मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|श्रीरंगनाथस्वामीकृत पदसंग्रह|
पदे ५९६ ते ६००

पदसंग्रह - पदे ५९६ ते ६००

रंगनाथ स्वामींचा जन्म शके १५३४ परिघाविसंवत्सर मार्गशीर्ष शुद्ध १० रोजीं झाला.


पद ५९६.
भूवैकुठ पंढरी पांडुरंग भीमातिरीं ॥ पुंडरीकें इटेवरी उभा केला समपदीं ॥ध्रु०॥
मृत्युलोकीं कलियुगीं कामातुर प्राणी भोगी ॥ ऐसे जीव पांडुरंगीं दर्शनें पावती मोक्ष ॥१॥
साधु संत महामुनी विषयीं विरक्त ज्ञानी ॥ ब्रह्मानंदें संकीर्तनीं गर्जती विठ्ठलनामें ॥२॥
आषाढी कार्तिकी दोन्ही यात्रा भरती विद्वज्जनीं ॥ मृदंगटाळांच्या ध्वनी गर्जताती ठायीं ठायीं ॥३॥
वाळुवंटीं महाद्वारीं हरिदास मंजुस्वरीं ॥ गंधर्व गायनें बरीं नानापरी करिताती ॥४॥
परब्रह्म स्वयंज्योति सिंहासनीं भक्तपती ॥ श्रीविठ्ठल निजमूर्ति पूर्णरंगीं रंगलासे ॥५॥

पद ५९७.
या रे गडियांनो सोडुनि ममता धरूं हरिशीं समता ॥ श्रमलों वावुगेंचि भ्रमतां भ्रमतां देहबुद्धीं रमतां ॥ध्रु०॥
हो जें झालें तें झालें मागें भोगिलं भोगें ॥ लक्ष चौर्‍याशीं संसृतियोगें घेतलीं सोंगें ॥१॥
आतां तुझी आझी एक करूंया चित्तीं विवरूंया ॥ भावें श्रीगुरुचे पाय धरुंया भवसिंधु तरुंया ॥२॥
मिथ्या मोहपाशीं गुंतुनि ठेलों होतों वायां गेलों ॥ कांही सत्संगें सावध केलों तरी सन्मुख झालों ॥३॥
नेणों जन्मार्जित बरवें होतें तरि आमुच्या चित्तें ॥ ऐसा कृतनिश्वय केला येथें पाहूं श्री गुरुतें ॥४॥
सहज निजरंगें रंगुनि राहूं अवघा हरि पाहूं ॥ पाहातें पाहाणेंहि दोन्ही वाहूं आपण आपणा लाहूं ॥५॥

पद ५९८.
बोलणें फोल झालें डोलणें वायां गेलें ॥ध्रु०॥
श्रवणीं दावी अष्टहि भाव ॥ ह्मणे मृगजळवत्‌ हें वाव ॥
कवडी वेंचितां हा जीव्र ॥ तळमळ करि स्वधर्मीं ॥१॥
चित्तीं विषयांचा अभिलाष ॥ नाहीं विश्रांतिचा लेश ॥
मुखें ह्मणे निर्विशेष ॥ परब्रह्म संचलें ॥२॥
परोपदेशीं पूर्ण ज्ञानी ॥ मोह ममता मत्सर मनीं ॥
नागसरें जैसा फणी ॥ डोले परी विष वदनीं ॥३॥
शब्दें ब्रह्म कोण झालें ॥ अन्न ह्मणतां कोण धालें ॥
शिकविलें तैसें बोले ॥ शुकपक्षी जैसा ॥४॥
शिकला विद्या कळा छंद ॥ नाहीं अंतरीं निर्द्वद्व ॥
सहज पूर्ण निजानंद ॥ सर्व रंगीं न पाहे ॥५॥

पद ५९९.
कर्म बळिवान्मुनयो वदंति ॥ध्रु०॥
राम सीता लक्ष्मण ॥ पाहातां केवळ ब्रह्म पूर्ण ॥
तेही वनवासीं सुवर्ण ॥ मृगें मोहिले कैसें ॥१॥
ऋषी छळितां यादवगणीं ॥ भालुकातीर्थीं पडले रणीं ॥
कृष्ण नाटकी विंदाणीं ॥ व्याधें बाणीं विंधिला ॥२॥
धर्म अर्जुन पंडूपुत्र ॥ श्रीकृष्णाचे परम मित्र ॥
त्यांनीं वनवासीं विचित्र ॥ नाना कष्ट भोगिले ॥३॥
हरिश्वंद्र तारा राणी ॥ डोंबाघरीं वाहे पाणी ॥
नळा दमयंतीची काहाणी ॥ जे पुराणीं गर्जती ॥४॥
ब्रह्म निर्विकार निर्गुण ॥ तेथें होतां अहं स्फुरण ॥
पडिलें मायेचें आवरण ॥ जीवदशा पातली ॥५॥
कर्मणो गहना गती ॥ स्वमुखें बोले हें श्रीपती ॥
कर्ममोचनाची युक्ती ॥ ते अनुभवी जाणती ॥६॥
कर्म तेंचि पूर्ण ब्रह्म ॥ सद्नुरुकृपेचें हें वर्म ॥
निजानंदीं धर्माधर्म ॥ नाहीं तरग जळन्यायें ॥७॥

पद ६००. [आ. खा. कृ.]
तुझीं नामें पतितांसीं पावन करिति ॥ध्रु०॥
श्रीहरि श्रीधर मधुसूदना ॥ ह्रषिकेशा जनार्दना ॥
नरहरी उपेंद्रा बामना ॥ आनंदघना निज मूर्ति ॥१॥
अच्युतानंत पुरुषोत्तमा ॥ पंकजनाभा त्रिविक्रमा ॥
अधोक्षजा मेघ:शामा ॥ अवाप्तकामा गोपाळा ॥२॥
प्रद्युम्ना श्रीवासुदेवा ॥ संकर्षणा रमाधवा ॥
विष्णु अनिरुद्धा केशवा ॥ करुणार्णवा गोविंदा ॥३॥
कृष्णा रामा नारायणा ॥ दामोदरा दीनोद्धरणा ॥
पूर्णरंगा भवभयहरणा ॥ रुक्मिणिरमणा विठोबा ॥४॥

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP