे ॥१॥
दुर्लभ ब्रह्मादिकां त्यासि गोपी बायका ॥ हर्षें नाचविती वाजवुनि करताळिका ॥२॥
प्राणाच्या निरोधनें नव्हे साध्य साधनें ॥ लीलारूपविग्रही तो चारिताहे गोधंनें ॥३॥
भाविकांचा बंध रे तोडी जगद्वंद्य रे ॥ यशोदेनें उखळीं तो बांधिला गोविंद रे ॥४॥
ज्याचा जैसा हेत रे तया तैसा होत रे ॥ निजानंदें पूर्णंरंगीं रंगला अनंत रे ॥५॥

पद ५५३.
उद्धवा समज रे माधवा समज रे ॥ नाहीं येणें जाणें निज गुज हें उमज रे ॥ध्रु०॥
घटाकाश वाटे रे चाले ऐसें वाटे रे ॥ उपाधिभेदें भासे परि तें बांधवेना मोटें रे ॥१॥
रविबिंब बिंबलें जळीं नाहीं तिंबलें ॥ इक्षुरसीं मधुर ना तें आंबलें ॥२॥
प्रकट ना तें गुप्त रे बंधनातें गुप्त रे ॥ सर्वीं सर्वातीत तैसा मी येथें अलिप्त रे ॥३॥
चळेना ढळेना वांकेना वळेना ॥ मळेना जळेना ब्रह्मादिकां आतळेना ॥४॥
निर्गुण नि:संग रे अक्षयी अभंग रे ॥ निजानंदें शोभतों मी सहज पूर्ण रंग रे ॥५॥

पद ५५४.
ऐसा सखा कोण रे हरिल माझा शीण रे ॥ आणुनि भेटवूनी कृष्णा तृष्णा पुरविला जाण रे ॥ध्रु०॥
वाहतें त्याचिच आण रे करीन आधिन त्या त्नाण रे ॥ हरिशीं योग करुनीं जाळील संचित्क्रियमाण रे ॥१॥
लागनि संशय बाणु रे मांडिलें निर्वाण रे ॥ हरिशीं योग नव्हतां तितुकें साधन अप्रमाण रे ॥२॥
जगनग चित्सुवर्ण रे पाहतां सहज पूर्ण रे ॥ गोकुळिं गोपाळ यापरि दावितो निजखूण रे ॥३॥
छेदभेदेंवीण रे निराकार निर्गुण रे ॥ वाजवुनि मोहरी तो मन मोहरीतो यदुभूषण रे ॥४॥
वंदुनि याचे चरण रे होऊनि अनन्य शरण रे ॥ निजरंगें रंगवुनी पुनरपि चुकवीं जन्ममरण रे ॥५॥

पद ५५५.
संसारसागर मोठा दुस्तरतर मज तरवेना ॥ध्रु०॥
देवाधिदेवा रुक्मिणीरमणा ॥ अच्युतानंता धांवें पावें श्रीकृष्णा ॥
तुजवीण कोण शीण सोशी ॥ टाकुनि हे आसोशी ॥ तुझिया निज भजनाची ॥१॥
कामक्रोधादिक षड्‌वैरी ॥ जाचिती अनुदिन तृष्णा कल्पना नानापरी ॥
त्रिविध तापें अति संतप्त ॥ सुखलेश नाहीं प्राप्त देहाभिमानेंकरुनी ॥२॥
आतां सोडवीं दीनबंधू ॥ भक्तकामकल्पद्रुम तूं ॥ भवहरणा करुणासिंधु ॥
सच्चिदानंदकंदा ॥ सहज पूर्ण निजानंदा ॥ नि:संगा श्रीरंगा ॥३॥

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP