पदसंग्रह - पदे ३७१ ते ३७५
रंगनाथ स्वामींचा जन्म शके १५३४ परिघाविसंवत्सर मार्गशीर्ष शुद्ध १० रोजीं झाला.
पद ३७१. (सखया रामा विश्रांति या चा.)
पती कळला नाहीं जीवघेणा ॥धृ०॥
अरुप अगुणाचा माता ना पिता ॥ काय करुं माझे कपाळीं होता ॥१॥
कर्मधर्म यासी कांहींच नाहीं ॥ माझें मीपण चालों नेदीच कांहीं ॥२॥
नित्यानित्य मारी उरों नेदी ऊरी ॥ संसारासि सुरी घातली बाई ॥३॥
हां ह्मणुं नये हूं ह्मणो नये ॥ ऐसियासी मज दिधलें बाई ॥४॥
निजानंदघन ब्रह्म सनातन ॥ तयासीं शरण गेलं वो बाई ॥५॥
पद ३७२.
माझें जिवींचें जीवन राम निजानंद मना अखंड त्याचा छंद ॥ जनीं वनीं अवघा त्याचा तोचि दिसे मावळले भेदाभेद ॥धृ०॥
राजीवलोचन राम निजमूर्ति ब्रह्मादिकां न कळे स्थिति ॥ नेती नेती ह्मणती श्रुति नेणती पार बाप सुखानंदमूर्ति ॥
वर्णितां शिणला शेष सहस्रमुखें तरी न वर्णवे कीर्ति ॥ परा पारुषली मन हें उन्मन होतां सहजें कुंठित झाली स्फुर्ति ॥१॥
ध्वज वज्रऊर्ध्वरेखा शोभताति पायीं पद्में झळकती ॥ रातोत्पलाहुनी सुंदर सुकुमार चरणीं शीळा उद्धरती ॥
योगियां लागलें ज्याचें निजध्यान पूर्ण भक्तांची विश्रांती ॥ वोळंगती चारी मुक्ती पायांपाशीं सकळही तीर्थं पावन होती ॥२॥
पाउलें गोजिरीं नखचंद्रीं शोभा घोंटीं इंद्रनीळप्रभा ॥ पोटरियां साजिर्या वर्तुळ मणिमय स्तंभ जानु सरळं कर्दळीगाभा ॥
विद्युल्लता पीतांबर कटीसुत्रीं ठाण मांडुनियां उभा ॥ तेजाचें निजतेज मूर्तिमंत राम चोज वाटे पद्मनाभा ॥३॥
उदरीं त्रिवळी सुंदर अंगीं झळकती रोम ह्रदयीं मुनिमना विश्राम ॥ आजानुबाहु सरळ अभयदाना उदीत उपमे न पुरे कल्पद्रुम ॥
पद्महस्तें सुखी केलें शरणागत निरसुनियां भवभ्रम ॥ नित्य निरंजन सज्जनरंजन महाराज सहजीं सहज पूर्णकाम ॥४॥
दिव्यसुगंध चंदन अंगीं चर्चियला कंठीं सुमनाचे हार ॥ श्रवणीं कुंडलें सूर्या वोप देती नाशिक सरळ मनोहर ॥
मदनपुतळा कैसा शोभे माय कमळनयन कमळाकर ॥ बाह्मीं बाह्मवटें मणगटीं वीरकंकणें तळवे तळहात सुंदर ॥५॥
सुनिळ नभाच्या कळिका तैशा अंगुलियांवरि मुद्रिका झळकत ॥ अरिमर्दनीं धनुष्य बाण उभय करीं भुजा यशस्वी जयवंत ॥
काम कुंभकर्ण अहंरावण वधियला भवसागरीं बांधुनि सेत ॥ भाव बिभीषण राज्यीं स्थापियला भक्ति सीतेसी आलंगीत ॥६॥
जडित मणिमय मुकुट मस्तकीं शोभताहे बाप सुकुमार विलासी ॥ शिवाचें निजगुज ध्यातां नये ध्याना तो गुज बोले वान्नरेंसीं ॥
सनक सनंदन नारद मुनिजन चिंतिताति ओत फळ मागें भिल्लणीसी ॥ बाप निजानंद रंगातीत पूर्ण मीपण अर्पियलें तयासी ॥७॥
पद ३७३.
अंतर तुजसीं म्हणवुनि श्रम झाला विश्वंभरा निजमूर्ति ॥ त्राहि त्राहि शरण आलों मायबाप दीनानाथ तुझी कीर्ति ॥धृ०॥
वाळुवेचा घाणा कैसा धरियला व्यर्थ पडोनि प्रवाहीं ॥ आयुष्य वेंचलें तैसें विषयांमाजीं सुखलेश प्राप्त नाहीं ॥
कवण मी करितों काय कवणें हेतु नसे शोधियलें पाहीं ॥ विचरतो मृग जैसा वनामाजी तैसा फिरे दिशा दाही ॥१॥
भ्रमभरें मोहवशॆं भुली ठेली समाधान नाहीं चित्तीं ॥ तापत्रयें पोळलें मन संतप्त झालें बहिर्मुख झाली वृत्ती ॥
दिनबंधु दयासिंधु येईं वेगीं तुझा धांवा करुं किती ॥ चरणीं रंगवीं सुकसागरा रे बापा निजानंदमूर्ति ॥२॥
पद ३७४.
निरालंब गांवीं एक संन्यासि देखिला तेणें नवलचि केलें रे ॥ आपणाकडे पाहुनि एक बायको केली तिणें एवढें वाढविलें रे ॥
कल्पना धरुनि तिनें पोरि उभि केली तिनें खेळों आरंभिलें रे ॥१॥
भ्रताराविणें पोरितिघें पोरें व्याली तिघें तीं परिचीं ॥ एक रागीट एक सात्वीक भलें एक स्वयोंचि कामधाम रची ॥
तिघांपासुनि पांच बाळकें झालीं नाचती वेगळालींचि रे ॥२॥
पांचा मुलांचा एकवट होतां तेथें कुंभचि निर्माण झाला रे ॥ तया कुंभामाजीं दोन मीन आले तेथें धीवरीं गळ टाकिला रे ॥
एक सांपडला एक मोकळा होउनि पाताळभुवनीं गेला रे ॥ धरुं जातां तो न सांपडे तेथें विश्वास गुरुच्या बोला रे ॥
रंगपणा टाकुनी स्वानुभवें पाहतां अवघा निजानंद झाला रे ॥३॥
पद ३७५.
या सज्जन जाणती गोष्टी रे ॥ ज्यांची स्वानंदघन झाली दिठी रे ॥धृ०॥
कल्पनेचा आरसा आणुनि सरिसा आपणासी सम्मुख पाहे रे ॥ एकचि दुसरें लक्षुनि नयनीं विस्मय मानुनि राहे रे ॥
आरसा गेलिया मुखीं मुख संचलें जैसें आहे तैसें आहे रे ॥ वायांचि नाथिला संमार आथिला भावना साच भाविताहे रे ॥१॥
वावुगा भ्रम रे देतसे श्रम रे विवेक ह्रदयीं आणा रे ॥ वेदीं निवेदिलें श्रुतिनीं कथिलें अनुभवी जाणति खुणा रे ॥
स्वाप्निंचीं कंटकें तैसें विश्व लटिकें साच वहातसे कोटी आणा रे ॥ स्वरुपीं द्वैत हें नाहीं नाहीं रंगला निजानंदराणा रे ॥२॥
N/A
References : N/A
Last Updated : November 11, 2016
TOP