पक्वाशये पुरीषोत्थो जायन्तेऽधोविसर्पिण: ।
प्रवृद्धा: स्युर्भवेयुश्च ते यदाऽमाशयोन्मुखा: ॥१३॥
तदाऽस्योद्गारनि:श्वासा विड्गन्धानुविधायिन: ।
पृथुवृत्ततनुस्थूला: श्यावपीतसितासिता: ॥१४॥
ते पञ्चनाम्ना क्रिमय: ककेरुकमकेरुका: ।
सौसुरादा: सशुलाख्या लेलिहा जनयन्ति हि ॥१५॥
विड्भेदशूलविष्टम्भकार्श्यपारुष्यपाण्डुता: ।
रोमहर्षाग्निसदनं गुदकण्डुविमार्गगा: ॥१६॥
मा. नि. कृमि - १३-१६ पान १११
कफज कृमीमध्यें सांगितलेल्या निदानाप्रमाणेंच पुरीषज कृमीचेंही निदान (हेतु) असते. विशेषत: पूति क्लिन्न, संकीर्ण, विरुद्ध, मलिन, भोजन मृद्भक्षण, पुरीषज कृमींना कारण होते. हे पूरीषज कृमी आकारानें चपटे गोल, बारीक, मोठे, लांब, लोकरीच्या धाग्याप्रमाणें (उर्णाशू सदृशा: ।) असलेले, क्वचित् सूक्ष्म असेही असतात. त्यांचे रंग श्वेत, श्याव, हारीत, पीत, नील असे विविध असतात. ककेरुक, मकेरुक, लेलिहा, सशूलक, सौसुराद, अशी प्रकार भेदानें त्यांची विविध नांवें आहेत. हे कृमी पक्वाशयाच्या अगदीं वरती उत्पन्न होऊन आमाशयाभिमुख झाल्यास हृल्लास छर्दी, पुरीषगंधी उद्गार व निश्वास, अशी लक्षणें उत्पन्न करतात. या कृमींच्यामुळें द्रवमलप्रवृत्ती शूल, मलावष्टंभ, कृशता, त्वचा रुक्ष होणे, पांडुता, रोमहर्ष, अग्निमांद्य, गुदकंडू अशी लक्षणें उत्पन्न होतात. ज्वर, शूल, छर्दी, श्वास, पीनस, भ्रम, मूर्च्छा हृल्लास अशी कृमीमधील सामान्य लक्षणेंही या पुरीषज कृमीमध्यें होतांतच. लहान मुलांच्यामध्यें मलिनाहार, मृद्भक्षण या कारणांनीं, या कृमीची उत्पत्ती विशेष प्रमाणांत दिसून येते.
उपद्रव -
पांडू, उदर, यकृतवृद्धी, हृद्रोग, ज्वर, अतिसार, शोष, शोथ. घोर उपद्रव झाले नसल्यास व्याधी साध्य असतो.
चिकित्सा
विडंग, किरमाणी ओवा, कपिकच्छु, एरण्डकर्कटीबी, (पोपई) लताकरंज, काळाबोळ, कारस्कर, अतिविष डिकेमाली सर्पगंधा पलाशबीज. कृमीमुद्गर, कुमीकुठार, विडंगारिष्ट, कुमारीआसव अशीं द्रव्यें वापरावी. गुरु मधुर स्निग्ध द्रव्यें वापरुं नये. लहान मुलांत मृद्भक्षण करुं देऊं नये. व्याधीची शोधन चिकित्सा १५-२० दिवसांच्या अंतरानें करावी. कृमीच्या प्रकृतिविघातासाठीं करावयाची चिकित्सा दीर्घकाल करावी लागते.