मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|श्रीरंगनाथस्वामीकृत पदसंग्रह|
पदे २२६ ते २३०

पदसंग्रह - पदे २२६ ते २३०

रंगनाथ स्वामींचा जन्म शके १५३४ परिघाविसंवत्सर मार्गशीर्ष शुद्ध १० रोजीं झाला.


पद २२६.
डोळा उघडेना उघडेना ॥ पश्चात्ताप घडेना ॥धृ०॥
अहं-ममतेचें करणें ॥ नाना योनीं जन्मुनि मरणें ॥१॥
चिदचिद्‌ग्रूंथि सुटेना ॥ क्षणभरि विषयीं चित्त विटेना ॥२॥
निज रंगे रंगेना ॥ दुर्जय दुर्भव भय भंगेना ॥३॥

पद २२७.
तेव्हां गुज कललें गुज कळलें ॥ स्वरुपीं मन मावळलें ॥धृ०॥
पडतां गुरुहस्त मस्तकीं ॥ अवघा मीच मी समस्त कीं ॥१॥
सबाह्म अंतर्यामीं ॥ व्याप्य व्यापक स्थिर जंगमीं ॥२॥
सह्जीं सहज मी पूर्ण अभंग ॥ रंगीं रंगला निज रंग ॥३॥

पद २२८.
जनीं जनार्दन पाहा तुह्मी नेत्र हो ॥
द्दश्य द्दष्टी होतां श्रमासि पात्र हो ॥धृ०॥
अलंकार पाहातां सेखीं ॥ सुवर्ण पाहे पारखी ॥
तैसा विश्वीं विश्वंभर चिन्मात्र हो ॥१॥
विश्वपटीं चित्तंतू पाहाती ॥ तेचि धन्य या त्रिजगतीं ॥
नाम रूप वाचारंभण मात्र वो ॥२॥
निजानंदीं एक रंग ॥ पाहावा निरसुनि अनित्य संग ॥
तरिच तुह्मी माझे परम मित्र हो ॥३॥

पद २२९.
अंतरिंचें पुरविल अर्त श्रीहरी ॥धृ०॥
मान गुमान हे तुझे तुज वैरी ॥ निरभिमान होईं अंतरीं ॥१॥
ह्रदयग्रंथी सोडुनि देईं तूंचि हरी ॥ सन्मुख होईं सुमनशेजे निजमंदिरीं ॥२॥
करुनि द्वैत-संग भंग निजानंदीं पूर्ण रंग ॥ लहरी हे विरे जैसी सागरीं ॥३॥

पद २३०.
जाऊं द्या परते भोगूं द्या यातना ॥ अविधिमार्गें जातसे पतना ॥धृ०॥
अहंममता देहीं देहबुद्धिच्या संगें ॥ कामादिक आसुरी गुण दोषी सर्वांगें ॥
आब्रह्मस्तंभ व्यापिलें भवरोगें ॥ मोहमदांध झालें कर्माच्या फळभोगें ॥१॥
स्वदोष-दर्शन न देखे नयनीं ॥ परदोषदर्शन पहाते दिनरजनीं ॥
कल्पांतीं सम्मुख नव्हे श्रीहरिभजनीं ॥ न जाणें व्याप्यव्यापक जनीं विजनीं ॥२॥
दुर्विषय-विलासी अभिलाषी धन दारा ॥ या मानवतनुचा केला हो मातेरा ॥
हिर्‍या ऐशा मानीतो वनगारा ॥ वरि रूपमदाचा सर्वांगीं फुगारा ॥३॥
मूर्तिमंत वेदवेदांत प्रतिपाद्य ॥ विद्वद्वर्य परब्रह्म ज्यां वेद्य ॥
ऐसे जे ज्ञानी ब्रह्मादिकां वंद्य ॥ सामान्य त्यांतें मानिति ते अति निंद्य ॥४॥
तिळतुल्य चित्तीं अनुताप धरीना ॥ सच्छास्त्रश्रवण सत्संगीं करिना ॥
मी कोण ऐसा कांहीं विवरीना ॥ पूर्णानंद निजरंगें भरिना ॥५॥

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP