पदसंग्रह - पदे ४९१ ते ४९५
रंगनाथ स्वामींचा जन्म शके १५३४ परिघाविसंवत्सर मार्गशीर्ष शुद्ध १० रोजीं झाला.
पद ४९१.
या संतांचे संगती ॥ लागतां जिव शीव होती ॥ध्रु०॥
कामादिक दुर्जय षडैवरी ॥ आसुरी गुण हे भंगती ॥१॥
नवविध भक्ति विरक्ती प्रबोधें ॥ चुकती नाना दुर्गती ॥२॥
स्वच्छंदें निर्द्वंद्वें साधक ॥ निजानंदें रंगती ॥३॥
पद ४९२.
या नरदेहीं तरिच बरें ॥ध्रु०॥
सत्कर्में ब्रह्मार्पण घडती निरहंकृति आदरे ॥१॥
संतसमागम शास्त्रसुसंगम वदनीं वचन खरें ॥२॥
सहज पूर्ण निजरंगें रंगुनी विदेहत्वें विचरे ॥३॥
पद ४९३.
माझा स्वामी सद्नुरु समर्थ मस्तकीं ॥ध्रु०॥
अनंत ब्रह्मांडीं एक सत्ता ज्याची ॥ व्यापिलें जग नग मस्तकीं ॥१॥
ज्याच्या कृपाबळें घातला तोडरीं ॥ कळिकाळ नेमस्तकीं ॥२॥
स्वच्छंदें निर्द्वंद्वें पूर्ण निजानंदें ॥ रंगुनी झालों मस्तकीं ॥३॥
पद ४९४. [राग पिल्लू]
गेला मान सांवरील कोण हरिविणे ॥ध्रु०॥
शरण मनोभावें त्यासिच जावें ॥ सार्थक तरिच या जिणें ॥१॥
भक्तांचा पूर्ण काम करितां निजमूर्ति राम ॥ पडों नेदी सर्वथा उणें ॥२॥
पूर्वीं रक्षिलें पुढें रक्षाया ॥ भक्तजनालागीं अवतार घेणें ॥३॥
कृतनिश्चय हाचि करो निजानंदें रंग भरो ॥ कैंचें मग येणें जाणें ॥४॥
पद ४९५.
राम सखा करुंया आतां ॥ध्रु०॥
नवविध भक्तिविरक्तिप्रबोधें ॥ ध्यान मनीं धरुंया आतां ॥१॥
याविण सर्वही शत्रुसम मज ॥ हें मनिं विवरूंया ॥२॥
निजरंगें नि:संगें मनिंचा ॥ संशय वारुं या ॥३॥
N/A
References : N/A
Last Updated : November 11, 2016
TOP