क्लीव: स्यात्सुरताशक्तस्तद्भाव: क्लैब्यमुच्यते ।
व्याख्या
मैथुन सामर्थ्य नसणें, या स्थितीस क्लीबता क्लैब्य, नपूंसकत्व या षंढत्व असें म्हणतात. वैद्याकडे उपचारार्थ येणार्या क्लीबामध्यें मनोविघातज, दोषज, आणि शुक्रक्षयज या स्वरुपाचे क्लीबच बहुधा असतात त्यामध्ये संपूर्ण क्लीबतेपासून अल्प मैथुन क्षमतेपर्यन्तच्या विविध विकृति आढळतात. ध्वजोत्थान मुळीच न होणे, मैथुनास आरंभ करतांच अगदीं त्वरित शुक्राचा स्त्राव होणें अशी लक्षणें प्रामुख्यानें आढळतात. शुक्र क्षय आणि अवयव दौर्बल्य हे विकार परस्वरावलंबी असले तरी कांही वेळा ही लक्षणे स्वतंत्रपणे एकेकटीही आढळतात. शुक्रोत्पत्ती प्रकृत असते पण इंद्रीय दौर्बल्य अधिक असते. उलट मैथुनसामर्थ्य असूनही शुक्राल्यत्व, कृच्छ्रशुक्रता असतो. मुळांतच शुक्र अबीज असूनही मैथुन सामर्थ्य असल्यास त्यास क्लीब म्हणण्याचे कारण नाही त्यास वंध्य म्हणावे.
पुरुषामध्यें वंध्यतेचे अंतर्गत भेद म्हणून नष्टबीज, अल्पबीज व अकर्मण्य बीज असे तीन प्रकार करतां येतील. शुक्रामध्यें बीजच नसणें याला नष्ट बीज म्हणावे, बीज कमी असताना अल्प बीज म्हणावे व ज्या वेळी त्याला कार्यकर्तृत्व नसेल त्या वेळी त्यास अकर्मंण्यबीज म्हणावे. नष्टबीज व अकर्मण्यबीज हे शब्द कश्यपानें अनुवासन बस्ती कोणास द्यावा त्याचे वर्णन करताना वापरले आहेत.
(का. स. पान १६७)
असा पुरुष मैथुन कर्म करुं शकतो पण त्यास संतती होत नाहीं. यास नपुंसक म्हणण्यापेक्षा वंध्य म्हणणें बरे. (या वंध्य रुग्णांत इतर शुक्र वर्धक द्रव्यासवे फल व्रत वापरावे.)
प्रकार व रुप
बीजध्वजोपघाताभ्यां जरया शुक्रसंक्षयात् ॥१५४॥
क्लैब्यं संपद्यते तस्य शृणु सामान्यलक्षणम् ।
सड्कल्पप्रवणो नित्यं प्रियां वश्यामपि स्त्रियम् ॥१५५॥
न याति लिड्गशैथिल्यात् कदाचिद्याति वा यादि ।
श्वासार्त: स्विन्नगात्रश्च मोघसड्कल्पचेष्टित: ॥१५६॥
म्लानशिस्नश्च निर्बीज: स्यादेतत् क्लैब्यलक्षणम् ।
सामान्यलक्षणं ह्येतद्विस्तरेण प्रवक्ष्यते ॥१५७॥
च. चि. ३०/१५४ ते १५७ पान १५२२
मैथुनेच्छा उत्पन्न होते. प्रिय व संमती देणारी स्त्रीही जवळ असते. परंतु शिश्नाच्या शैथिल्यामुळें संभोग मात्र करतां येत नाही. कदाचित् मैथून क्रियेस प्रवृत्त झालाच तर दम लागतो, घाम येतो, प्रयत्न फोल ठरतात. निराशा होते. शिस्न संकुचित रहाते. शुक्र स्त्राव होत नाही अशा स्थितीस क्लैब्य असे म्हणतात. ही क्लीबता बीजोपघात, ध्वजोपघात, वार्धक्य, व शुक्रक्षय या ४ प्रकारानी येते.
