पदसंग्रह - पदे ४६६ ते ४७०
रंगनाथ स्वामींचा जन्म शके १५३४ परिघाविसंवत्सर मार्गशीर्ष शुद्ध १० रोजीं झाला.
पद ४६६.
जग नग हेम हरी ॥ किंवा उदकावरि लहरी ॥ध्रु०॥
नानारूपें नामें विविधें ॥ कारण पाहातां हेमचि नुसतें ॥१॥
नामरुपातित अस्ति भाति प्रिय ॥ निरुपाधिक अज अद्वय अक्रिय ॥२॥
चित्-उदधीचे बुद्वुद जीव ॥ निजरंगे शोभति अतएव ॥३॥
पद ४६७.
विचरें स्वानुभवें त्याला मानव न म्हणावें ॥ध्रु०॥
गोडी गुळ आकार गुळाचा ॥ निवडूं जातां कुंठित वाचा ॥१॥
लोह कार्य परिसाच्या संगें ॥ झालें पूर्ण सुवर्ण निजांगें ॥२॥
नामरुपाचा संग भंगला ॥ सहज पूर्ण निजरंग रंगला ॥३॥
पद ४६८. [चा.-लछिमनबालाको नहि बोला]
हरि नारायण गा होसी ब्रह्मपरायण गा ॥ध्रु०॥
व्याध अजामिळ वाल्मिक पापी ॥ तरले तरती पाहा अद्यापी ॥१॥
अविश्वास संशय हे दोषी ॥ मारिसि तरि तूं ब्रह्मचि होसी ॥२॥
नामापरतें नाहीं सार ॥ निजरंगें पावसि परपार ॥३॥
पद ४६९.
शरण तूं जाईं रे ॥ त्या श्रीहरिचे पायीं रे ॥ध्रु०॥
सानुकूल हरी असतो जेव्हां ॥ काय उणें तुज होइल तेव्हां ॥१॥
लक्ष्मीकांत अनंत हस्तें ॥ नेईल तैं प्रतिकूल समस्तें ॥२॥
सांडुनि संकल्पाचा संग ॥ सत्वर तूं. निजरंगें रंग ॥३॥
पद ४७०.
द्दश्य अद्दश्य होतां ॥ याची करिसी कां चिंता ॥ध्रु०॥
गोचर नामरुपात्मक स्थिरचर ॥ असत् विकारी जड क्षणभंगुर ॥१॥
चित्सुवर्ण शाश्वत परमेश्वर ॥ भास मात्र जग नग हा नैश्वर ॥२॥
टाकुनि अज अव्यय निजरंग ॥ धांवत उखरीं जेविं कुरंग ॥३॥
N/A
References : N/A
Last Updated : November 11, 2016
TOP