पदसंग्रह - पद ५४
रंगनाथ स्वामींचा जन्म शके १५३४ परिघाविसंवत्सर मार्गशीर्ष शुद्ध १० रोजीं झाला.
पद ५४. (दशावतारवर्णन.)
ऐस अवतार दशविध हे दशविध हे ॥ दशविध अवतार झाले हा विचार साचार श्रवणीं ऐका ॥
ही कथा जड जीवां दुस्तर भवसिंधु तारक जैसी नौका ॥धु०॥
मत्स्यापाप्तुनि चारी नरहरीपर्यंत अवतार कृतयुगीं झाले ॥ त्रेतीं वामन परशुराम श्रीराम सगुणत्वा आले ॥
द्वापारीं कृष्ण आठवा तो मनीं आठवितां दोष गेले ॥ बौद्ध अवतार हा कलयुगीं जाणिजे पुढें कल्की व्यास बोले ॥१॥
मधुमासीं शुद्ध प्रतिपदा रेवती विष्कंभो इंदुवासरीं ॥ द्वादश घटिका दिवसा कृतयुगीं मत्स्यरूपी झाला तो श्रीहरी ॥
शंखासुरा वधुना वेद सोदविलें प्रतापतेजं निर्धारी ॥ प्रथम अवतारीं हें चरित्र केलें सादर परिसावें चतुरीं ॥२॥
ज्येष्ठ शुद्ध द्वितिया कृतयुगीं प्रभवीं रोहिणी बुधवार दिवशीं ॥ धृतियोग घटिका चारी होतां प्रकटोनीयां कूर्मशी ॥
सिंधुमंथनीं मम्दराद्रि बुडतां हें जाणोनियां ह्रषीकशी ॥ धरुनि पृष्ठीवरी कार्यसिद्धि केली देवां दानवांची कैसी ॥३॥
माघमास वद्य सप्तमी अवतार रविवारीं शुभ दिनीं झाला ॥ औट घटिला दिवसा साध्य योगीं तो हिरण्याक्ष दैत्य वधिला ॥
दंष्ट्राग्रीं हे मही उचलुनि धरिली थोर पवाडा हा केला ॥ कृतयुगीं वराहरूपें श्रीहरी अरुप रूपासि आला ॥४॥
माधवमासीं शुक्ल चतुर्दशी शनिवार नक्षत्र स्वाती ॥ स्तंभोद्भवें तेव्हां अवतार केला घटिका अष्टविंशति ॥
क्रुत अंगिरा संवत्सरामाजीं धरुनियां नरसिंहाकृति ॥ हिरण्यकश्यपु विदारुनी तो दैत्य लाविला सायुज्यंपथीं ॥५॥
धाता संवत्सरीं त्रेतीं वामन अवतार देवें धरुनी ॥ भाद्रपद शुद्ध द्वादशी नक्षत्र श्रवण अवनितनुज दिनीं ॥
पक्ष घटिका दिवसा दान मागितलें त्रिपदमात्र मेदिनी ॥ बळिचे द्वारीं द्वारपाळ तो झाला पाताळीं त्यासि घालुनी ॥६॥
त्रेतीं प्रमाथीं वैशाखमासीं शनि रोहिणी शुक्लपक्षीं ॥ तृतीया निशिमाजी एकादश घटिका परशुराम सर्वसाक्षी ॥
कार्तवीयी वधुनि नि:क्षत्नी महि करुनी भक्त जनासि संरक्षी ॥ देउनीयां दान ब्राह्मणाचा मान विद्यमानी होय पक्षी ॥७॥
तारण संवत्सरीं चैत्र शुद्ध नवमी पुनर्वसु सुविशेष ॥ दशरथनंदन कौसल्येचे उदरीं श्रीराम अयोध्याधीश ॥
शुक्लयोग शशीवासर बरवा माध्यान्हीं तो रविवंश ॥ अवतरला भक्तकामकल्पद्रुम पूर्णब्रह्म निर्विशेष ॥८॥
कंसनिकंदन नंदनंदन आला वसुदेव-देवकि-उदरा ॥ द्वापारीं बुधवारीं विरोध संवत्सरीं श्रावणमास अवधारा ॥
कृष्ण अष्टमी निशा मध्यकाळीं जन्म झाला परात्परा ॥ रोहिणी नक्षत्रीं कृष्ण अवतार काय वर्णूं निर्विकारा ॥९॥
कलयुगीं हा बौद्ध अवतार घेतला रासभ संवत्सरा आंत ॥ आषाढ शुद्ध नवमी भानुवासर विशाखा नक्षत्र पाप्त ॥
सहा घटिका दिवसा शुक्ल योग निका जन्म झाला परि हा गुप्त ॥ वेदविधि वर्णाश्रम धर्म लोपती सर्वांसि हें आहे क्लप्त ॥१०॥
दुर्मुख संवत्सरीं कलयुगाचे अंतीं मार्गशीर्ष शुद्ध बीज ॥ पूर्वा नक्षत्रीं मंदवासरीं तिनी घटिका झालिया तो सहज ॥
कल्कि अवतार होईल तो पुढें मारिल म्लेच्छ दुर्बिज ॥ शास्त्रिंचें प्रमेय हें जाणुनि न धरिती संशय ते महाराज ॥११॥
यापरी परब्रह्म साकारलें हें जळगारन्यायें पूर्ण ॥ तंतूवरि पट मृत्तिकेसि घट जग नगीं चित्सुवर्ण ॥
नामरूपातीत सत्य सदोदित नित्य निजानंदघन ॥ सहज पूर्ण रंगीं रंगोनि ठेलें निराकार निर्गुण ॥१२॥
N/A
References : N/A
Last Updated : November 11, 2016
TOP