बीजोपघात
शीतरुक्षाल्पसंक्लिष्टविरुद्धाजीर्णभोजनात् ।
शोकचिन्ताभयत्रासात् स्त्रीणां चात्यर्थसेवनात् ॥
अभिचारादविस्त्रम्भाद्रसादीनां च संक्षयात् ।
वातादीनां च वैषम्यात्तथैवानशनाच्छ्रमात् ॥१५९॥
नारीणामरसज्ञत्वात् पञ्चकर्मापचारत: ।
बीजोपघाताद्भवति पाण्डुवर्ण: सुदुर्बल: ॥१६०॥
अल्पप्राणोऽल्पहर्षश्च प्रमदासु भवेन्नर: ।
हृत्पाण्डुरोगतमककामलाश्रमपीडित: ॥१६१॥
छर्द्यतीसारशूलार्त: कासज्वरनिपीडित: ।
बीजोपघातजं क्लैब्यं
च. चि. ३०/१५८ ते १६१ पान १५२२
शीत, रुक्ष, अल्प, मिसळीस विरुद्ध असे अन्न सेवन करणे, अजीर्ण झालें असतांनाही जेवणे, शोक चिंता भय यामुळे मन ग्रस्त होणे, अतिमैथुन करणे, अभिचार कर्म, विश्वासघात (स्त्रीनें केलेला) धातुक्षय, दोषवैषम्य, लंघन, श्रम, स्त्रीचे सहकार्य नसणे (अरसिकता) पंचकर्माचा मिथ्या योग या कारणांनी (दोष प्रकुपित होऊन) बीजाचा (शुक्राचा) उपघात होतो. त्यामुळें पुरुष फिकट (पांडुवर्ण), दुर्बल, संभोग शक्ति अल्प असलेला, स्त्रीसंभोगाची इच्छा अगदीं थोडी असलेला असा होतो. या पुरुषास हृद्रोग पांडुरोग, श्वास, कामला, श्रम, छर्दी, अतिसार, शूल, कास, ज्वर हे व्याधी पीडा देतात आणि क्लीबता येते.
ध्वजोपघात
चरकानें ध्वजोपघातकृत क्लैब्याचे जे वर्णन केलेले आहे ते मिथ्याहार विहाराने उत्पन्न झालेल्या शिस्नगत शोथ, राग, पिडका, स्त्राव व कोथ इत्यादि रोगास अनुलक्षून आहेत. कोथ होऊन इंद्रिय नाश झाला नसेल तर व्याधी बरा होताच ही क्लीबता नाहीशीं होते. भाव प्रकाश कारानें वर्णिलेला चवथा प्रकार तो हाच. ही क्लीबता उपद्रवात्मक असल्यानें उपदंश, शूक दोष या सारख्या व्याधींत या अवस्थेचा विचार करणे उचित ठरेल म्हणून आम्ही येथे विस्तार केलेला नाही.
जरा संभव क्लैब्य
क्लैब्यं जरासंभवं हि प्रवक्ष्याम्यथ तच्छृणु ॥१७६॥
जघन्यमध्यप्रवरं वयस्त्रिविधमुच्यते ।
अतिप्रवयसां शुक्रं प्रायश: क्षीयते नृणाम् ॥१७७॥
रसादीनां संक्षयाश्च तथैवावृष्यसेवनात् ।
बलवीर्येन्द्रियाणां च क्रमेणैव परिक्षयात् ॥१७८॥
परिक्षयादायुषश्चाप्यनाहाराच्छ्मात् क्लमात् ।
जरासंभवजं क्लैब्यंमित्येतैर्हेतुभिर्नृणाम् ॥१७९॥
जायते तेन सोऽत्यर्थं क्षीणधातु: सुदुर्बल: ।
विवर्णौ दुर्बलो दीन: क्षिप्रं व्याधिमथाश्रुते ॥१८०॥
एतज्जरासंभवं हि ।
च. चि. ३०/१७६ ते १८० पा. १५२३-२४
बाल्य, तारुण्य, वार्धक्य, या वयाच्या तीन अवस्थेपैकी वृद्धपणी क्रमाक्रमानें (इतर धातू सर्वच) शुक्रही क्षीण होत जाते व क्लीबता येते त्यांतही रसादि धातू शुष्क होत जाणे बाजीकरण प्रयोग न करणे, बल वीर्य इंद्रिये आयुष्य यांचा क्रमाने र्हास होत जाणे, जेवण न जाणे, गळून जाणे, थकणें ही म्हातारपणाची लक्षणे जसजशीं वाढत जातील तसतशीं क्लिबता येते. पुरुष सप्त धातू क्षीण झालेला दुर्बल, वर्णहीन केविलवाणा, निरनिराळ्या व्याधीना बळी पडणारा असा होतो.
