पदसंग्रह - पदे १७१ ते १७५
रंगनाथ स्वामींचा जन्म शके १५३४ परिघाविसंवत्सर मार्गशीर्ष शुद्ध १० रोजीं झाला.
पद १७१.
मी काय बोलों बोलीं दर्शनें कुंठित झालीं ॥ कर्णें विसरलीं कार्यें आपुलीं ॥धृ०॥
श्रीहरिच्या नामस्मरणें ॥ वाचा पांगुळली तेणें ॥ समुळीं खुंटलें येणें जाणें ॥१॥
श्रीहरिचें पाहातां रूप ॥ नेत्रीं द्दश्याचा लोप ॥ होऊनि कोंदला आपे आप ॥२॥
बुद्धी बोधली बोधें ॥ रंगुनि मन निजानंदें ॥ विचरें स्वछंदें निर्द्वंद्वें ॥३॥
पद १७२.
तचि संत सज्जन गुरुभक्त ॥ तेचि विरक्त ॥
तरोनि तारक विध्युक्त ॥ तेचि जीवन्मुक्त ॥धृ०॥
श्रीहरी सद्नुरु परब्रह्म ॥ तिन्ही नामें निष्काम ॥
जाणति गुह्य याचें सुवर्म ॥ तेचि पुरुषोत्तम ॥१॥
एका मारी एकासि तारी ॥ होउनि अवतारी ॥
धरुनि सम विषम अंतरीं ॥ ह्मणवी मी मुरारी ॥२॥
परब्रह्म पूर्ण परात्पर ॥ वेदां न कळे पार ॥
गुप्त ते अप्राप्त निर्धार ॥ कैसा होय उद्धार ॥३॥
गुरुकृपा होय ते क्षणीं ॥ काष्टीं पाषाणीं ॥
ब्रह्मानंद शास्त्रीं पुराणीं ॥ बोले वेदवाणी ॥४॥
शर्करा हरि पर्वत परिपूर्ण ॥ गोडी ते ब्रह्म जाण ॥
सद्नुरु निजानंद आपण ॥ रंगातीत निर्गुण ॥५॥
पद १७३.
पिंड ब्रह्नांड रचियलें येणें ॥ रमारमणें नारायणें ॥धृ०॥
कैसीं निर्मिलीं पंचभूतें ॥ निज मायेचिनि हातें ॥१॥
खेळ खेळोनियां निराळा ॥ त्याची अतर्क्य न कळे लीळा ॥२॥
मृगें भुललीं मृगजळासी ॥ सुर्य अलिप्त आकाशीं ॥३॥
भासे विवर्त हा उपादानीं ॥ जन विजन हें जनार्दनीं ॥४॥
जळीं म्हणताती ओघ तरंग ॥ पूर्ण निजानंदीं रंग ॥५॥
पद १७४. (चाल-कळों मावरे भक्तिपाशिं.)
मिथ्या नामरुपा रे ॥ कांसविचें तूप रे ॥
कार्य कारण मिथ्या नाम ॥ अवघें चित्स्वरूप रे ॥धृ०॥
हेमीं नाना नगरे ॥ कामीं नाना जग रे ॥
जग नग विचारितां रज्जु न भुजंग रे ॥१॥
सोनें सोनेपणें रे ॥ कैंचें तेथें लेणें रे ॥
जगीं जगन्नाथ जाणे धन्य त्याचें जिणें रे ॥२॥
पाहातां अंतरंग रे ॥ तो चित्सुरंग रे ॥
द्वेताद्वैतातीत पूर्ण निजानंदीं रंग रे ॥३॥
पद १७५.
श्रवण हो हरिगुण श्रवण करा ॥धृ०॥
श्रवण मनन निजध्यास ॥ साक्षात्कार होय ऐसें विवरा ॥१॥
ग्राम्य गीत कळा सकळा विकळा ॥ भुलविती विषयी नरा ॥२॥
हरिलीलाचरितें सुख-भरितें ॥ निजरंगीं मोहरा ॥३॥
N/A
References : N/A
Last Updated : November 11, 2016
TOP