पदसंग्रह - पदे ६२१ ते ६२५
रंगनाथ स्वामींचा जन्म शके १५३४ परिघाविसंवत्सर मार्गशीर्ष शुद्ध १० रोजीं झाला.
पद ६२१.
लाहें लाहें हरिनाम गा ॥ सांडुनि विषय काम गा ॥ध्रु०॥
नामरुपातीत ब्रह्म सदोदित केवळ निजसुखधाम गा ॥१॥
निंत्य निरंजन सज्जनरंजन मुनिजनमनविश्राम गा ॥२॥
नाममंत्न स्वतंत्र षडक्षरी निजमूर्ति राम गा ॥३॥
पद ६२२.
ऐसा गुरुभक्त जीवन्मुक्त व्कचित् लोकीं ॥ निगम स्तवितां कीर्ति आनंद मूर्तिमंत तो कीं ॥ध्रु०॥
तनु मन धन प्राण करुनि अर्पण गुरुचरणीं ॥ भजन भाग्य भोगी ह्रदय नित्य गुरुस्मरणीं ॥१॥
विश्वनगीं देखे चित्सुवर्ण गुरु स्वामी ॥ आदि अंत ओतप्रोत सबाह्मांतर्यामीं ॥२॥
अगणित गुण पूर्ण वर्णूं काय सविस्तर ते ॥ सद्नुरुभजनयोगें ज्यांच्या डोलति प्रस्तर ते ॥३॥
गुरुभक्तिचे धरीं मुक्ति वोळंगती दासी ॥ हा द्दढ विश्वास तया वोळंगती काशी ॥४॥
दीपें दीप लागति तेथें ज्येष्ठ कनिष्ठ नाहीं ॥ गुरुपदीं रंगले जे गुरुरूप तेही ॥५॥
पद ६२३.
कां रे नोळखसी नोळखसी ॥ तुझें तुजपाशीं ॥ध्रु०॥
मृग नामीं कस्तुरी अप्तुनी हिंडे वनांतरीं ॥१॥
स्वप्नीं राजा रंक झाला न सोडितां पर्यंक ॥२॥
होतां आवरणमंग सहजीं सहज पूर्ण निजरंग ॥३॥
पद ६२४. [आ. स्वा. कृत. चाल-संतपदांची जोड दे हरी.]
दीनांचा साहाकरी ॥ हरि हा ॥ध्रु०॥
श्रुतिस्मृतिकारक पतितोद्धारक गर्जति अठरा चारी ॥१॥
जाणिव नासुनि जाणे जो निश्वित पावे तो परपारीं ॥२॥
पूर्ण रंग परि भक्तजनास्तव लीलाविग्रहधारी ॥३॥
पद ६२५.
पुंडरिका वर कांहीं माग रे ॥ अपेक्षित जें मनिंचें आपुल्या तें तूं मजला सांग रे ॥ध्रु०॥
देईन पृथ्वीतळिंचें वैभव स्वर्गादिकही भोग रे ॥ भोगीं यावच्चंद्रदिवाकर देतों मी श्रीरंग रे ॥१॥
टाकुनि आलों गोकुळ गोवळ वृंदावन यमुनाहि रे ॥ अभिष्ट पुरविन काय उणें मज मागें तूं लवलाहिं रे ॥२॥
घेईं मुक्ति चारी या कामारी करुनि ठेवीं रे ॥ निरतिशय परमामृत शाश्वत निजसुख रंगें सेवीं रे ॥३॥
N/A
References : N/A
Last Updated : November 11, 2016
TOP