शुक्रक्षयज
चतुर्थं क्षयजं श्रुणु ।
अतीवचिन्तनाच्चैव शोकात्क्रोधद्भयात्तथा ॥१८१॥
ईर्ष्यात्कण्ठामदोद्वेगान् सदा विशति यो नर: ।
कृशो वा सेवते रुक्षमन्नपानं तथौषधम् ॥१८२॥
दुर्बलप्रकृतिश्चैव निराहारो भवेद्यदि ।
असात्म्यभोजनाच्चापि हृदये यो व्यवस्थित: ॥१८३॥
रसप्रधानधातुर्हि क्षीयेताशु ततो नृणाम् ।
रक्तादयश्च क्षीयन्ते धातवस्तसय देहिन: ॥१८४॥
शुक्रावसानास्तेभ्योऽपि शुक्रं तत: प्राप्नोति संक्षयम् ।
घोरं व्याधिमवाप्नोति मरणं वा स गच्छति ॥१८६॥
शुक्रं तस्माद्विशेषेण रक्ष्यमारोग्यमिच्छता ।
एवं निदानलिड्गाभ्यामुक्तं क्लैब्यं चतुर्विधम् ॥१८७॥
च. चि. ३०/१८१ ते ८७ पान १५२४
काळजी, शोक, क्रोध, भय, ईर्षा, उत्कंठा, मद, उद्वेग, यांची पीडा ज्या पुरुषास वरचेवर होते कृश असूनही जो रुक्ष अन्नपान करतो. प्रकृतीने दुर्बल असून निराहार रहातो, अहितकर अन्न खातो, त्याच्या ठिकाणीं रसादि धातू क्षीणता पावून क्रमाने शुक्रही क्षीण होते अशा शुक्र क्षीण झालेल्या स्थितीतही चित्तातील कामुकतेमुळे जो वरचेवर मेंथुनसेवन करीत रहातो त्याचे शुक्र अधिकच क्षीण होते आणि क्लैब्य, इतर विविध व्याधी वा शेवटी मृत्यु यास तो पुरुष बळी पडतो.
तच्च सप्तविधं निदानं तस्य कथ्यते ॥२॥
तैस्तैर्भावरैहृद्यैस्तू रिंरंसोर्मनसि क्षते ।
ध्वज: पतत्यतो नृणां क्लैब्यं समुपजायते ॥३॥
द्वेष्यस्त्रीसंप्रयोगाच्च क्लैब्यं तन्मानसं स्मृतम्
कटुकाम्लोष्णलवणैरतिमात्रोपसेवितै:
पित्ताच्छूक्रक्षयो दृष्ट: क्लैब्यं तस्मात्प्रजायते ॥४॥
अतिव्यव्यायशीलो यो न च वाजीक्रियारत: ।
ध्वजभगड्मवाप्नोति स शुक्रक्षयहेतुक: ॥५॥
महता मेढूरोगेण चतुर्थी क्लीबता भवेत् ।
वीर्यवाही सिराच्छेदान्मेहनानुन्नतिर्भवेत् ॥६॥
बलिन: क्षुब्धमनसो निरोधाद् ब्रह्मचर्यत: ।
षष्ठं क्लैब्यं स्मृतं तत्तु शुक्रस्तम्भनिमित्तकम् ॥७॥
जन्मप्रभृति यत्क्लैब्यं सहजं तद्धि सप्तमम् ॥८॥
भावप्रकाश उत्तर खंड बाजीकरण अ. २-८ पा. ७७६
भावप्रकाशानें क्लैब्याचे सात प्रकार वर्णन केलेले आहेते. (शोक, भय, चिंता, उद्वेग. किळस आणि) न आवडणार्या स्त्रीशी संबंध, या कारणांनीं मनांवर एक प्रकारचा आघात होऊन त्याचा परिणाम म्हणून शिस्नाला शैथिल्य येते, हे मांनसिक क्लैब्य. कटु अम्ल उष्ण, लवण रुक्ष, शुष्क, तीक्ष्ण, अल्प अशा द्रव्यांच्या सेवनाने दोष प्रकोप होऊन, त्यांच्या परिणामानें