हा व्याधि चिरकारी विकाराच्या स्वरुपांत पुष्कळ व्यक्तींत आढळतो. लक्षणरुपानें त्याचें वर्णन प्राचीन ग्रंथांत अनेक ठिकाणीं आलेलें आहे; मात्र स्वतंत्र व्याधी म्हणून संग्रह केलेला नाहीं सद्य:स्थितींत एक स्वतंत्र विकार म्हणूनच या अवस्थेचा विचार केला पाहिजे.
व्याख्या
प्रतिदिनीं पुरीषवृत्ति व्हावी तशी मोकळी न होणें.
स्वभाव
चिरकारी, पीडाकर
व्या. वि. २२
मार्ग
अभ्यंतर.
प्रकार
वातप्रधान, वातकफप्रधान.
हेतू
विषमाशन, अध्यशन, लंघन, रुक्ष, गुरु, शुष्क, विष्टंभी पदार्थ, द्विदल धान्यें, उसळी, पालेभाज्या, श्लक्ष्ण पिच्छिल गुणाचे आंबलेले पदार्थ अधिक प्रमाणांत व सतत खाणें, रात्रीं जागणें, दिवसा झोपणें, व्यायाम न करणें, अतिमैथुन, वेगविधारण, व्यग्रता, चिंता, पुरुष विसर्जनाचे वेळीं तन्मना नसणें, अग्निमांद्य या कारणांनी मलावष्टंभ होतो.
पूर्वरुप
अधोदरगुरुता, शौचास वेळ लावणें, एक दोन वेळां जाऊनही शौचास ठीक न होणें, दुर्गंधिवातनिस्सरण, क्षुधामांद्य.
रुपें
पोटांत गुबारा धरणें. परसाकडेच्या वेळीं बरेंच कुंथावें लागणें, शौचास झालें तरी पुन: जाऊन यावेंसें वाटणें, पुरीष चिकट शिथिल ग्रंथिल असणें. अधोगरांत अधूनमधून थोडेंसे दुखणें, अन्नपचनास वेळ लागणें, जेवणानंतर क्वचित् मळमळणें, जळजळणें, ढेंकर करपट येणें. अधिक श्रम झाले तर हृदयांत छातींत पोटांत दुखणें, शांत झोंप न लागणें, डोके दुखणें, स्वप्नें पडणें, स्वप्नावस्था होणें. कामाचा उत्साह नसणें, कंटाळा लवकर येणें, स्वभाव त्रासिक, चिडचिडा होणें, अपानाच्या विकृतिमुळें मैथुनशक्तींत विकृती, स्त्रियांमध्ये रज:कृच्छ्रता असणे. वातप्रधान प्रकारांत मल ग्रंथिल, शुष्क असतो शूल, अध्मान, प्रवाहण हीं लक्षणें अधिक असतात. वातकफप्रधान प्रकारांत मल पिच्छिल शिथिल असतो तरीही कुंथल्यावांचून पुढें सरकत नाहीं. अधोदरगुरुता, प्रसेक, मुखदुर्गंधि व क्षुधाल्पता हीं लक्षणें अधिक असतात.
उपद्र्व
निद्रानाश, शिर:स्थूल, शूल, उदावर्त, अर्श, गुदभ्रंश, परिकर्तिका, वृद्धि.
साध्यासाध्यत्व
तरुणांत कष्टसाध्य, वृद्धांत याप्य वा असाध्य,
चिकित्सासूत्र
विरेचन, हें कधीहि तीव्र विरेचन वापरुं नये. स्नेहन, अनुवासनबस्ति अनुलोमन द्रव्यें, आसनांचा व्यायाम, चंक्रमण असे उपचार करावेत. अवयवाला बल मिळेल असें धोरण ठेवावें.
कल्प
हरीतकी, इसबगोल, रानतुळसीचें बी, अहाळीव, दूध, द्राक्षा, आरग्वध, कुचला, सुवर्ण, वंग, अभ्रक, अग्नितुंडीरस, आमपाचकवटी.
विहार
आसनें, चंक्रमण.
अन्न
कोंडयासकट गहूं, ज्वारी, तांदूळ वापरावेत. तांदूळजा, भेंडी, पडवळ, दोडका चाकवत, चुका.
अपथ्य
हेतूं म्हणून सांगितलेले सर्व वर्ज्य करावे.