पदसंग्रह - पदे १५१ ते १५५
रंगनाथ स्वामींचा जन्म शके १५३४ परिघाविसंवत्सर मार्गशीर्ष शुद्ध १० रोजीं झाला.
पद १५१.
हरीभक्त, संरक्षी त्याचा कैपक्षी निजांगें ॥ गर्भवासा येणें याचि कारणें श्रीरंगें ॥धृ०॥
निर्गुण ब्रह्म अनाम परात्पर अद्वय अज अविकारी ॥ प्रर्हादाकारणें होउनि सगुणरूपें अवतारी ॥
सर्वही अपाय तृणवत केले ॥ मर्दुनि दानव वैरी ॥ अन्यय शरणा-गत प्रतिपालक भक्त-काज-कैवारी ॥१॥
सगुण निर्गुणीं निर्गुण सगुणीं वटबीजीं वटवृक्ष ॥ अवतारी व्हावयाकारणें रक्षित भक्त परोक्ष ॥
न जळे न बुडे न तुटे न मरे पूर्ण ब्रह्म अपरोक्ष ॥ अनुभवें अनुविती त्यांचे स्वपदीं रुळती निजमोक्ष ॥२॥
हरि हरि नामस्मरण पंचानन दुर्धर भवगज मारी ॥ स्वप्नींही अम नेणें परि जन ह्यणती रविस तमारी ॥
भीष्मक कन्या मुग्धा अबला प्रौढा तरुण कुमारी ॥ निजरंगें रंगले त्याला भय कैचें संसारी ॥३॥
पद १५२.
फुकट फाकट ब्रह्मज्ञान नव्हे ॥धृ०॥
परद्ळ भंग करी विरळा वीर ॥ त्याचें त्यांसिंच अनुभवे ॥१॥
बोळवीत सती बहु जन येती ॥ परतोनि जाती ते अवघे ॥२॥
सर्व रंगीं रंगातीत ब्रह्म सदोदीत ॥ गुरुपदीं रत चित्त तरिच फावे ॥३॥
पद १५३.
वोळला मजवरि निजमूर्ति राम मेघ:शाम ॥ ब्रह्मानंदें वर्षला पूर्ण काम ॥धृ०॥
नाभि नाभि शब्दें चिदंबरीं गर्जत ॥ कोटि विद्युल्लता स्वरुपीं होत जात ॥
हरिश्वंद्र वारा श्रवण द्वारां येत जात अनंत पुण्यें पावला लक्ष्मिकांत ॥१॥
शुद्ध सत्व वसुमतीं मी सुमती सहज ॥ श्रवण चाडे लक्षितां आत्मकाज ॥
साधनयुक्त सुभूमी शुद्ध बीज ॥ ब्रह्मस्वरूपें पिकला अधोक्षज ॥२॥
घुमरी अल्प सच्चिदानंदघन ॥ सफलित पुष्पीं फळीं स्वात्मसुखामृत पान ॥
गुंजारवती अळिकुळ हे मुनि सज्ञान ॥ अभेद भावें कोंदला विश्वजीवन ॥३॥
अखंड धार अज अव्यय निर्विकार ॥ पिकलें पीक अल्क्ष अपरपार ॥
सभाग्य सोहळे भोगिति निरंतर ॥ सुकाळ झाला घननीळ परम उदार ॥४॥
सहज पूर्ण निजानंदें केली वृष्टी ॥ दु:ख दारिद्र संताष न पदे द्दष्टी ॥
ब्रह्मरुपें पाहतां सर्व सृष्टीं ॥ अभंग रंग वेष्टी समेष्टीं ॥५॥
पद १५४.
त्यासी जाणे तोहि तोचि रे सांगतों एका बोलें परस्परें ॥ अनुभव जाणती मृत मृगाचींच पाउलें ॥धृ०॥
ज्याची अभेद बुद्धी तो निर्द्वंद्व तोचि ब्रह्मानंद ॥ कृपाकटाक्षें छेदितो समूळ संसार कंद ॥
ऐसा मी निर्मुक्त स्वच्छंद तेथे कैंचा हा स्फूंद ॥ मानव देही त्यातें मानिती अज्ञानी गतिमंद ॥१॥
पूर्वींच स्वजाति प्रवाह विजाती तिरस्कार ॥ विहिताचरण सहज स्वभावें आत्मनात्म विचार ॥
निष्काम निरहंकृति योगें ब्रह्मार्पण तेचि सागर ॥ बहुतां जन्माचें फळ पावला योगी निज निर्विकार ॥२॥
जगदुद्धारी लीलाविग्रही देह विदेहातीत ॥ अंतार्बाह्म द्दष्टीं पाहातां श्रुतिशास्त्र संमत ॥
प्रारब्धें परिग्रही भासतां अलिप्त जीवन्मुक्त ॥ पूर्ण निजानंदें रंगला तोचि अच्युतानंत ॥३॥
पद १५५.
आमुच्या वडिलांची ठेवणी ॥ विष्णुसहस्रनामें नाणीं ॥ लक्षापती झाले वाणी ॥ या भांडवलें ॥धृ०॥
तुका वाणी कबीर साळी ॥ नामा शिंपी सांवता माळी ॥ भाग्यवंत भूमंडळीं ॥ झाले नामें ॥ चोखामेळा पाडेवार ॥
धागा रोहिदास चांभार ॥ येथें नलगे लहान थोर ॥ नामस्मरणीं ॥ अजामिळ तो पापराशी ॥ गणिका कुंटिण महा दोषीं ॥
नामें तरला वाल्मिकऋषी ॥ तारक झाला ॥ सहस्रनामांचें भांडार ॥ नाणें अनंत अपार ॥ ब्रह्मदिकां न कळे पार ॥ हरिनामाचा ॥१॥
नृपती-अग्नी-चोर-भय ॥ नाहीं कल्पांतीं निश्वय ॥ अखंड परिपूर्ण अव्यय ॥ नाम नाणें ॥ पर्वकाळ सर्वकाळीं ॥
नलगे सोवळीं वोवळीं ॥ रामनामें चंद्रमौळी ॥ शीतळ झाला ॥ रामें अयोध्या एकली ॥ नगरी वैकुंठासि नेली ॥
नामें सृष्टी पावन केली ॥ स्मरतां वाचे ॥ नामें वंद्य त्रिभुवनीं ॥ ब्रह्मस्वरूप नारदमुनी ॥ नाचे नामसंकीर्तनीं ॥
अभेदभावें ॥२॥
सुरनर किन्नर विद्याधर ॥ कीटक पशु पक्षी जळचर ॥ नामें तरले भवसगार ॥ दुस्तरतर हा ॥ नाम निजानंद घन ॥
नाम ब्रह्म सनातन ॥ नाम पतीतपावन ॥ या तिहीं लोकीं ॥ नामापरतें नाहीं सार ॥ ऐसें जाणे जो साचार ॥ त्याच्या ब्रह्मरूपसंसार ॥ नि:संदेह ॥ रामनाम संकीर्तन ॥ भगद्भक्तांचें निजधन ॥ अक्षय चित्सुखसंपन्न ॥ सर्व रंगीं ॥३॥
N/A
References : N/A
Last Updated : November 11, 2016
TOP