शुक्र क्षीण होते, त्यामुळें, नपुंसकत्व येते. हा दोषज शुक्रक्षय विशेषत: पित्तामुळें होतो. (मात्र शुक्र क्षय केवळ पित्त कोपामुळेंच होतो. असें मानण्याचे कारण नाही) यास दोषज क्लैब्य असें म्हणतात. अतिव्ययाय करणारा पुरुष शुक्रवर्धक वाजीकरण असें उपचार न करतांच मैथुन करीत राहील तर शुक्राचा क्षय होऊन इंद्रिय शैथिल्य येते हे शुक्रक्षयज क्लैब्य. हस्तुमैथुनादि अनैसर्गिग क्रियाच्या अतियोगानेहीं या स्वरुपाचे क्लैब्य येते. उपदंश, फिरंग, शूकदोष, कुष्ठ, विद्रधी यासारख्या शिश्नास उत्पन्न होणार्या दुर्धर रोगांमुळे जे क्लैब्य येते त्यास व्याधिज क्लैब्य असें म्हणावे. आघात वा शस्त्रकर्मादि कारणांनीं जननेंद्रियाच्या निरनिराळ्या स्वरुपाच्या धमनी व सिरा तुटल्यास त्याचा परिणाम म्हणून ध्वजभंग होतो या प्रकारास आघातज वा आगंतुज क्लैब्य म्हणावे. काम वासना उत्पन्न होऊनही जो बलानें ब्रह्मचर्य धारण करुन शुक्राचा निग्रह करतो त्यास शुक्रनिरोधज असे म्हणावे. बीज दोषामुळे प्रकृतित:च जे क्लैब्य असते त्यास सहज क्लैब्य असे म्हणावे. या सहज क्लैब्याचे सुश्रुतानें आसेक्य, सौगंधिक, कुंभीक, ईर्षक, षंडक, असे प्रकार सांगितले आहे.
पित्रोरत्यल्पबीजत्वादासेक्य: पुरुषो भवेत् ।
स शुक्रं प्राश्य लभते ध्वजोच्छ्रायमसंशयम् ॥३८॥
पित्रोरित्यादि । पित्रो: पितृमात्रोरत्यल्पबीजत्वादासेक्य:
पुरुषो भवेत् आसेक्यो नाम पुरुषो जायते । स शुक्रं
प्राश्येति स पुरुषोऽन्यपुरुषान्निजमुखेन व्यवायं कारयित्वा
तत: सिक्तं शुक्रं प्राश्य आस्वाद्य ध्वजोच्छ्रायं लिड्गोत्वानं
लभते; आसेक्य नामाऽयं षण्ढो मुखयोन्यपरपर्याय: ॥३९॥
सु. शा. २/३८ सटीक. पान ३४८
मातापित्यांच्या दुर्बल बीजामुळे आसेक्य नांवाचा क्लीब उत्पन्न होतो हा स्वत:च्या मुखामध्ये अन्य पुरुषाचे शिश्न धरुन आचूषणादि क्रियांनीं शुक्रस्त्राव करवून ते प्राशन करतो व त्या नंतर त्याच्या ठिकाणी ध्वजोत्थान होते. व नंतर तो मैथुनास प्रवृत्त होतो. यास मुखयोनि असेहि म्हणतात.
य: पूतियोनौ जायेत स सौगन्धिकसंज्ञित: ।
स योनिशेफसोर्गन्धमाघ्राय लभते बलम् ॥३८॥
सु. शा. २/३९ पान ३४८
पूति दोषांनी युक्त अशा योनीच्या ठिकाणी उत्पन्न होणारा जो क्लीब त्यास सौगंधिक असे म्हणतात. अन्य पुरुषाचे शिश्न वा योनी हुंगल्यानंतर या सौगंधिक क्लीबाच्या ठिकाणी ध्वजोत्थान होते.
