मराठी मुख्य सूची|भारतीय शास्त्रे|वैद्यक शास्त्र|व्याधिविनिश्चय : उत्तरार्ध| खण्ड दुसरा| मज्जवह, शुक्रवह, मलवह स्त्रोतसें|
परिचय

पुरीषवह स्त्रोतस - परिचय

धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष या चतुर्विध पुरूषार्थांच्या प्राप्तीकरितां आरोग्य हे अत्यंत आवश्यक असते.


पुरीषवहानां स्त्रोतसां पक्वाशयो मूलं स्थूलगुदं च ।
च. वि. ५-५

पक्वाशय व स्थूल गुद हीं पुरीषवाह स्त्रोतसाचीं मूल स्थानें आहेत. या स्त्रोतसाची व्याप्तीही जवळ जवळ वर सांगितलेल्या अवयवांइतकीच मर्यादित आहे.

पञ्चमी पुरीषधरा नाम; याऽन्त:कोष्ठे मलंविभजते पक्वाशयस्था ॥१६॥
यकृत्समन्तात् कोष्ठं च तथाऽन्त्राणि समाश्रिता ।
उण्डकस्थं विभजते मलं मलधरा कला ॥१७॥
सु. शा. ४-१६,१७ पान

अन्नाचे सारकिट्ट विभजन झाल्यानंतर, अन्नाच्या किट्टांतील द्रवभाग व घनभाग मिळून ज्या ठिकाणीं येतो; तो पक्वाशय हा आंतडयाचा शेवटचा भाग असून लघ्वंत्रानंतर असणार्‍या उंडुकापासून त्याची सुरवात होते आणि गुदाच्या बाह्य बलींशीं त्याचा शेवट होतो. अदर गुद, उत्तर गुद अशीं नांवें पक्वाशयाच्या शेवटच्या भागांस दिलेलीं आहेत. या पक्वाशयामध्यें पुरीषधराकला असते. आणि ती द्रवघन किट्टाचें विभजन करुन द्रवभागास जलवाही सिरांच्या द्वारां शरीरांत इतरत्र पाठवते. आणि धनभागाचे पुरीषरुपानें धारण करते.

पुरीषं उपस्तंभं वाय्वग्नी धारणं च ।
सु. सू. १५-५

पक्वाशयामध्यें योग्य मात्रेंत संचित असलेल्या पुरीषामुळें शरीराला ताठ रहाण्यास आधार मिळतो. वायूच्या क्रिया नियंत्रित होतात आणि जाठराग्नीचें पचनकार्य टिकून दीर्घकाल चालूं राहाण्यास मदत होते.

दुष्टि हेतू

विधारणादत्यशनादजीर्णाध्यशनात्तथा ।
वर्चोवाहीनि दुष्यन्ति दुर्बलाग्ने: कृशस्यच ॥२१॥
च. वि. ५-२९ पान ५२८

वेगविधारण, अत्यशन, विषमाशन अजीर्ण, अध्यशन, या कारणांनीं पुरीषवह स्त्रोतसाची दुष्टी होते. अग्निमांद्य आणि कृशता (लंघन) हीं हीं या स्त्रोतसांना दुष्ट करतात.

पुरीषक्षय

कुक्षावाध्मानमाटोपं गौरवं वैदनां शकृत् ।
वा. सु. ११/१३ पान १८४

पुरीष वृद्धीमुळें कुक्षीमध्यें आध्मान, गुरगुरणें, जडपणा, शूल, अशीं लक्षणें होतात.

पुरीषवृद्धि

पुरीषे वायुरंत्राणि सशब्दो वेष्टयन्निव ।
कुक्षौ भ्रमति यात्यूर्ध्व हृत्पार्श्वे पीडयत् भृशम् ॥२१॥
वा. सु. ११/२१ पान १८५

पुरीष क्षीण झालें असतां वायू हा निरनिराळे शब्द करीत आत्रांतून भ्रमण करतांना त्याना पिळवटून टाकीत कुक्षीमध्यें संचार करतो. कुक्षीमध्यें फुगवटा येतो (च. सू. १७-७०) त्याची गति ऊर्ध्व होते व त्यामुळें हृदय व पार्श्व या ठिकाणी शूल उत्पन्न होते.

पुरीष दुष्टि

कृच्छ्रेणाल्पाल्पं सशब्दशूलमतिद्रवमतिग्रथितमतिबहु चोप-
विशन्तं दृष्टा पुरीषवहान्यस्य स्त्रोतांसि प्रदुष्टानीति विद्यात् ।
च. वि. ५-१५ पान ५२६

पुरीषवह स्त्रोतसाच्या दुष्टीमुळें मल प्रवृत्ति वरचेवर, थोडी थोडी, कष्टानें होते. मलप्रवृत्तीच्या वेळीं वा येरवीही शूल होतो. मलाचे स्वरुप अतिद्रव, ग्रंथिल व प्रमाणानें अधिक असें असतें.

विद्ध लक्षणें

तत्र विद्धस्य आनाह:, दुर्गंधता, ग्रथितांत्रता च ।
स. शा. ९-१२ पान २८६.

पुरीषवह स्त्रोतसाचा वेध झाला असतांना आध्मान, दुर्गंध येणे, आतडयांना पीळ पडणे, किंवा आंतडयांत गांठी होणे ही लक्षणे होतात.

N/A

References : N/A
Last Updated : August 08, 2020

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP