स्वरुप
शुक्र हा आहार-रसापासून सर्वांत शेवटीं उत्पन्न होणारा आणि जवळ जवळ साररुप असा धातु आहे. आहार-रसापासून एक मासानें शुक्राची उत्पत्ति होते.
एवं मासेन रस: शुक्री भवति ।
सु. सू. १४-१४
असें सुश्रुतानें सांगितले आहे.
सप्तमी शुक्रधरा, या सर्व प्राणिनां सर्व शरीरव्यापिनी ॥२०॥
यथा पयसि सर्पिस्तु गूढश्चैक्षौ रसो तथा
शरीरेषु तथा शुक्रं नृणां विद्याद् भिषग्वर: ॥४१॥
सु. शा. ४/११ पा. ३५७ सटीक
शुक्रस्य सर्वाड्ग व्याप्तित्वे उपमानं प्रमाणं दर्शयन्नाह -
यथेत्यादि । पयोदृष्टान्तोऽल्प मैथुनत्वाब्दहुशुक्रे पुंसि ॥२०-२१॥
शुक्र हे स्निग्ध, गुरु, पिच्छिल, मधुर रसात्मक प्रकृतीला अनुसरुन तूप, तेल वा मध, या वर्णाचे शीत व किंचित् उग्रगंधी असतें. चरकानें ``अर्धांजली शुक्रस्य । ``च. शा. ७-१५ असें त्याचे प्रमाण सांगितलेलें आहे. शुक्रधराकला ही सर्व शरीराला व्यापून असतें असे म्हटले पाहिजे. या व्यापकतेच्या स्पष्टीकरणासाठीं सुश्रतानें दोन उपमा दिल्या आहेत. तूप ज्याप्रमाणे मूलत: सर्व दुधास व्यापून असते वा रस ज्याप्रमाणें सर्व उसास व्यापून असतो त्याप्रमाणें शुक्रही गूढ, गुप्त, रुपाने सर्व शरीरास व्यापून असतें असें जाणावें. टीकाकारानें धृत व इक्षुरस या उपमांतुन सहजपणें स्त्रवणारे व पीडनानंतर कष्टानें स्त्रवणारें शुक्र असे श्लेष काढले आहेत तेही विचार करण्यासारखे आहेत. शुक्राच्या सर्व शरीर व्यापित्वामुळेंच धातूपधातूंच्या नवनिर्मितीस साहाय्य होतें असें कांहीं तज्ञांचें मत आहे आणि तें योग्य आहे असें आम्हांस वाटतें. कांहीं सार्वदेहीक विकृतीमध्यें शुक्रवर्धन द्रव्यांचा उपयोग होतो असें आढळतें. उदा. कुष्ठरोगामध्यें कुष्ठघ्न औषधासवें वंग दिल्यास चांगला उपयोग होतो.
शुक्रवह स्त्रोतस
वृषण, स्तन, शिस्न हे शुक्रवह स्त्रोतसाचे मूल स्थान आहे. शुक्र व्यक्त होण्याच्या वयांत यामुळें पुरुषांतही स्तनांच्या ठिकाणीं उंत्सेध, शूल, स्पर्शासहत्व हीं लक्षणें अल्प प्रमाणांत उत्पन्न होतात. शुक्राची व्यक्तता पुरुषामध्ये १६ ते १८ या वयांत होते. (शुक्रासंबंधीचे अधिक वर्णन आमच्या कौमारभृत्य तंत्रामध्यें गर्भविज्ञानीय प्रकरणांत पहावे.)
शुक्रसार
सौम्या: सौम्यप्रेक्षिण: क्षीरपूर्ण लोचना इव प्रहर्षबहुला:
स्निग्धवृत्तसारसमसंहतशिखरदशना: प्रसन्नस्निग्ध वर्ण-
स्वरा भ्राजिष्णवो महास्फिचश्च शुक्रसारा: । ते स्त्रीप्रियो-
पभोगा बलवन्त: सुखैश्वर्यारोग्यवित्तसंमाना बहुवपभाजाश्च
भवन्ति ॥१०९॥
च वि ८/१०९ पा. ५८४
स्निग्धसंहतश्वेतास्थिदन्तनखं बहुलकामप्रजं शुक्रेण ।
सु सू ३५ १६ पा. १५२
शुक्रसार-पुरुष सौम्य दृष्टि, प्रसन्न, तेजस्वी आणि शुभ्र, स्निग्ध नेत्र असलेला, डोळे जणूं दुधानें भरलेले आहेत असा दिसणारा, उत्साही, कामुक, आनंदी, अस्थि-दंत-नख हे अवयव सारयुक्त, स्थिर, शुभ्र व स्निग्ध असलेला सुडौल व बळकट शरीराचा, शरीरावयय सारखे वाढलेले व पुष्ट असलेला स्वर, वर्ण व कांति प्रसन्न स्निग्ध असलेला तेजस्वी असा असतो. त्याचा नितंब भाग पुष्ट असतो. स्त्रिया त्याच्यावर विशेष प्रेम करतात. निरनिराळे उपभोग घेण्याची त्यास आवड असते. सुख, ऐश्वर्य आरोग्य, संपत्ति, मान-मान्यता, संतती या गोष्टी त्याला विपुल प्रमाणात मिळतात. त्याचे बल उत्तम असतें.
ओज हा शुक्राचा सारभाग किंवा उपधातु मानलेला आहे. आमच्या मते ओजाला सर्वच धातूंचा सारभाग मानणें अधिक श्रेयस्कर आहे.
ओजो दीप्तौबले (अमर ३/२३२)
स्वादुशीतं मृदुस्निग्धं बहलं श्लक्ष्णपिच्छिलम्
गुरुमंदं प्रसन्नं च गव्यं दशगुणं पय:
तदेवंगुनमेवौज: सामन्यात् अभिवर्धयेत्
च. सू. २७-२१७
गाईच्या दुधाचे आणि ओजाचे गुन सारखेच असल्यानें गोदुग्ध ओजोवर्धक होते. उलट विष आणि मद्य ही लघुरुक्षमाशुविशदं व्यवयितीक्ष्णं विकासिसूक्ष्मं च उष्णमनिर्देश्यरसं दशगुणमुक्तं विषं तज्ज्ञै: (चचि २३-२२ पृ. १३१९)
याप्रमाणें ओजाच्या उलट गुणाची असून त्यामुळें ओज विकृत होते. ओजाला देहस्थितिबंधन (वासू ३१-३०) असें म्हणतात. अष्टांग हृदयावरील इंदूच्या टीकेत तर ``ते च दोषा: समा अपि ओजसा विहीनं देहं संवाहयितुं अशाक्ता''
समस्थितीतील दोषहि ओजाचे सहाय्य नसेल तर शरीराचे धारण करुं शकत नाहींत असें म्हटले आहे. पर ओजाचे प्रमाण अरुणदत्ताने (वासू ११-३ टीका) षड्बिदुक सांगितले आहे. ओजाच्या या स्वरुपामुळें शरीराचे व्याधिक्षमत्व मुख्यत: ओजावरच अवलंबून असते असें म्हटले आहे. कांहीं ठिकाणीं ओजाला शुक्राचा मल म्हटले असलें तरी ते गौण आहे. ओजाला शुक्राचे वा खरें म्हणजे सर्व धातूंचे सार वा परमतेज मानणेच योग्य आहे.
सर्वै: सारैरुपेता: पुरुषा: भवन्त्यतिबला: पर्मगौरवयुक्ता: क्लेशसहा: सार्वरंभेष्वात्मनि
जातप्रत्यया: कल्याणाभिनिवेशिन: स्थिरसमाहितशरींरा सुसमाहितगतय:
सानुनादस्निग्ध गंभीरमहत्स्वरा: सुरवैश्वर्यवित्तोपभोगसंमानभाजो मन्दजरसो
मन्दविकारा: प्राय: तुल्यगुणविस्तीणपित्याश्चिरजीविनश्च प्रायोभवंति !
चवि ८-११३ पृ. ५८४
अत्यंत बलवान, गौरवशाली सहन क्लेश करणारा, कोणतेही काम सहज पार पाडीन असा आत्मविश्वास असणारा, हितकर तेच करण्याची प्रवृत्ति असलेला, सर्व शरीर स्थिर घोटीव रेखिव असणारा, डौलदार चाल असलेला, स्वर निनादत येणारा आकर्षक गोड गंभीर व मोठा असा. म्हातारपण लवकर येत नाहीं, तुल्यगुणाच्या आपत्याना जन्म देणारा, दीर्घायुषी; ही सर्वधातुसाराची चरकानें वर्णिलेली लक्षणें; (ओज हे सर्व धातूंचे सारभूत असल्यामुळें) ओज:साराची मानावीत असें कांही वैद्य मानतात तें विचारार्ह आहे. ओजाला आठवा धातू मानण्याची ही पद्धति आहे. ते ठीक नाहीं. धातुसार म्हणजेच अधिक योग्य आहे.
ओज:क्षय
बिभेति दुर्बलोऽभीक्ष्णं ध्यायति व्यथितेन्द्रिय:
दुच्छायो दुर्मना रुक्ष: क्षामश्चैवोजस: क्षये.
च.सू. १७-७३ पृ. २१८
ओज:क्षयामुळे रोगी भित्रा हळवा दुबळा सारखा काळजी करणारा निरनिराळ्या इंद्रियांत पीडा होणारा काळवंडलेला दु:खी, विषण्ण सत्वहीन रुक्ष कृश असा होतो. यासंबंधीचें अधिक विवेचन आम्ही मागें केलें आहे.
शुक्रवह स्त्रोतसाच्या दुष्टीची कारणें -
अकाल योनिगमनान्निग्रहादतिमैथुनात् ।
शुक्रवाहीनि दुष्यन्ति शस्त्रक्षाराग्निभिस्तथा ॥१९॥
च. वि. ३/१९ पा ५२०
अकाली व अयोग्य योनीशीं मैथुन करणें आणि मुळींच मैथुन न करणें या कारणांनीं शुक्रवह स्त्रोतसाची दुष्टी होते. (दुष्टीची इतर कारणें कौमार-भृत्य-तंत्रातील गर्भ-विज्ञानीय प्रकरणांत पहावी)
शुक्रवृद्धी
अति स्त्रिकामतां वृद्धं शुक्रं शुक्राश्मरीमपि ॥१३॥
शुक्रं वृद्धमतिस्त्रीकामतां कुर्यात्, शुक्राश्मरीं च ।
अपि शब्दाड्लस्नेहावपि ।
वा सू ११ १२ पा. १८३
शुक्रवृद्धीमुळें मैथुनाची इच्छा वाढतें, शुक्राश्मरी उत्पन्न होतो. शरीराचें बल व स्निग्धता वाढते. टीकाकारानें सुचविलेलीं शेवटचीं हीं दोन लक्षणें शुक्रवृद्धीमुळें उत्पन्न होत असलीं तरी शुक्र हे मुळांत साररुप असल्यानें ती विकृतीवाचक न मानतां इष्टच मानली पाहिजेत,
भ्रम: क्लम: स्यात् अतिमंद चेष्ट: ।
शोफौ निशा जागरणं च तंद्रा ।
मंदज्वर: शोष समो मनुष्ये, शुक्रक्षये चांगविचेष्टितानि ।
रोक्ष्यं रमणी द्वेश: दोष: शोफो भ्रमिश्च कंपनता विरुपता
घैकल्यं संधिषु शोतस्तथा याति ।
हारित तृतीय ९ पान २६८
शुक्र क्षयामध्यें भ्रम, फ्रम, मंद चेष्टा, शोथ, निद्रानाश, तंद्रा, मंद ज्वर, शोष, अवयवांना झटके येणे, रुक्षता, स्त्रियांविषयी द्वेश वाटणे, क्रोध, शोध, कंप, सौंदर्य हानि, विकलता; संधिशोष ही लक्षणे होतात.
विद्ध लक्षणे
नपूंसकत्व शुक्रस्त्राव कष्टाने व उशीरा होणे, सरक्त शुक्र स्त्राव ही लक्षणे शुक्रवहस्त्रोतसाच्या वेधानें होतात.
शुक्रक्षय
दौर्बल्यं मुखशोषश्च पाण्डुत्वं सदनं श्रम:
क्लैब्यं शुक्राविसर्गश्च क्षीष शुक्रस्य लक्षणम् ॥६९॥
च. सू. १७-६९
शुक्र क्षये मेद्वृषणवेदना । शक्ति र्मैथुने चिराड्ग
पसेक: प्रसेके चाल्परक्तशूक्र दर्शनम् ॥९॥
सु. सू. १५
शुक्राचा क्षय झाला असतां दुर्बलता, तोंडास कोरड पडणें, पाण्डुता, गळूना गेल्यासारखें वाटणें, थकवा येणें, मैथून शक्ति कमी होणें, नपुसंकता, शिश्न व वृष्ण यांच्या ठिकाणीं वेदना, शुक्रस्त्राव कष्टानें व पुष्कळ वेळानें होणें, शुक्रासवें रक्ताचाही स्त्राव होणें, शुक्रस्त्राव अत्यल्प व शीघ्र होणें ही सर्व लक्षणें शुक्रक्षयाची आहेत.
शुक्रदुष्टी
शुक्रस्य दोषात् क्लैब्यमहर्षणम् ।
रोगी वा क्लीबमल्पायुर्विरुपं वा प्रजायते ॥१८॥
न चास्य जायते गर्भ: पतति प्रसवत्यपि ॥
शुक्रं हि दुष्टं सापत्यं सदारं बाधते नरम् ॥
क्लैब्यमिति ध्वजानुच्छ्राय: । अहर्षणं च सत्यपि ध्वजो-
त्थाने मैथुनाशक्ति: । शुक्रं हि दुष्टं सापत्यं सदारं बाधते
नरमं इति अत्रापत्यबाधा रोगिक्लीवाद्यपत्यजनकत्वेन,
दारबाधा तु स्त्राविगर्भादिजनकत्वेन ॥
च. सु. २८-३२-३३ पान ३७९
शुक्र दुष्टीमुळें शिश्नास ताठपना न येणें, शिश्नोत्थान होऊनही मैथून सामर्थ्य नसणें, मैथुनेच्छा उत्पन्न न होणें, प्रजा, रोगी, क्लिब, विरुप, अल्पायु होणें, गर्भस्त्राव, पात व मृतापत्यता होणे आणि पत्निही व्याधिपीडित होणें अशी लक्षणें होतात. (शुक्रदुष्टीची इतर लक्षणें कौभार-भृत्य तंत्रांतील गर्भ-विज्ञानीय प्रकरणांत पहावीं)