व्याख्या
स्मृतिर्भूतार्थविज्ञानमपश्च परिवर्जते ।
अपस्मार इति प्रोक्तस्ततोऽयं व्याधिरन्तकृत् ॥३॥
सु. उ. ६१-३ पान ७१९
अपस्मारं पुन: स्मृतिबुद्धिसत्त्वसंप्लवाद्बीभत्सचेष्टभाव-
स्थिकं तम: प्रवेशमाचक्षते ॥५॥
सटीक च. नि. ८-५ पान ४७८
अपस्मारप्रत्यात्मलक्षणमाह - अपस्मारं पुनरित्यादि ।
संप्लवादिति विकृतिगमनात् । बीभत्सा फेनवमनाड्गभड्गा-
दिरुपा चेष्टा यस्मिन् तद्बीभत्सचेष्टम् । आवस्थिकं
तम:प्रवेशमिति कदाचित्कं तम:प्रवेशं; तम:प्रवेशोऽज्ञान-
साधर्म्यात्, अपस्मारवेगवान् हि तम:प्रवेशे इव न किंचिदवबुध्यते ॥५॥
वस्तुस्थितीच्या ज्ञानास स्मृति असें म्हणतात. अशी स्मृति ज्या अवस्थेंत नाहींशी होते त्या व्याधीस अपस्मार असें म्हणतात. ह्या व्याधींत स्मृति, बुद्धि, सत्त्व या भावांना विकृति येऊन विकृतस्वरुपाच्या हालचाली करीत रोगी मूर्च्छित होतो. याचे वेग येतात.
स्वभाव
दारुण चिरकारी.
मार्ग
मध्यम.
प्रकार
चार
इह खलु चत्वारोऽपस्मारा भवन्ति वातपित्तकफसन्नि-
पातनिमित्ता: ॥३॥
च. नि. ८-३ पान ४७८
वातज, पित्तज, कफज व सान्निपातिक असे अपस्माराचे चार प्रकार आहेत.
निदान
मिथ्यातियोगेन्द्रियार्थकर्मणामभिसेवनात् ॥
विरुद्धमलोनाहारविहारकुपितैर्मलै: ॥४॥
वेगनिग्रहशीलानामहिताशुचिभोजिनाम् ॥
रजस्तमोभिभूतानां गच्छतां च रजस्वलाम् ॥५॥
तथा कामभयोद्वेगक्रोधशोकादिभिभृंशम् ॥
चेतस्यभिहते पुंसामपस्मारोऽभिजायते ॥६॥
सु. उ. ६१-४ ते ६ पान ७६९.
इंद्रियांचे व्यापार हे हीनमिथ्यातियोग-दोषांनीं युक्त होणें, विरुद्ध अन्न, मलिन असा आहार-विहार, वेगनिग्रह-अहितकर, अशुचिभोजन, रजस्वला स्त्रीशीं मैथुन करणें; काम, भय, उद्वेग, क्रोध, शोक, ह्यांचा चित्तावर परिणाम होऊण मनाचें रजोगुण व तमोगुण हे दोष वाढणें-या कारणांनीं दोष प्रकुपित होऊन अपस्मार व्याधी उत्पन्न करतात. आहार-विहारांतील मलिनता केवळ दृश्य स्वरुपाचीच असते असें नाहीं तर ती अदृश्य स्वरुपाचीही असूं शकते, ह्यासाठींच आतंकदर्पणकार व डल्हण यांनीं मलिनता दृष्टादृष्टार्थ असते असें म्हटलें आहे. चरकानें अभिचार कर्मांतील तंत्रप्रयोगांत चूक होंणें, शरीराच्या हालचाली विषम होणें, शरीर अतिशय क्षीण होणें, अशीं कारणें अधिक सांगितलीं आहेत.
