पदसंग्रह - पदे ३२१ ते ३२५
रंगनाथ स्वामींचा जन्म शके १५३४ परिघाविसंवत्सर मार्गशीर्ष शुद्ध १० रोजीं झाला.
पद ३२१. (चाल-सखया रामा विश्रांति तुझे०)
सजणा अंतर निवविं सांगे गोष्टी ॥ थोर भाग्यें जाहली तुझी भेटी ॥धृ०॥
भला भेटलासि जिवलग गडी ॥ माझे जिविंची एक आवडी ॥
कांहिं बोलों स्वसुखा परवडी ॥ जेणें नाशती संशयकोडी रे ॥१॥
राम विश्वीं कीं विश्व हें रामीं ॥ जाहल्या प्रतीति वर्तणें केविं कर्मीं ॥
प्राचिन क्रियमाण केवि तया नेमी ॥ जीव शिव एकते कायसे दोनी नामीं ॥२॥
बोलीं तोषला बोलत संवगडा ॥ तूं तरी सुजाण पुससी लोक चाडा ॥
राहें सावध पावसी पद झाडा ॥ थोर भाग्यें जोडला साधुजोडा ॥३॥
सखया अनुभवीं मुळींचिय खुणा ॥ जाण समूळ सांडुनि जाणपणा ॥धृ०॥
घटीं मृत्तिका मृत्तिकेंत घट नाहीं ॥ पट वर्ततां तंतुचि सर्वदाही ॥
हेमीं अळंकार तेथ बुद्धिभेद पाहीं ॥ तैसा राम विश्वीं नामरूप पाहीं ॥४॥
कर्मीं वर्ततां सहज संस्कारें ॥ कदां न शिणे कर्तव्य-भोगभारें ॥
ब्रह्मीं हुत झाले ब्रह्मार्पणद्वारें ॥ कर्ता कार्य क्रिया ब्रह्म एकसरें ॥५॥
ज्ञानकाळीं संचित दग्ध झालें ॥ अहंत्यागेंचि क्रियमाण गेलें ॥
वर्तें प्रारब्ध निश्चया जना आलें ॥ अंगिं नातळे त्रिविध बोधबळें ॥६॥
दिसे लघुत्वें आकाश घटाकाशीं ॥ मठीं अनेक प्रकारें पाहे त्यासि ॥७॥
सुखसंवादें दोहिचे पुरे कोड ॥ प्रीति नावरे बोलतो गोड गोड ॥
ब्रह्मनिष्ठ तो ब्रह्मचि नाहीं भीड ॥ नाहिं दीपा अन्य दिपकाचि चाड ॥८॥
ऐसें अंतरा अंतर एक झालें ॥ तेथें सांगतें ऐकते मौन ठेले ॥
दोघां दोनीपण नाहिं ऐसें जाहलें ॥ निजानंदीं रंगलेपण गेलें ॥९॥
सजणा सच्चिदानंद एकरसीं ॥ उरी तुटली उपमा नाहीं त्यासी ॥धृ०॥
पद ३२२. (चाल-अजि अक्रूर हा०)
जरी त्या विसरें विसरें त्याहुनि मरण बरें ॥धृ०॥
राम निजमूर्ति निजमूर्ति बाप हा निजाचा ॥ सुख विसावा विसावा जीवन या जिवाचा ॥
त्याविण आणिक आणिक मी नेणें त्निवाचा ॥ फेरा चुकविला चुकविला जन्म आणि मरणाचा ॥१॥
भव हा अजगर अजगर विषय वीष विखार ॥ विषें अहळती अहळती त्नैलोक्यें अपार ॥
ते वेळे गुरुराये त्याचे मुखीं मी मुखी मी सांपडलों साकार ॥ ते वेळे गुरुरायें गुरुरायें दिधला अभय कर ॥२॥
पाठिसि घातलें घातलें कृपाकरें निवविलें ॥ मग त्या भवसर्पा भवसर्पा क्षणमात्रें निर्दळिलें ॥
अपुले निजपदीं निजपदीं मजला बैसविलें ॥ निजानंदें वो आनंदें रंगबुनि सुखी केलें ॥३॥
पद ३२३. (चाल-अभाग्याच्या घरीं बाबा काम०)
बाप कृपाळू निजराम हरिला भवभ्रम ॥ पद्महस्तें वो निवविलें तुटला अवघा श्रम ॥धृ०॥
भवसागरीं बुडतां श्रमलों मी तत्वता ॥ बापें नाभी नाभी म्हणवुनि कर ठेविला माथां ॥
भावार्थ सांगडी लावुनी हरिली माझी चिंता ॥१॥
माझें मीपण वो वैरी हा तेणें इतुकें केलें ॥ वैर साधुनी तयानें भवपुरीं लोटीलें ॥
ते वेळे दयाळुत्वें निजरामें मीपण मारीलें ॥ अनंत सुख देवानी निजपदीं स्थापिलें ॥२॥
लहरि ये लहरी वो आलिंगितां दुजेपण न दिसे ॥ तैसें झालें वो सखिये काय सांगों कैसें ॥
अवघा जनीं वनीं पाहतां निजानंद दिसे ॥ अनुभवें पाहतां अंतरीं निजानंद दुजा रंग न दिसे ॥३॥
पद ३२४. (राग सारंग)
येईं येई वो श्रीरंगे माझे अंतरंगे ॥ करुणा कल्लोळे निजसखये निष्ठर झालिस कांगे ॥धृ०॥
रविशशिविण जैसी दिनरजनी शोभा न पवे माय ॥ वांचुनि घनबिंदु क्षिरसिंधू टाकुनि चातक जाय ॥
मीना जळ नाहीं तरि पाही दधि मधु सेविल काय ॥ तैसें तुजविण वो निजसखिये उपाय ते अपाय ॥१॥
कंठीं कृष्णमणी न विराजे कुंकुम न वसे भाळीं ॥ त्याविण वधु सर्वही शृंगारा लेवुनि काय जाळी ॥
मंगळदायक तें अति हरुषें मिरवे जैसी बाळी ॥ तैसें तुजविण हो या विधिनें लिहिलेंसे कपाळी ॥२॥
करुणा परिसोनी चिद्नगनीं बोले मंजुळ शब्द ॥ सखया सावध रे सावध रे कां करिसी हा खेद ॥
सत्ता एक जगीं विलसतसे तुज मज कैंचा भेद ॥ वियोग भंगला रंगला अवघा निजानंद ॥
विचरें सहज सुखें चिद्भुवनीं जीवन जैसें जिवनीं ॥ विचरें सहज सुकें ॥३॥
पद ३२५.
येईं येईं वो माउलीये निजमूर्ति ॥धृ०॥
जगदाधारे विगतविकारे सहजे अव्ययसारे वो ॥ निर्गुण नित्ये निष्कळ सत्ते सत्यज्ञानानंते ॥१॥
अद्वयरूपे सच्चित्स्वरूपे स्वप्रकाशरूपें अनामे वो ॥ अवाप्तकामे निजसुकधामे मुनिजनमनविश्रामे वो ॥२॥
भेदाभेदविवर्जित शुद्धे बुद्धे सिद्ध असंगे वो ॥ निजानंद परिपूर्ण निरामय अक्रिय क्रिय अभंग रंगे वो ॥३॥
N/A
References : N/A
Last Updated : November 11, 2016
TOP