स्वे गुदे ऽब्रह्मचर्याद्य: स्त्रीषु पुंवत् प्रवर्तते ।
कुम्भीक: स तु विज्ञेय: ।
स्वे गुदे इत्यादि । य: पुरुष: स्वे गुदे
स्वकीयपायौ, अब्रह्मचर्यात् अन्यपुरुषपार्श्वाद्व्ययायं कार-
यित्वा पश्चात् स्त्रीषु विषये पुमानिवप्रवर्तते पुरुषवद्व्ययायं
करोति स कुम्भीकनामा षण्ढो ज्ञेय: । अन्ये तु प्रथमं स्त्रीषु
विषये तासामेव स्वकीयगुदविवरे पशुवत् पृष्ठभागे
शिथिलेनैव मेहनेन प्रवर्तते । किंनिमित्तमेतदित्याहब्रह्मच-
र्यात् क्लैब्यवशसंजाताप्रवृत्तित्वात् । ततश्चानया विप्रकृत्या
धव्जोच्छ्राये संजाते स एव स्त्रीषु पुरुषवत् प्रवर्तते स कुम्भी-
कनामा नपुंसकभेद: । गुदयोनिरयम् । अस्योत्पत्तिहेतुस्त-
न्त्रान्तरे वर्णितो यथा - मातुर्व्यवायप्रतिघेन वक्री स्या/
ह्ब्रीजदौर्बल्यतया पितुश्च'' इति ।
सु. शा. २/४० सटीक पान २४८-४९
स्वत:च्या गुदाच्या ठिकाणी दुसर्या पुरुषाकडून मैथून करवून घेतल्यानंतर ज्याचे ध्वजोत्थान होते त्यास कुंभिक क्लीब असें म्हणतात. टीकाकारानें या कुंभीकाचे इतरही प्रकार वर्णन केलेले आहेत. स्त्रीच्याच ठिकाणीं प्रथम तिच्या गुदावर घर्षन करुन वा मैथुन करुन मग त्याला ध्वजोत्थान प्राप्त होते त्यासही कुंभिक असेंच म्हटले आहे. मातापित्यांच्या बीज दोषामुळे या स्वरुपाची क्लीबता उत्पन्न होते असेंही टीकाकारानें सांगितलें आहे. ऋतुकाळ असूनही तद्दर्शक रज:प्रवृत्ती मात्र नसते. अशा स्त्रीच्या ठिकाणी `कफ प्रधान शुक्र असलेला पुरुष मैथुनास प्रवृत्त होतो त्याचे वा तिचेर प्रेम मात्र अन्य व्यक्तीवर असते अशा स्थितीत गर्भ राहिल्यास कुंभिक षण्ड उत्पन्न होतो.
(गयी सु. शा. २-४० टीका)
ईर्ष्यकं शृणु चापरम् ॥४०॥
दृष्ट्वा व्यवायमनेषां व्यवाये य: प्रवर्तते ॥
ईर्ष्यक: स तु विज्ञेय:,
सु. शा. २-४० पान ३४९
अन्य व्यक्तींचे मैथुन कर्म पाहून त्या ईर्षेने ज्याचे ध्वजोत्थान होते त्यास ईर्ष्यक क्लैब्य असें म्हणतात. [सुश्रुतानें वर्णन केलेला षंढ व चरकाने वर्णन केलेले तृण पुत्रिक व वार्ता हे क्लीबाचे प्रकार कौमारभृत्यतंत्रातील गर्भविज्ञानीयप्रक्रणांत गर्भविकृतीप्रकरणी वर्णन केलेले आहेत]
या सुश्रुकोक्त क्लीबांच्यामध्यें कांही विशिष्ट प्रकारांनीं मैथुन शक्य होत असले तरी ते सर्व एक प्रकाराने क्लीबच आहेत. त्यांच्यातील ही अनैसर्गिकता त्यांच्या विकृत मनोवृत्तीची निदर्शक आहेत. या प्रकारच्या विकृति प्रत्यक्षांत कांहीं वेळां आढळून येतात. परंतु त्यावर औषधोपचारांचा कांहीही उपयोग होत नाही या विकृतीची चिकित्सा मानसोपचारी वैद्यांच्या स्वाधीन असण्याची शक्यता आहे.
