मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|श्रीरंगनाथस्वामीकृत पदसंग्रह|
पदे १४६ ते १५०

पदसंग्रह - पदे १४६ ते १५०

रंगनाथ स्वामींचा जन्म शके १५३४ परिघाविसंवत्सर मार्गशीर्ष शुद्ध १० रोजीं झाला.


पद १४६.
बोलें वेगीं दीनदयाळा भक्तवत्सला दोहीं गोष्टींत एक ॥ अंतरसाक्षि तूं परिक्षक संरक्षक तूंचि व्याप्य व्यापक ॥धृ०॥
सुर्यवंशीं राजाराम तूं पूर्ण काम तूं दानशूर धर्ममूर्ति ॥ अनंत ब्रह्मांड नायक सुखदायक ऐशी ऐकुनि कीर्ति ॥
बहुरूपी आलो मी धावोनि सोंगें घेउनि कृमि कीटकादि जाति ॥ चौर्‍याऐशीं लक्ष योनीं भ्रमलों बहु श्रमलों आतां झाली हे स्फूर्ति ॥१॥
सोंग हें पाहुनि विशेष तुज संतोष झाला असेल मनीं ॥ तरि तूं लक्ष मुद्रा देऊनि स्वपदीं ठेवुनी लावीं नवविध भजनीं ॥
चित्ता आलें नसतां जरी कांहीं तरी तूं वद हेंही स्पष्ट आजिपासुनि ॥ सोंग आणूं नको सर्वथा बोलें रघुनाथा स्वस्थ राहिन स्व-स्थानीं ॥२॥
शेवटिंचें सोंग हें नरकाया चुकवीं नरका या तुझ्या भजनेंकरुनी ॥ तूं होउनि रघुविर प्रसन्न देशी निज धन ह्मनुनि आलों मीं धरुनी ॥
पुधती नाना सोंगें घेईना जन्मा येइना दु:ख दारिद्र हरुनी ॥ सहजीं सहज पूर्ण आनंदीं नित्य विर्द्वंद्वीं दावीं निजरंग भरुनी ॥३॥

पद १४७.
ऐसा परमार्थ काय कोण पुसे याशीं ॥ हिर्‍या ऐशी गार मोलें विकेना ते जैशी ॥धृ०॥
प्रपंचाचें शेत जतन करावयालागीं ॥ परमार्थाचा कुंप लावुनी ह्मणविताति योगी ॥१॥
काम क्रोध लोभ मनीं अंत्यज मातंग ॥ स्रानसंध्या वरि वरि विद्या कळा दिसे सांग ॥२॥
सजजीं सहज पूर्ण निजानंद रंगना ॥ अहंममता जीवीं त्याचा संग भंगेना ॥३॥

पद १४८.
आपलीच क्रिया आपणा तारक निज मारक सहजें ॥धृ०॥
हिरण्यकश्यपु करितां द्वेष ॥ उदर विदारी ह्रषीकेश ॥
भक्त प्रर्‍हादावरी विशेष ॥ प्रेमा बोलीं न बोलवे ॥१॥
रावें रावण सहपरिवारी ॥ वधिला सक्रोधें निजशरीं ॥
बिभीषणातें सुवर्णनवरी ॥ देउनि राज्यीं स्थापविलें ॥२॥
कृष्ण पांडवांचा सखा ॥ सर्वस्वेशीं पाठीराखा ॥
कौरव महा कांळाच्या मुखा ॥ माजीं कवणें घातलें ॥३॥
करी तैसें पावे प्रावी ॥ कर्में जडे जीव अज्ञनीं ॥
श्रीहरी फळदाता निर्वाणीं ॥ लक्ष्मीं साक्षी कर्माचा ॥४॥
यास्तव निज भजनें श्रीहरी ॥ निजानंदें रंगभरी ॥
उच्छिष्ट काढी धर्माघरीं ॥ उभा द्वारीं बळीच्या ॥५॥

पद १४९.
काय सांगो सये माझ्या संचिताची कथा वो ॥ बोलों जातां चवघी सखिया डोलविती माथावो ॥धृ०॥
भाव भक्ती माझीं पिता माता केवळ भोळीं वो ॥ निरहंकृति निष्कामें त्यांनीं दिधलें मज ये स्थळीं वो ॥
विद्याविहीन पडिला गोवळ टोणपा कपाळीं वो ॥ वृत्ति भूमि नाहीं कोठें पाहातां भूमंडळीं वो ॥१॥
नाम रूपातीत बाई काळा ना सांवळा वो ॥ अखंड उघडा अगुणी याची कवणा न कळे लिला वो ॥
मागें पुढें कोणिच नाहीं एकट हा गोवळा हो ॥ पाहों जातां द्दष्टीं न दिसे कळा विकळा सकळा वो ॥२॥
कैसे लिहिलें होतें नेणों माझिये अद्दष्टीं वो ॥ परात्पर तर हा कोठें निर्मित होता तो परमेष्ठी वो ॥
नाभीं सरोरुह नाळीं परवां देखिला म्या द्दष्टीं वो ॥ जन्मला मग करुं लागला अलिकडे हे सृष्टी वो ॥३॥
कामधामीं न वसे अखंड परनारी संभोगी वो ॥ वर्णाश्रम धर्माहुनि ह्मणें मी वेगळा महा योगी वो ॥
लोण लक्षण कांहींच नलगे पाहातां याचे आंगीं वो ॥ वृत्तिशून्य सर्वदां माझ्या जिण्यास लागो आगी वो ॥४॥
वावुगी वटवट न करूं धरुं द्दढ निश्चय हा मनीं वो ॥ हो झालें तें झालें पडिला कपाळीं हा अवगुणी वो ॥
सहज पूर्ण निजरंग सनातन भोगुं अशनीं सयनीं वो ॥ विदेहत्वें विचरों होउनि तन्मय-चिन्मय-भुवनीं वो ॥५॥

पद १५०.
ऐसी कैसी चाल तुमचे घरिंची वो ॥ अंत:करणीं वस्ती नाहीं हरिची वो ॥धृ०॥
घरामध्यें अंध:कार ॥ दीपेविरहित न कळे द्वार ॥ अप्रतिष्टा होते परोपरिची वो ॥१॥
बोलतां जैसें तैसें कांहीं ॥ चालतां तिळ तुल्य नाहीं ॥ फोल बोली अवघी वैखरीची वो ॥२॥
दिवसाची कां रात्री करितां ॥ कुसंगाचा संग धरितां ॥ परम प्रीति दिसते अष्ट पुरीची वो ॥३॥
विषयांचें सुख मानुनि उडतां ॥ पदोपदीं पडतां रडतां ॥ खुण हे नेणोनि कांहीं अंतरींची वो ॥४॥
त्वरा करा परत्या सरा ॥ निजानंदीं रंग भरा ॥ जगद्भान केवळत्वें जळ मरीची वो ॥५॥

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP