शारीर
मूत्रवहस्त्रोतसामध्यें वृक्क, गविनी, मूत्राशय, पौरुष ग्रंथी, मूत्रप्रसेक, शिस्न या अवयवांचा समावेश होतो. वृक्क हे कुक्षीमध्यें मागच्या लांबट गोल आकाराचे असे दोन मांसपिंड आहेत. त्यांची उत्पत्ति, रक्त व मेद यांच्या प्रसादभागापासून झाली असून हा मातृजभाव आहे. पक्वाशयांतून शोषलें जाणारे आहारजल रस वाहिनींच्या द्वारा वृक्कापर्यंत येऊन तेथून मूत्रांत परिणत होते. म्हणून शारंगधरानें या अवयवाचे वर्णन `आहारजलवाही सिरामूल'' या शब्दानें केले आहे. (शा. प्र. ५-३५ टीका पान ५२८) या वृक्कांतून निघालेल्या दोन गविनी मूत्राशयास (बस्तीस) येऊन मिळतात व त्यांतून मूत्रानें बस्तीचें पूरण होतें. मूत्राशयांत संचित आलेलें मूत्र पुरुषामध्यें पौरुष ग्रंथीतील मार्गातून शिस्नांतील मूत्रप्रसेक द्वारा, शरीराच्या बाहेर पडते. (पुरोहित शारीन पान ११३,१४) मूत्रवहनाच्या या वर्णनावरुन मूत्ररोगाचे अधिष्ठान कोठें कोठें असूं शकते ते लक्षांत येईल.
मूत्रवहानां स्त्रोतसां बस्तिर्मूलं वंक्षणं च ।
च. वि. ५-१४
मूत्रवहस्त्रोतसाचे बस्ति व वंक्षण (वृक्क) हे मूळ होत.
विद्ध लक्षणे
तत्र विद्धस्य आनद्धबस्तिता मूत्रनिरोध:, स्तब्धमेढ्रता च ।
सु. शा. ९-१२ पा. ३८६
मूत्रवह स्त्रोतसाचा वेध झाला असतां बस्ति फुगणे, मूत्रप्रवृत्ति न होणे, शिस्न स्तब्ध होणे अशी लक्षणें होतात. अत्यंत प्राचीन काळीं वृक्क या अवयवाचे कार्य माहिती होते पण पुढे पुढे वृक्काऐवजी बस्ति हा शब्द वापरण्यांत येऊं लागला. (गोखले शरीरक्रिया विज्ञान पान २४२)
चार अंजली हे मूत्राचे प्रमाण आहे. बस्तिपूरण व क्लेदवाहन हे मूत्राचे प्राकृत कर्म आहे.
दुष्टीची कारणें
मूत्रितोदकभक्ष्यस्त्रीसेवनान्मूत्रनिग्रहात् ॥
मूत्रवाहीनि दुष्यन्ति क्षीणस्याभिक्षतस्य च ॥२०॥
च. वि. ५-२८ पान ५२८
मूत्रवेग आला असतांना जेवणें, पाणी पिणें, मैथुन करणे, मूत्रवेगाचे विधारण करणे, अतिशय क्षीण होणे, मार लागणे वा व्रण उत्पन्न होणे या कारणांनीं मूत्रवहस्त्रोतसांची दुष्टी होते.
मूत्रवृद्धि --
मूत्रं मूत्रवृद्धि: मुहुर्मुहु: प्रवृत्तिं बस्तितोदमाध्मानं च ।
सु. सू. अ. १५/१७ पान ७०
मूत्रं तु बस्तिनिस्तोदं कृतेऽप्यकृतसंज्ञताम् ॥१३॥
वा. सू. अ. ११-१३ पान १८४
मूत्रवृद्धीमुळे वारंवार मूत्र प्रवृत्ति होणे, करुन ती न केल्यासारखी वाटणे, बस्तिभागीं टोंचल्यासारखी वेदना होणे, पोट फुगणे अशी लक्षणे उत्पन्न होतात.
मूत्रक्षय
मूत्रक्षये मूत्रकृच्छ्रं मूत्रवैवर्ण्यमेव च ।
पिपासां बाधते चास्य मुखं च परिशुष्यति ॥
च. सू. १७-७१ पान २१८
मूत्रेऽल्पं मूत्रयेत्कृच्छाद्विवर्णं सास्त्रमेव या ॥
वा. सू. अ. ११-२२ पान १८६
मूत्रक्षयामध्ये मूत्राचा वर्ण बदलणे, मूत्रासवे रक्त पडणे, मूत्र प्रवृत्तीचें वेळीं कष्ट होणे, बस्ति तोद होणें, मूत्राचे प्रमाण अल्प होणे, मूत्र प्रवृत्तिचे वेळी अतिशय त्रास होणे, तहान लागणे, तोंड कोरडे पडणे अशी लक्षणे होतात.
मूत्रदुष्टीं
अतिसृष्टमतिबद्धं प्रकुपितमल्पाल्पभभीक्ष्णं वा बहलं सशूलं
मुत्रयन्तं दृष्ट्व ।
मूत्रवहान्यस्य स्त्रोतांसि प्रदुष्टानीति विद्यात् ॥
च. वि. ५-१४ पान ५२६
मूत्रदुष्टीमध्ये मूत्रप्रवृत्ति पुष्कळ होणे, कमी होणे, वरचेवर थोडी होणे, मूत्रप्रवृत्तीचें वेळी शूल होणे, मूत्राचे स्वरुप दाट असणे अशी लक्षणे होतात.
बत्स्यभिघात
बस्तौ तु वातमूत्रवर्चोनिग्रह वंक्षण मेहन बस्तिशूलकुंडलो-
दावर्त गुल्मब्रध्नानिलाष्ठीलोपस्तंभनाभिकुक्षिगुदश्रोणि
ग्रहादय: ।
च. सि. ९-६
कुण्डलं बस्तौ कुंडलरुपां वेदना उपस्तम्भा: बस्तावेव
टीका पान १७२०
निज व आगंतू कारणांनीं बस्तीचा उपघात झाला असतांना वातनिग्रह, मूत्ररोध, मलावष्टंभ, वंक्षण शिस्न बस्तिभागी शूल, वातकुंडल, उदावर्त, गुल्म, व्रध्न (वंक्षण ग्रथिशोथ), अष्टीला, बस्तितंभ, नाभिग्रह, कुक्षिग्रह, गुदग्रह, श्रोणिग्रह असें विकार होतात. हा रोग स्वतंत्र न मानता मूत्रकृच्छ्र मूत्रघाताचे हे एक सामान्य वर्णन मानावें असें आम्हांस वाटते.