(च. नि-८-४)
संप्राप्ति
दोषा: प्रकुपिता रजस्तमोभ्यामुपहतचेतसामन्तरात्मन:
श्रेष्ठतममायतनं हृदयमुपसृत्योपरि तिष्ठन्ते, तथेन्द्रियाय-
तनानि च । तत्र चावस्थित: सन्तो यदा हृदयमिन्द्रिया-
यतनानि च । तत्र चावस्थिता: सन्तो यदा हृदयमिन्द्रिया-
यतनानि चेरिता: कामक्रोधभयलोभमोहहर्षशोक
चिन्तोद्वेगादिभि: सहसाऽभिपूरयन्ति, तदा जन्तुरप-
स्मरति ॥४॥
प्रकुपित झालेले दोष रजस्तमानें चित्त विकृत झालेल्या मनुष्याच्या चेतनास्थानांत प्रवेश करुन, इंद्रियांची विकृति उत्पन्न करतात. संज्ञावह स्त्रोतसांचा रोध होऊन रोग्याला मूर्च्छना उत्पन्न होते.
अपस्माराची संप्राप्ति
पित्तं मरुच्च श्लेष्मा च उदान: कुपितो भृशं ।
प्राण: शिरसी संकुद्धो कुरुते नष्टचेष्टता ॥
कष्टं च घुरघुरायेत फेनमुद्गीरतेऽथवा ॥
कंपेते हस्तपादौ च रक्तव्यावर्तिलोचनं ॥
हारित तृतीय १८ पान ३४०.
अपस्माराच्या संप्राप्तींत हारितानें पित्त, कफ, उदान, प्राणवायु शिरांमध्यें प्रकुपित होऊन अपस्मार व्याधी उत्पन्न करतात, असें म्हटलें आहे. या व्याधींत मूर्च्छा येते. हातापायास झटके येतात, घसा घुरघुरतो, डोळे लाल होतात व फिरतात, तोंडावाटे फेस येतो. ही हारीतानें सांगितलेली लक्षणें सामान्य लक्षणें म्हणून सांगितली आहेत.
पूर्वरुपें
रुपमुत्पत्स्यमानेऽस्मिन् हृत्कम्प: शून्यता भ्रम: ।
तमसो दर्शनं ध्यानं भ्रूव्युदासोऽक्षिवैकृतम् ॥६॥
अशब्दश्रवणं स्वेदो लालासिड्घाणस्त्रुति: ।
अविपाकोऽरुचिर्मूर्च्छा कुक्ष्यटोपो बलक्षय: ॥७॥
निद्रानाशोऽड्गमर्दस्तृट् स्वप्ने गानं सनर्तनम् ।
पानं तैलस्य मद्यस्य तयोरेव च मेहनम् ॥८॥
वा. उ. ७-६ ते ८ पान ८०२.
हृदय कापणें, हृदयांत व डोक्यांत रिकामेपणा वाटणें, श्रम, अंधारी येणें, ध्यान, भिवयांचा संकोच होणें, डोळे विकृत होणें, नसलेले शब्द ऐकू येणें, घाम येणें, लाळ सुटणें, नाकांतून पाणी येणें, अन्न न पचणें, रुचि नसणें, मूर्च्छा, पोट गुबारणें, बल कमी होणें, झोप न येणें, अंग दुखणें, तहान लागणें, स्वप्नामध्यें गातो आहों, नाचतो आहों, तेल वा मद्य पीत आहो वा तेलाची व मद्याची मूत्रप्रवृत्ति होते आहे असें दिसणे अशी लक्षणें अपस्माराच्या पूर्वरुपामधें होतात. चरकानें अस्थिभेद, हृदयग्रह, तमोदर्शन, स्वप्नामध्यें कांपणें, पडणें, भोसकले जाणें, अशीं लक्षणें अधिक वर्णन केलेली आहेत, (च. नि. ८-६)
रुपे
हते सत्त्वे हृदि व्याप्ते संज्ञावाहिषु खेषु च ।
तमो विशन् मूढमतिबींभत्सा: कुरुते क्रिया: ॥
दन्तान् खादन् वमन्फेनं हस्तौ पादौ च विक्षिपन् ।
पश्यन्नसन्तिरुपाणि प्रस्खलन् पतति क्षितौ ॥
विजिह्वक्षिभ्रुवो दोषवेगेऽतीते विबुध्यते ।
कालान्तरेण सपुनश्चैवमेव विचिष्टते ॥
अ. सं. उ, १० पान ७९-८०
अपस्मारो हि स्मृत्यपाय: स्मृत्यपगम उच्यते । स चाप-
स्मारो धियो बुद्धे: सत्त्वस्य धैर्यस्य चाभिसंप्लवाद्विनाशा-
ज्जायते । कथमित्याह । चिन्तादिभिश्चित्तेऽभिहते उन्मा-
दोक्तप्रकारेण प्रकुपितैश्चित्तदेहगतैर्मलै रजस्तमोवातादिभि:
सत्त्वे हते हृदि च व्याप्ते संज्ञावाहिषु च स्त्रोतस्सु व्याप्ते-
ष्वेवं सति पुरुषो मूढमातेस्तमोविशन् बीभत्सा: क्रिया:
कुरुते । दन्तखादनादि कुर्वन् क्षितौ पतति । ततो दोषाणां
वेगेऽतीते विजिह्नाक्षिभ्रवो विबुध्यते । सुबोधम् । निचय:
सन्निपात: ॥
इंदुटीका
दोषांनीं चित्ताचा उपघात झाला, चेतनास्थान व्यापलें गेलें, संज्ञावह स्त्रोतसांचा अवरोध झाला म्हणजे रुग्णाचे संज्ञाग्रहणसामर्थ्य नष्ट होतें; अंधारी येते, व त्याच्या शरीराच्या चेष्टा (हालचाली) बीभत्स स्वरुपाच्या होतात. दांत खाणें, तोंडाला फेंस येणें, हात पाय झाडणें, मूर्च्छित होत असतांना कांहींतरी भलतींच दृश्यें दिसणें, झटका येऊन पडणें, डोळे व भुवयांचें स्वरुप विकृत होणें, अशीं लक्षणें होतात. दांत खाण्याचा परिणाम म्हणून जीभ बहुधा चावली जाते. दोषदूष्यांच्या बलाबलाप्रमाणें, अपस्माराचा हा वे कांहीं काळ टिकतो आणि त्यानंतर रोगी झोपेतून जागा झाल्याप्रमाणें सावध होतो. कालांतरानें अपस्माराचे वेग वरचेवर येत राहातात.
पक्षाद्वा द्वादशाहाद्वा मासाद्वा कुपिता मला: ।
अपस्माराय कुर्वन्ति वेगं किंचिदयान्तरम् ॥१३॥
च. चि. १०-१३ पान ११०४
चरकानें १२ दिवसांनीं, १५ दिवसांनीं, १ महिन्यानें प्रकुपित दोष, अपस्माराचें वेग उत्पन्न करतात असें म्हटलें आहे. अर्थात् ही कालमर्यादा निश्चित् स्वरुपाची नाहीं. वेग, काल ह्यापेक्षां लवकर अगर उशीराही येऊं शकतात.
प्रलाप: कूजनं क्लेश: प्रत्येकं तु भवेदिह ॥१६॥
सटीक सु. उ. ६१/१६ पान ८००
वातादिजापस्मारेषु प्रत्येकं प्रलापादिलक्षणत्रितयमाह -
प्रलाप: कूजनमित्यादि । प्रलापादिकं त्रयं वातादिजाप-
स्मारेषु त्रिष्वपि प्रत्येकं बोद्धव्यं न यथासंख्यम् ॥१६॥
सुश्रुतानें प्रलाप, कण्हणें व क्लेश (व्यथा, पीडा) हीं तीन लक्षणें सर्वच अपस्मारांत सामान्य अशी असतात असें सांगितले आहे.
वातज
तत्रवातात् स्फुरत्सक्थि: प्रतत: च मुहुर्मुहु: ।
अपस्मरति संज्ञां च लभते विस्वरं रुदन् ॥
उत्पिण्डिताक्श: श्वसिति फेनं वमति कम्पते ।
आबिध्यति शिरो दन्तान् दशत्याध्मातकन्धर: ॥
परितो विक्षिपत्यड्गं विषमं विनताड्गुलि: ।
रुक्षश्यावारुणाक्षित्वड्नखास्य: कृष्णमीक्षते ॥
चपलं परुषं रुपं विरुपं विकृताननम् ॥
अ. सं. उ. १० पान ८० सटीक
तत्रेत्यादि विकृताननान्तं वातापस्मारलक्षणम् । प्रततं
संततं मुहुर्मुहु: प्रतिक्षणमपस्मरति संज्ञा च लभते ।
विस्वरं रुदन् शब्दं कुर्वन् शिर आविध्यति भित्त्यादावा-
विद्धं करोति । आध्माता समन्ताद्ध्माता कन्धरा ग्रीवा
यस्य । रुक्षत्वादि युक्तमक्ष्यादिकं यस्य सर्व च रुपं कृष्णं
चपलादिगुणमीक्षते पश्यति ॥
अ. सं. टीका
वातज अपस्मारांत मांडया ह्या स्फुरण पावल्याप्रमाणें वरचेवर दीर्घकाळपर्यंत कंपीत होतात. अपस्माराचे वेग पुन: पुन: येतात व थोडावेळ टिकतात. रोगी विकृत स्वरांनें रडतो, बडबडतो. डोळे बाहेर आल्यासारखे होतात, श्वास लागतो, तोंडाला फेंस येतो, रोगी कापतो, डोकें आपटलें जातें, दांत खातो, मान व गळा फुगतो, अंगाला झटके येतात. बोटें वाकडी तिकडीं होतात. नखें, नेत्र, त्वचेच्या ठिकाणीं रुक्षता, श्यावता व अरुणता दिसते. मूर्च्छा येण्यापूर्वी थोडावेळ चंचल, कुरुप, वेडीवाकडीं, कठोर, कृष्ण वर्णाचीं दृश्यें रुग्णास दिसतात. सुश्रुतानें चंचल इत्यादि गुणांनी युक्त दृश्यें अंगावर धाऊन आल्यासारखीं वाटतात व नंतर मूर्च्छता येते असें रोगी सांगतो असें वर्णन केलें आहे. (सु. ड. ६१-६२) हृदयामध्यें टोचल्यासारखीं पीडा होणें असें वातज अपस्माराचें विशेष लक्षण सुश्रुतानें सांगितले आहे. (सु. ड. ६१-१६)
पित्तज
अपस्मरति पित्तेन मुहु: संज्ञां च विन्दति ।
पीतकेनाक्षिवक्त्रगास्फालयति मेदिनीम् ।
भैरवादीप्तरुषितरुपदर्शी तृषान्वित:;
सटीक अ. सं. उ. १० पान ८०
तृषान्वितान्तं पित्तापस्मारलक्षणम् । पीतै: फेनादिभिर्युक्तो
मेदिनीं भुवभास्फालयत्याहन्ति । भैरवादिगुणरुपदर्शी च
भवति ॥
पित्तज अपस्मारांत अपस्माराच्या वेगानंतर रोगी लवकरच सावध होतो. तोंडाला येणारा फेंस पीत वर्णाचा असतो, नख-नेत्रादिंच्या ठिकाणीं पीत व ताम्र वर्ण दिसतो. जमिनीवर हातपाय आपटतो. मूर्च्छित होत असतांना उग्र, तेजस्वी, क्रुद्ध अशीं दृश्यें दिसतात. फार तहान लागते.
कफज
चिरादपस्मरन्तं, चिराच्च संज्ञां प्रतिलभमानं, पतन्तम्,
अनतिविकृतचेष्टं, लालामुद्वमन्तं, शुक्लनखनयनवदनत्वचं,
शुक्लगुरुस्निग्धरुपदर्शिनं, श्लेष्मलानुपशयं, विपरीतोपशयं
च श्लेष्मणाऽपस्मरन्तं विद्यात् ॥३॥
च. नि. ८-१० पान ४७९
कफज अपस्मारांत आलेल्या मूर्च्छेतून रोगी बर्याच वेळानें सावध होतो व पुन्हा येणारी मूर्च्छाही अधिक दीर्घकाळानें येते. चेष्टा फारशा विकृत नसतात. तोंडांतून लाळ गळते. नख-नेत्र, त्वचेच्या ठिकाणीं श्वेतता दिसते. मूर्च्छित होण्यापूर्वी श्वेत, गुरु, स्निग्ध रुपें दिसतात.