साध्यासाध्यता
मानसिक, दोषज, शुक्रक्षयज, शुक्रनिरोधच हे क्लैब्याचे प्रकार साध्य वा कष्टसाध्य आहेत. व्याधिज, आधातज, सहज, आणि जरासंभव हे क्लैब्य असाध्य आहे. चरकानें माता पित्यांच्या बीज दोषामुळें उत्पन्न होणारे क्लैब्य असाध्य सांगितलें आहे. तसेंच वृषण छेदून टाकल्याने येणारी क्लीबता ही असाध्य सांगितलेली आहे. ध्वजभंगामुळे व शुक्रक्षीणतेमुळे येणारी क्लीबता असाध्य असते. मातापित्यांच्या बीजदोषामुळें क्लीब असलेला पुरुष इतर दृष्टीने पूर्णवाढ झालेल्या पुरुषासारखा दिसत असला तरी खरा नपूंसकच असतो (च. चि. ३०-१८८ ते १९०
उपद्रव
मेद् वृषण शूल
उदर्क
अरति, दैन्य, भीरुता, दौर्बल्य, निरुत्साह, औदासीन्य, एकांतप्रियता, मत्सर, कार्श्य, अशी शारीरिक व मानसिक लक्षणे उत्पन्न होतात.
चिकित्सासूत्रें
विस्तरेण प्रवक्ष्यामि क्लैब्यानां भेषजं पुन: ।
सुस्विन्नस्निग्धगात्रस्य स्नेहयुक्तं विरेचनम् ॥१९६॥
अन्नाशनं तत: कुर्यादथवाऽऽस्थापनं पुन: ।
प्रदद्यान्मतिमान् वैद्यस्ततमनुवासयेत् ॥१९७॥
पलाशैरण्डमुस्ताद्यै: पश्चादास्थापयेत्तथा ।
वाजीकरणयोगाश्च पूर्वं ये समुदाहृता: ॥१९८॥
भिषजा ते प्रयोज्या: स्यु: क्लैब्ये बीजोपघातजे ।
ध्वजभड्गकृतं क्लैब्यं ज्ञात्वा तस्याचरेत् क्रियाम् ॥१९९॥
प्रदेहान् परिषेकांश्च कुर्याद्वा रक्तमोक्षणम् ।
स्नेहपानं च कुर्वीत सस्नेहं च विरेचनम् ॥२००॥
अनुवासं तत: कुर्यादथवाऽऽस्थापनं पुन: ।
व्रणवच्च क्रिया: सर्वास्तत्र कुर्याद्विचक्षणा ॥२०१॥
जरासंभवजे क्लैब्ये क्षयजे चैव कारयेत् ।
स्नेहस्वेदोपपन्नस्य सस्नेहं शोधनं हितम् ॥२०२॥
क्षीरसर्पिर्वृष्ययोगा बस्तयश्चैव यापना: ।
रसायनप्रयोगाश्च तयोर्भेषजमुच्यते ॥२०३॥
विस्तरेणैतदुद्दिष्ट॓ क्लैब्यानां भेषजं मया ।
च. चि. ३०/१९६ ते २०३ पान १५२५
स्नेह स्वेदानंतर साध्य क्लीबाना स्नेहयुक्त विरेचन द्यावे. नंतर आस्थापन अनुवासन बस्ती द्यावे, नंतर वाजीकरण प्रयोग करावे. व्याधिविशेषाप्रमाणे वा कारणविशेषाप्रमाणे प्रदेह (निरनिराळ्या प्रकारचे लेप) परिषेक, स्वेद, रक्तमोक्ष असे उपचार करावे. अकालीं वार्धक्य येऊन क्लीबता आली असल्यास स्नेहन, स्वेदन, शोधनानंतर सिद्धघृत सिद्धदूध, शामकबृंहणबस्ती, वाजीकरण व रसायन असे उपचार करावे.
द्रव्यें
विदारी, अश्वगंधा, कपिकच्छु, कारस्कर, भांग, जातिफळ, अहिफेन; केशर चंद्रप्रभा, अभ्रक, वंग, नाग, सुवर्ण, रौप्य, वसंतकुसुमाकर, महायोगराजगुग्गुळ, द्राक्षासव, च्यवनप्रकाश, अश्वगंधारिष्ट, अशी औषधें वापरावी.
पथ्यापथ्य
स्निग्ध मधुर रसात्मक, लघ असा आहार घ्यावा, नियंत्रित प्रमाणांत ब्रह्मचर्य पाळावे, स्वस्थ वृत्ताचे पालन करावे वात -मूत्र - पुरीष यांचे वेग धारण करुं नयेत, सत्संग, सत्कथा श्रवण, मनाची प्रसन्नता यांचा अवलंब करावा निरनिराळे वाजीकर प्रयोग आचरावे.