पदसंग्रह - अष्टक २
रंगनाथ स्वामींचा जन्म शके १५३४ परिघाविसंवत्सर मार्गशीर्ष शुद्ध १० रोजीं झाला.
[वृत्त भुजंगप्रयात. गण य, य, य, य.]
अहं प्रत्ययें दूरि चिद्रूप केलें ॥ प्रपंचानुरागें समाधान नेलें ॥
दिसे भाव हा भेदडोहीं बुडाला ॥ दयाळा हरी मी करूं काय याला ॥१॥
कदां चित्त तें वित्त आशा न सोडी ॥ सदां लागली योषितासंगगोडी ॥
न वाटेचि हे खंति कांहीं मनाला ॥ दयाळा० ॥२॥
फिरे व्यर्थ दाही दिशा वारितां ही ॥ नसे सर्वमूर्ती दया सर्वदांही ॥
असे दुष्ट हा भोग माझा उदेला । दयाळा० ॥३॥
सदां द्वेष वाहे जनीं द्वैत पाहे ॥ कुसंगींच राहे धरी योग्यता हे ॥
मनें जाणतां जाणतां घात केला ॥ दयाळा० ॥४॥
अविज्ञान कीं तूं सखा चक्रपाणी ॥ न जाणसी कां होतसे थोर हाणी ॥
त्वरें धांव पावें भवें जाच केला ॥ दयाळा० ॥५॥
असे पूर्वजन्मीं कुडें कर्म केलें ॥ तयाकारणें चित्त भोगां भुकेलें ॥
अहा मानवीं जन्म हा व्यर्थ गेला ॥ दयाळा० ॥६॥
पडे संतसंगीं जडे अंतरंगीं ॥ घडे ना असें चित्त खेळे अनंगीं ॥
कुतर्केंचि भावार्थ सर्वे बडाला ॥ दयाळा० ॥७॥
निजानंद तो कोण आधीं कळेना ॥ अहभाव यालागिं माझा गळेना ॥
तुझा दास मी व्यर्थ हा आळ आला ॥ दयाळा० ॥८॥
N/A
References : N/A
Last Updated : November 11, 2016
TOP