सान्निपातिक
समवेत सर्वलिंगं अपस्मारं सान्निपातिकं विद्यात्
च. नि. ८ ते ११.
सान्निपातिक अपस्मारांत सर्व दोषांची लक्षणें एकत्र दिसतात.
चिकित्सा संदर्भानें लक्षणें
ज्वर, उन्माद, प्रतिश्याय अलक्ष्मी (सौंदर्य नष्ट होणें), श्वास, कास, शुक्र व आर्तव ह्यांची दुष्टि.
वंगसेन अपस्मार, ६२-६४ पान ३२४.
उपद्रव
उन्माद.
उदर्क
स्मृतिभ्रंश, मनोदौर्बल्य, सौंदर्यनाश.
साध्यासाध्य विवेक
सर्वैरेतै: समस्तैश्च लिड्गैर्ज्ञेयस्त्रिदोषज: ।
अपस्मार: स चासाध्य: य: क्षीणस्यानवश्च य: ॥६॥
मा. नि. अपस्मार ६ पान १९१
सर्व लक्षणांनीं युक्त असा सान्निपातिक अपस्मार व व्याधि उत्पन्न होऊन बरेच दिवस झाले असल्यास, तसेंच रोगी क्षीण असल्यास अपस्मार (कष्टसाध्य, याप्य) असाध्य असतो.
रिष्ट लक्षणें
प्रस्फुरन्तं सुबहुश: क्षीणं प्रचलितर्भुवम् ।
नेत्राभ्यां च विकुर्वाणमपस्मारो विनाशयेत् ॥७॥
मा. नि. अपस्मार ७ दान १९१.
अतिशय कंप, क्षीणता, भुवयांची हालचाल, नेत्रविकृति हीं लक्षणें अधिक प्रमाणांत असतांना अपस्मार व्याधी मारक ठरतो.
चिकित्सा सूत्रें
तैरावृतानां हृत्स्त्रोतोमनसां संप्रबोधनम् ।
तीक्ष्णैरादौ भिषक् कुर्यात कर्मभिर्वमनादिभि: ॥१४॥
वातिकं बस्तिभूयिष्ठै: पैत्तं प्रायो विरेचनै: ।
श्लैष्मिकं वमनप्रायैरपस्मारमुपाचरेत् ॥१५॥
च. चि. १०/१४, १५ पान ११०५.
अपस्माराच्या मूर्च्छेतून सावध करण्यासाठीं प्रथम तीक्ष्ण उपचार करावेत (अंजन, धूप, नस्य) व दोषानुरुप बस्ति, वमन, विरेचन प्रधान चिकित्सा करावी.
औषधी
ब्राह्मी, वचा, जटामांसी, कृष्णा, पुराणवृत्त, तुळस, पंचगव्य, रौप्य, अभ्रक, धत्तुर, त्रिफळा, स्मृतिसागर रस, मेधामृत, सु. सूतशेखर.
पथ्यापथ्य
रक्तशाली, गोधूम, घृत, दुग्ध, दाडिम, द्राक्षा, आमलकी हे पदार्थ खावें.
मद्यं मत्स्यं विरुद्धान्नं तीक्ष्णोष्णं गुरुभोजनम् ।
अतिव्यवायमायासं पूज्यपूजा व्यतिक्रमम् ॥३॥
पत्रशाकानि सर्वाणि बिम्बीमाषाढकीफलम् ।
तृषानिद्राक्षुधावेगानपस्मारी नरस्त्यजेत् ॥४॥
अपस्मार यो. र. पान ४३१
विदाही, गुरु, तीक्ष्ण, उष्ण, विरुद्ध असे पदार्थ, उपवास, तृष्णा-निग्रह, जागरण, श्रम, मैथुन, उष्णसेवन वर्ज्य.