मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|श्रीरंगनाथस्वामीकृत पदसंग्रह|
पदे १२० ते १२५

पदसंग्रह - पदे १२० ते १२५

रंगनाथ स्वामींचा जन्म शके १५३४ परिघाविसंवत्सर मार्गशीर्ष शुद्ध १० रोजीं झाला.


पद १२०.
तेचि महा पुरुष हर्षयुक्त निजानंदें ॥
आत्मलोभें नित्य तृप्त क्रिडती स्वच्छंदें ॥धृ०॥
देहादिक भुवनत्रय विषय वमनप्राय ॥
सद्नुरुभजन भाग्यें भाग्यवंत सांगों काय ॥१॥
निरभिमान निर्विकल्प निष्कळंक पाही ॥
देही देहातीत सदोदीत सर्वदांही ॥२॥
सहज पूर्ण रंग नि:संग निर्विकारी ॥
द्दश्य द्दष्टी ना कळती नव्हती वेषधारी ॥३॥

पद १२१.
वर्म कळेना देहबुद्धि वळेना ॥
सत्संग मिळेना संकल्प जळेना ॥धृ०॥
शुद्ध बुद्ध नित्य मुक्त पूर्ण परब्रह्म ॥
बंध मोक्ष कैंचा तेथें कैंचें क्रियाकर्म ॥१॥
संशय अविश्वास मिथ्या भेदाभेद दावी ॥
अंत:करण काल्पनीक वेधता हे लावी ॥२॥
उदयास्तुवीण सूर्य स्वयंप्रकाश ॥
सहज पूर्ण रंगला हा अव्यय अविनाश ॥३॥

पद  १२२. (चाल-भज भज भवजलधि.)

हरि हरि हरि भजन करीं भाव धरीं भजनीं ॥
शम दमादि साधनपर होउनि दिनरजनीं ॥धृ०॥
छेदएदरहित वेदविहित चित्तशुद्धी ॥
निरभिमान निर्हितुक ब्रह्मार्पण बुद्धि ॥१॥
सत्समागम निगमागम सुगम सेवीं ॥
निर्विषयी करुनि नित्य गुरुपदिं मन ठेवीं ॥२॥
चित्समुद्र नित्य निर्विकार निस्तरंग ॥
नाम रुपातीत नाम सहज पूर्ण रंग ॥३॥

पद १२३.
माझी बलाय न करी ऐसे वो ॥ करिते हे जन तैसें वो ॥
हरिविण नाना साधन संपत्ति गिरीवर उकरित जैसे वो ॥धृ०॥
योगयाग जप तीर्थाटण कामिक मंत्नें यंत्ने वो ॥
हरिविण सकळें विकळें हो का पावन परम पवित्रं वो ॥१॥
हरिस्मरणामृत कुंभ वोलांडुनि विषय विषोदक स्विकारूं वो ॥
इहपरभोगीं ठेवुनियां मन जन्मुनि सार्थक न करुं वो ॥२॥
भगवत्स्मरणीं पूर्ण रंग नि:संग अभंग उपेक्षूं वो ॥
क्षणभंगुर जड दग्ध विकारी विषय अमंगळ भक्षूं वो ॥३॥

पद १२४.
तूं हरि नारायण स्मर जा ॥धृ०॥
पावुनि दुर्लभ नरतनु हे ॥ नेणसि काम अरजा ॥
हरिस्मरण संसरणहरण हें ॥ न घडे तरी मर जा ॥२॥
सहज पूर्ण निज रंगें रंगुनी ॥ होसी परात्पर जा ॥३॥

पद १२५.
नारायण तूं गा होसी ब्रह्मपरायण गा ॥धृ०॥
पतित अजामिळ पावन झाला ॥ ठावुक सर्व जगा ॥१॥
भक्तिपुरस्कर स्मरतां प्राप्त ॥ काय नव्हे तुज गा ॥२॥
कीटकि भृकुटि-भयें तद्रुप झाली ॥ तूं भावें भज गा ॥३॥
निजरंगीं हा प्रत्यय झाला ॥ कांहिंसा मज गा ॥४॥

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP