पदसंग्रह - पदे १३१ ते १३५
रंगनाथ स्वामींचा जन्म शके १५३४ परिघाविसंवत्सर मार्गशीर्ष शुद्ध १० रोजीं झाला.
पद १३१.
चावट वट वट कां करिते ॥धृ०॥
ब्रह्मादिकां जो ध्येय त्या आकळिन म्हणे हरितें ॥१॥
वेदश्रुती नेती म्हणती तेथें गर्व कां धरितो ॥२॥
मश्यक मेरु गिळी ऐसा कैंचा बळी ॥ गिळवेना करितें ॥३॥
इंद्रवारुणी फळ कटुतर सोज्वळ ॥ भासे वरी वरी तें ॥४॥
क्षुद्र आनंदीं पडोनियां छंदीं ॥ नाना रंग भरिते ॥५॥
पद १३२.
देवाची वेडी स्मरण हरीचें सोडी ॥धृ०॥
विरक्तिवसन फेडुनियां ॥ विषयीं नाचे होउनि उघडी ॥१॥
नित्यानित्य विचार न जाणत ॥ नीरतीशय घट फोडी ॥२॥
पूर्ण रंग उपेक्षुनि विचरे ॥ कामीं मानुनि गोडी ॥३॥
पद १३३.
कां हे भुलली वेडदुली ॥धृ०॥
लटिकेंचि मीपण धरुनी आंगीं ॥ उगलिच कां फुगली ॥१॥
शाश्वत सुखमय चिन्मय त्यागुनी ॥ निज स्वहिता मुकली ॥२॥
निज रंगें रंगुनि राहावें तें ॥ वर्म कां चुकली ॥३॥
पद १३४.
तो विरळा या लोकीं मी अवलोकिन ह्मणतां नयनीं ॥ अनंत जन्माच्या पुण्यें भेटे ऐसा ज्ञानी ॥धृ०॥
परमहंस सु-विवेकी क्षिर निर सारासारविभागी ॥ स्वात्मसुखामृत चिद्रस सेवुनि सच्चित्सुखमय योगी ॥
नामरुपात्मक द्दश्य भाग जग स्थिर चर असार त्यागी ॥ सोज्वळ मानस-सरोवरीं या मुक्ताफळ जो भोगी ॥१॥
शरणागत-प्रति-पाळक भूतदयार्णव निरभिमानी ॥ सबाह्य अंतर नवनीत मृदुतर भेदामेद न मानी ॥
दग्ध विटप पक्षीकुळ त्यजिती तैसा गुण विष मानी ॥ त्यजिला जो या चिद्नगनीं मग खेळे अचळ विमानीं ॥२॥
स्वरुपसुखाचा दिनकर लीलाविग्रह जगदुद्धारी ॥ उदयास्ताविण स्वप्रकाश घनतेजें भव-तिमिरारी ॥
दर्शन-मात्रें जड जिव तारी भक्तकाजकैवारी ॥ सहज पूर्ण निज रंग सनातन सज्जन-विजनविहारी ॥३॥
पद १३५.
दीनानाथा श्रीरंगा ये रे ये रे ॥ द्वैताद्वैत निरसुनि भेटी दे रे ॥धृ०॥
शेषशायी इंदिरावरा रामा ॥ पूर्णकामा अच्युता मेघशामा ॥१॥
भक्त-काज-कैवारी कृष्ण मुरारी ॥ चतुर्भुज चक्रांबुज-गदा-धारी ॥२॥
अनंत ब्रह्मांडनायका पुरुषोत्तमा ॥ त्रिविधछेदमेदरहित त्रिविक्रमा ॥३॥
विश्वजनका श्रीहरी ह्रषीकेशा ॥ सच्चित् स्वरुपा चिद्धना अविनाशा ॥४॥
निजानंदकंदा सहज पूर्णरंगा ॥ गुणी गुणातिता निर्गुणा नि:संगा ॥५॥
N/A
References : N/A
Last Updated : November 11, 2016
TOP