मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|श्रीरंगनाथस्वामीकृत पदसंग्रह|
पदे १६६ ते १७०

पदसंग्रह - पदे १६६ ते १७०

रंगनाथ स्वामींचा जन्म शके १५३४ परिघाविसंवत्सर मार्गशीर्ष शुद्ध १० रोजीं झाला.


पद १६६.
सर्व गोष्टींचें सार ॥ किती सांगों वारंवार ॥
भाव तेथें देव हा निधीर ॥ सिद्धांतमतें ॥१॥
सर्वीं सर्वत्र देव ॥ ऐसा ज्याचा स्वानुभव ॥
श्रुतिज्यातें म्हणती एक-मेव ॥ सिद्धांतमतें ॥२॥
अभाव म्हणिजे नाहीं ॥ भाव ह्मणिजे सर्वां ठायीं ॥
काष्ठीं लोष्टीं देहीं आणि गेहीं ॥ सिद्धांतमतें ॥३॥
अनन्यभावें भक्त ॥ होउनि विरक्त ॥
निजानंदें झाले जीवन्मुक्त सर्व रंगीं ॥४॥

पद १६७.
तुला अझुनि तरी विकृति कां येईना ॥धृ०॥
विषय मन सेवुनि गोड मानिसि मनीं ॥ तिळभरी हें सौख्य तें देईना ॥१॥
गर्भवास पुय पंकीं जंपु कृमि मुखीं नाकीं ॥ चित्त पिसें त्रास कसें घेइना ॥
अस्थि मांस रक्त मुत्र दुर्गंधीचे परम पात्र ॥ निर्मळ हें कल्पवरी होईना ॥३॥
आदि अंत नाशिवंत ॥ दुष्कृतिचें मूर्तिमंत ॥ नन्म मरण कपाळिचे जाईना ॥४॥
सांडुनियां देहसंग निजानंदें पूर्ण रंग तरि हें निजसुख नमीं माईना ॥५॥
त्रिगुणात्मक जन रे ॥ ल्याले अज्ञानांजन रे ॥धृ०॥
लक्षुनि दांभिक द्दश्य पसारा ॥ मूर्ख बहिर्मुख धांवत सैरा ॥१॥
देह बुद्धिचे तादात्मिक नर ॥ सहजचिते विषयांचे किंकर ॥२॥
टाकुनि हा शाश्वत निज रंग ॥ धांवत उखरीं जेविं कुरंग ॥३॥

पद १६८.
भयकृद्भयनाशन अच्युतानंत वो ॥धृ०॥
अमृता समान मान ॥ नवज्वरिता दुग्धपान ॥ विषतुल्य दुर्जना देहांत वो ॥१॥
श्रीहरिचरणां शरण ॥ जन्म मरण संसरण ॥ मृगजळवत्‌ करित रमाकांत वो ॥२॥
निजानंदें एकमेव जैसा भाव तैसा देव ॥ पूर्ण रंगें चित्सागर शांत वो ॥३॥

पद १६९.
आपुला आपण तो वैरी ॥ जों हे विषयीं वय वैरी ॥धृ०॥
पावुनि दुर्लभ नरकाया ॥ भोगित संशय नरका या ॥
वांछित पतींत रमाया ॥ नेणुनि दुस्तर माया ॥१॥
आत्मानात्म-विचाराचा ॥ कीं सत्कर्म आचाराचा ॥
लेश न देखे स्वप्नीं ही घडिला केवळ चारांचा ॥२॥
उत्तम रज तम मानीतो ॥ सत्व गुणा अपमानीतो ॥
बैसेना नर कल्पांतिं सहसा मोक्षविमानीं तो ॥३॥
न पाहे जो निगमागम रे ॥ न करी साधुसमागमरे ॥
हरिचें नाम नये वाचे जें भवतारक सुगम रे ॥४॥
निजानंदें रंगेना ॥ शोक मोह भंगेना ॥
विषयीं झालें मन मोठें तें सत्‌श्रवणें खंगना ॥५॥

पद १७०.
आपुला आपण सखा तो ॥ स्वानंदामृतरस खातो ॥धृ०॥
नवविध भजनीं दिनरजनीं ॥ जनपद त्यागुनियां विजनीं ॥ राहे शम दम साधुनी, मन हें उन्मन निरंजनीं ॥१॥
उचित वर्णाश्रम धर्में ॥ करितो सकळहि सत्कर्में ॥ निर्हेतुक निरहंकारें निषिद्ध जाणुनि हीं वर्में ॥२॥
देवी संपत्तिचा स्वामी ॥ शोभे अखंड निजधामीं ॥ अंतर्मुख द्दष्टी विचरे स्वसुखें निर्गुण-पुर-ग्रामीं ॥३॥
संसारार्णंवतारक तो ॥ केवळ षड्ररिपु मारक तो ॥ सच्छिष्यां सुखकारक तो ॥ पाहातां जगदुद्धारक तो ॥४॥
विद्वज्जन तो सज्ञानी ॥ अभिन्न हरि जन हरि मानी ॥ निजानंदें रंगला वेद जयाचे गुण वानी ॥५॥

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP