मज्जवहस्त्रोतस - अतत्वाभिनिवेश
धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष या चतुर्विध पुरूषार्थांच्या प्राप्तीकरितां आरोग्य हे अत्यंत आवश्यक असते.
`मलिनाहारशीलस्य वेगान् प्राप्तान्निगृह्वत: ।
शीतोष्णस्निग्धरुक्षाद्यैर्हेतुभिश्चातिसेवितै: ॥५७॥
हृदयं समुपाश्रित्य मनोबुद्धिवहा: सिरा: ।
दोषा: संदूष्य तिष्ठन्ति रजोमोहावृतात्मन: ॥५८॥
रजस्तमोभ्यां वृद्धाभ्यां बुद्धौ मनसि चावृत्ते ।
हृदये व्याकुले दोषैरथ मूढोऽल्पचेतन: ॥५९॥
विषमां कुरुते बुद्धिं नित्यानित्यहिताहिते ।
अतत्त्वभिनिवेशं तमाहुराप्ता महागदम् ॥६०॥
च. चि. १०. ५७ ते ६०
अतत्त्वाभिनिवेश-तत्त्व म्हणजे सत्य व वस्तुस्थिति, हितकर अशी गोष्ट, असे जे नाही ते अतत्त्व. त्या विषयींचा आग्रह, हट्ट म्हणजे अतत्त्वाभिनिवेश. कांहींतरी भलतेच खूळ डोक्यांत घेऊन वागणे या स्वरुपाच्या विकृतीस अतत्वाभिनिवेश असें नांव प्राप्त झाले असावे. मलिन, अपथ्यकर आहार खाणे, वेगधारण करणे, शीत, उष्ण, स्निग्ध, रुक्ष ह्या गुणांनीं युक्त द्रव्यें अधिक प्रमाणांत सेवन करणे ह्या कारणांनीं प्रकुपित झालेले दोष शिराचा आश्रय करुन मनोवह, बुद्धिवह स्त्रोतसांचा रोध करुन रज व मोह यांनीं युक्त असलेल्या व्यक्तिमधे अतत्वाभिनिवेश हा व्याधि उत्पन्न करतात. रज व तम ह्या दोषांनीं मन, बुद्धि झाकाळलीं जाते. विचारशक्ति व्याकूळ होते. मनुष्याच्या बुद्धीचें सामर्थ्य पुष्कळ प्रमाणांत उणावतें, ज्ञान - ग्रहण होत नाहीं, नित्यानित्य, हिताहित या विषयींचे बुद्धीचे निर्णय विषम असतात. हा रोग एक प्रकारें मद व उन्माद यांच्यामधील स्थितीसारखा आहे. कारणांच्या दृष्टीनें मदव्याधीशीं याचें सादृश्य असून लक्षणें उन्मादास जवळचीं आहेत. व्यवहारांत आपण ह्या व्याधीनें पीडित रुग्णास अर्धवट भ्रमिष्ट असें म्हणतो.
चिकित्सा
स्नेहस्वेदोपपन्नं तं संशोध्य वमनादिभि: ।
कृतसंसर्जनं मेध्यैरन्नपानैरुपाचरेत् ॥६१॥
ब्राह्मीस्वरसयुक्तं यत् पञ्चगव्यमुदाहृतम् ।
तत् सेव्यं शड्खपुष्पी च यच्च मेध्यं रसायनम् ॥६२॥
सुहृदश्चानुकूलास्तं स्वाप्ता धर्मार्थवादिन: ।
संयोजयेयुर्विज्ञानधैर्यस्मृतिसमाधिभि: ॥६३॥
च. चि. १०-६१ ते ६३ पान १११
स्नेह, स्वेद व पंचकर्मादि उपचार करुन बुद्धीला बल देणारें अन्नपान सेवन करावें. ब्राह्मी, पंचगव्य, शंखपुष्पी अशीं बुद्धिवर्धक रसायनें वापरावीं त्याच्या धार्मिक व तत्त्वज्ञानाचा अभ्यास असलेल्या इष्टमित्रांनीं रोग्याचा कल पाहून त्यास निरनिराळ्या प्रकारांनीं बोध करुन त्याचें सांतवन करावें. हेच उपचार मदमूर्च्छा संन्यासाच्या वेगानंतरहि करावें
मानसानां च रोगाणां कुर्यात् शारीरवत् क्रियां ।
का. सं. पान ३९
मानसरोग हे निराळ्या मानसिक कारणानें उत्पन्न होत असले तरी शेवटी शरीर हेच मनाचेही अधिष्ठान असते. त्यामुळें मानसरोगावर करावयाची चिकित्सा शरीर महत्त्वाचे समजून केली पाहिजे. नैयायिकांच्या शास्त्राप्रमाणे मन हे अणुस्वरुप असल्यानें त्याची कोणत्याही स्वरुपाची विकृति ही प्रामुख्यानें स्थानवैगुण्यानुरुपच असते यासाठीं शरीररोगाप्रमाणे त्याची ही चिकित्सा करावी असें सांगितले आहे. चरकानें सांगितलेली `धीधैर्यात्मादिविज्ञानं मनोदोषौआषधं परम्' म्हणून सांगितलेलीं चिकित्सा आनुषंगिक समजावी.
N/A
References : N/A
Last Updated : August 07, 2020
TOP